Home लेख दहावी-बारावीचे विद्यार्थी पेपरला जाताना व पेपर सोडविताना……..!

दहावी-बारावीचे विद्यार्थी पेपरला जाताना व पेपर सोडविताना……..!

848

 

 

 

बारावीची बोर्ड परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२५ पासून तर दहावीची बोर्ड परीक्षा दि.२१ फेब्रुवारी २०२५ पासून प्रारंभ होत आहे.बोर्ड आणि विद्यापीठाच्या परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता हार्दिक शुभेच्छा ॥
विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक नवी दिशा देणाऱ्या,एक नवे वळण लावणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा म्हणजे वर्ग दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा होतं.विद्यार्थी मित्रांनो ,” मी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार की नाही.” हा नकारात्मक विचार मनात आणू नये,तर मी उत्तम गुणांनीच परीक्षेत यश संपादन करणार आहे हा सकारात्मक विचार विद्यार्थ्यांनी मनात आणून परीक्षेला सामोरे गेले पाहिजे;कारण तुम्हाला प्रत्येक विषयात उत्तम गुण मिळवून देणे हे पेपर तपासणीसांचे काम आहे;पण तशा प्रकारचा नियमित अभ्यास करून प्रत्येक विषयातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आदर्श सोडविणे हे तुमचे काम आहेत.असे आदर्श उत्तरे सोडविल्यास तपासणीस तुम्हाला उत्तम गुण देणारच यात शंका नाही.
वर्ग दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा दरवर्षीच येते पण त्या परीक्षेत परीक्षा देणारे विद्यार्थी हे नवीन असतात म्हणून त्यांनी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी लक्षात ठेवण्याच्या सूचना अगदी लहान असतात; पण गुणवृद्धिच्या दृष्टीने त्या महान असतात. त्या सर्व सूचनांचे आचरण परीक्षेला बसणाऱ्या या नवीन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. म्हणून मी माझ्या ” परीक्षेला जाता जाता ” या माझ्या शाळा व महाविद्यालयात सादरीकरण करीत असलेल्या कार्यक्रमातील अनमोल ज्ञानकण घेऊन परीक्षेला जाताना- पेपर सोडविताना विद्यार्थ्यांशी हितगुज करण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न.
हा लेख विद्यार्थ्यांच्या वाचनात आल्यास पाच मिनिट वाचायला द्यावे आणि या सूचनांचे अभ्यास करताना व पेपर सोडवताना आचरण करावे.जर पालकांच्या वाचनात हा लेख आल्यास त्यांनी आपल्या पाल्याला आणि ओळखीच्या विद्यार्थ्यांना वाचायला जरूर द्यावे.या सूचनांचे विद्यार्थ्यांनी आचरण केल्यास गुणवृद्धिसाठी हमखास उपयोगी होईल,यात शंका नाही.
परीक्षेला जाताना अभ्यासाचे तंत्र : –
कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना मनवाचन, नेत्रवाचन,चित्रवाचन व मौनवाचन हे वाचनाचे चार प्रकार आचरणात आणावे म्हणजे स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा ठेवून स्वतःचे मन ज्या विषयाचा जो भाग तुम्ही अभ्यासत आहात त्याकडे लक्ष केंद्रित करावे म्हणजे तुम्ही व ज्या विषयाचा जो भाग अभ्यासत आहात तो भाग या व्यतिरिक्त जगात काहीच नाही.अशी कल्पना अभ्यास करताना केल्यास मनात कोणत्याही गोष्टीला प्रवेश करू न दिल्यामुळे तुमचे मन फक्त अभ्यासाकडे केंद्रित होऊन नेत्र पुस्तकावर केंद्रित होईल व जे तुम्ही वाचत आहात ते दृष्य तुम्हाला मन:चक्षूनी अनुभवता येईल.अशाप्रकारे अभ्यास केल्यास चार तासाचा अभ्यास एका तासात होऊन तो दीर्घकाळ लक्षात राहील;कारण मनाच्या एकाग्रतेशिवाय जगात कोणतीच गोष्ट उत्तम प्रकारे साध्य होऊ शकत नाही.मग अभ्यास कसा बरे साध्य होईल;म्हणून वर सांगितल्याप्रमाणे मनाची एकाग्रता साध्य करण्याचा सतत प्रयास करून अभ्यास करा, स्मरणात ठेवा,त्या उत्तरांचा वेळेच्या नियोजनानुसार (हे वेळेचे नियोजन याच लेखात खाली दिलेले आहे.) सराव करा आणि प्रत्येक विषयात उत्तम गुण मिळवा. अभ्यास करताना मोबाईल अभ्यासिकेत (स्टडीरूममध्ये ) जवळ ठेवू नका.
प्रवेशपत्र वाचा : –
शाळेत प्रवेशपत्र मिळाल्यावर त्यावर आपला फोटो,नाव, क्रमांक,सर्व विषय,उत्तरे लिहिण्याची भाषा इ. वाचा, बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करा.तसे नसेल तर वर्ग शिक्षकाच्या ते लगेच लक्षात आणून दया.
वस्तुंची यादी : –
पेपरच्या चार तासांपूर्वी परीक्षेला न्यावयाच्या सर्व वस्तुंची यादी एका कागदावर लिहा.उदा. उत्तर पत्रिका आखण्यासाठी बारा इंच स्केल,आवश्यक असल्यास पेन्सिल,रबर, सहा इंच स्केल,कंपास,प्रवेश पत्र,घड्याळ,सुव्यवस्थित तीन-चार निळ्या अथवा काळ्या शाईचे पेन व पाण्याची बॉटल इ.
पेपरच्या दिवशी : –
पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांनी चित्त शांत ठेवावे. पेपरच्या तीन तास अगोदर हलकासा आहार घ्यावा.पूर्ण जेवण करून पेपरला जाऊ नये. कारण परीक्षा हॉलमधील प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावे.
पाणी व लघुशंका :-
पेपर सुरू होण्याच्या दीडतास अगोदर पाणी घ्या व परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी लघुशंका आटोपून घ्या ; कारण परीक्षा हॉलमधील प्रत्येक्ष क्षण गुणवाढीसाठी महत्त्वाचा असतो.
झोप किती घ्यावी : –
पेपरपूर्वीच्या रात्री पाच अथवा सहा तास झोप घ्यावी; कारण अधिकच्या जागरणाने उत्तरपत्रिका लिहिताना पेंगण्याचा त्रास होऊ शकतो.
पाण्याची बॉटल आवश्यक : –
उन्हाळ्यात परीक्षा व दुपारी पेपर यामुळे परीक्षा हॉलमध्ये परीक्षा सोडवताना अर्ध्या किंवा एका तासानंतर विद्यार्थ्यांना तहान लागते.घसा कोरडा होतो; म्हणून विद्यार्थी पर्यवेक्षकाला पाण्याची मागणी करतात. पाण्याची वाट बघतात.यामुळे विद्यार्थ्यांचे पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ शकते.पाणी कधी येणार व कधी पिणार असे होते. परीक्षा हॉलमध्ये पाणी आल्यावर मिळालेल्या ग्लासमधील पाणी पूर्ण प्यावे.अर्धवट पाणी पिऊन डेक्सवर ग्लास ठेवला व डेक्सला धक्का लागून तो पडला तर तुमची उत्तरपत्रिका पाण्यात भिजू शकते,म्हणून विद्यार्थ्यांनी भरलेली पाण्याची बॉटल सोबत घेऊन जावी.हवे तेव्हा स्वतःच्या बॉटलमध्ये शुद्ध पाणी प्यावे व सुरक्षित राहावे.
वेळेची विभागणी : –
१०० गुणाच्या पेपरसाठी एका गुणाला ९९ सेकंद याप्रमाणे गुणविभागणी केल्यास १०० गुणाला ९९०० सेकंद लागतात. म्हणजे १६५ मिनिट,उरलेल्या १५ मिनिटाचा उपयोग पाच मिनिट प्रश्नपत्रिका वाचून महत्त्वाचे येणारे प्रश्न उपप्रश्न लक्षात घ्यायला व १० मिनिट शेवटी स्वतःची लिहिलेली उत्तरपत्रिका वाचायला अर्थात प्रश्नानंतर उत्तर संपल्यावर रेषा ओढणे,मुद्दे व महत्त्वाचे शब्द अधोरेखित करणे,एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसले तर विद्यार्थी पेपरमध्ये ती जागा कोरी सोडतो. असे कोरे पृष्ठ दिसल्यावर त्या प्रश्नाचे उत्तर येत असल्यास लिहिणे येत नसल्यास डावीकडून उजवीकडे रेषा आखणे इत्यादी .
विद्यार्थी व परीक्षा हॉल : –
परीक्षा हॉलमध्ये एखाद्याची कॉपी पकडल्यास तिकडे तुम्ही लक्ष देऊ नये अर्थात मन विचलित होऊ देऊ नका.सतत लिहित राहा;कारण परीक्षा हॉलमधील प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो.उत्तरपत्रिका लिहिताना अधून-मधून स्वतःच्या डेस्क-बेंच खाली बघा.कोणी कॉपी वगैरे तेथे फेकून दिली असल्यास तुमची समजून तुम्हाला धोका होऊ शकतो.
हुशार विद्यार्थ्यांना भान आवश्यक : –
नियमित अभ्यास करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयाची उत्तर पत्रिका लिहिताना खूप आठवते;म्हणून त्यांनी उत्तरे लिहिताना खूप लिहित न बसता गुण व वेळ यांचे भान ठेवूनच लिहावे;कारण उत्तम गुणांसाठी पूर्ण पेपर सोडविणे आवश्यक असते. हे त्यांनी लक्षात ठेवावे.
वळणदार हस्ताक्षर आवश्यक : –
गुणवृद्धिसाठी वळणदार हस्ताक्षर आवश्यक आहे.उत्तरे लिहिताना अक्षर खूप लहान अथवा खूप मोठे नको.वळणदार व एकसारखे असावे. परीक्षकाला ओळखू येतील,असे तरी असावे.दोन शब्दांमधील अंतर करंगळी एवढे ठेवावे. अक्षरांची जाडी व उंची समान असावी.अक्षरे शिरोरेषेला चिकटलेली असावी.अक्षरांची वेलांटी,उकार व मात्रा अक्षराच्या निम्मे असावी.अक्षरांचा आकार विशिष्ठ वळणात काढावा. अक्षराची वेलांटी,उकार व काना – मात्रा अक्षराच्या आकाराला चिकटलेली असावी. वळणदार हस्ताक्षरांचे हे नियम लिहिताना विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले तर अक्षर वळणदार येणार व उत्तम गुण मिळणार हे निश्चित.
उपप्रश्न पाठोपाठ लिहिणे आवश्यक : –
एका प्रश्नातील विचारलेल्या सर्व उपप्रश्नांची उत्तरे एका पाठोपाठ एक लिहावे,एखाद्या प्रश्नातील ‘अ’ पाचव्या पृष्ठावर आणि ‘ ब’ पंधराव्या पृष्ठावर अशी उत्तरे लिहू नये.’ब’ चे उत्तर येत नसेल तर तेथे जेवढी जागा त्या उत्तराला पाहिजे तेवढी सोडून पुढच्या पृष्ठावर नवीन प्रश्नाचे उत्तर लिहावे आणि सर्वात शेवटी जे दहा ते पंधरा मिनिट शिल्लक असतात तेव्हा शेवटी उत्तरपत्रिका बघताना विद्यार्थ्यांनी त्या कोऱ्या पृष्ठावरील त्या प्रश्नाचे उत्तर येत असल्यास लिहावे अन्यथा डावीकडून उजवीकडे रेषा आखावी .यामुळे परीक्षकाला त्या प्रश्नातील ‘ ब ‘ या प्रश्नाचे उत्तर कोणत्या पृष्ठावर लिहिलेले आहे याची शोधाशोध करावी लागणार नाही कारण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ज्या पृष्ठापासून सुरू केले त्याच पृष्ठावर त्या प्रश्नांच्या उपप्रश्नांचे गुण लिहून परीक्षकाला गुण लिहायचे असतात. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे लिहावी.
शीर्षकाचे महत्त्व : –
कोणत्याही विषयाच्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना प्रथम प्रश्नामधूनच शीर्षक तयार करावे व ते उत्तर लिहिताना प्रारंभी मधोमध लिहून ते अधोरेखित करावे व त्याला अवतरण चिन्ह द्यावे.असे केल्यास ते शीर्षक वाचल्याबरोबर उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाला लवकर लक्षात येईल की,तुम्ही कोणत्या प्रश्नाचे उत्तर लिहित आहात व उत्तरपत्रिकाही सुटसुटीत दिसेल.
परिच्छेद व अधोरेखनाचे महत्त्व :-
दीर्घ अथवा निबंधात्मक प्रश्नांची उत्तरे सोडविताना चार ते पाच ओळीचा परिच्छेद करावा. प्रस्तावनेतील आणि प्रत्येक परिच्छेदातील एक महत्त्वाचा शब्द अधोरेखित करावा;म्हणजे उत्तर पत्रिका सुटसुटीत व नीटनेटकी दिसेल व गुण वाढतील.
परीक्षा केंद्रावर पोहचणे : –
बारकोड व होलोक्रॉफ्ट स्टिकर पद्धतीमुळे पेपरच्या वेळेच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळेल म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या पाऊन तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे. स्वतःचा रोल नंबर कुठे आहे ते बघावे.वेळ असल्यास विषय सूत्राच्या डायरीवरून नजर फिरवा.स्वतःच्या स्मरणशक्तीवर विश्वास ठेवा.
अर्ध्या तासानंतर प्रवेश निषेध: –
परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी अधिक वेळ करू नका;कारण अर्ध्या तासानंतर परीक्षा केंद्रावर प्रवेश निषेध असतो.
उत्तरपत्रिका व्यवस्थित बघणे व आखणे :-
उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर उत्तरपत्रिकेला पूर्ण पृष्ठ आहेत का? ते बघा.पूर्ण पृष्ठ आखलेले आहेत का?ते बघा.काही पृष्ठ कोरे आहेत का ? एखादे पृष्ठ फाटले आहे का ? पहिल्या पृष्ठावरील प्रिंटिंग पूर्ण छापलेली आहे का? ते बघा जर अशी सदोष (फॉल्टी) उत्तरपत्रिका असेल तर ती पर्यवेक्षकाला द्या व दुसरी घ्या आणि दुसरी सुद्धा अशीच पूर्ण बघा. उत्तरपत्रिकेवरील सूचना काळजीपूर्वक वाचा व पेपर सोडविताना आचरणात आणा. बोर्डाने डावीकडे आखलेल्या समासाच्या बाजूला एक सेंटीमीटर समास उपप्रश्न व मुद्यांचे नंबर लिहायला आखा . उत्तर पत्रिकेतील पहिल्या तीन-चार पानावरील आकर्षकता मुद्देसूदपणा ,सुटसुटीतपणा, नीटनेटकेपणा उत्तर पत्रिकेतील शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कायम ठेवा.उत्तरे सोडविताना प्रश्न नंबर व उपप्रश्न नंबर अचूक टाका.
रोल नंबर व इतर नांदी : –
उत्तर पत्रिकेच्या पहिल्या पृष्ठावर रोल नंबर व इतर नोंदी काळजीपूर्वक प्रवेश पत्र बघूनच लिहा. रोल नंबर अक्षरात व आकड्यात, इंग्रजीत व मराठीत लिहिण्याचा अगोदरच सराव करा.
उपस्थिती पत्रकातील स्वाक्षरी : –
पर्यवेक्षक देतील त्या उपस्थिती पत्रावर तुमच्या क्रमांकासमोर प्रवेश पत्रातील स्वाक्षरी प्रमाणेच स्वाक्षरी करा.
उत्तरपत्रिकेत पत्ता,फोन नं. लिहू नये : –
उत्तरपत्रिकेत ओळखीच्या खाणाखुणा,पत्ता,फोन नंबर इत्यादी लिहू नये.” ज्या ज्या रे पेपर मास्तर के पास । आयेंगी दया तो कर देंगे पास ॥”असे काहीही न लिहिता मनापासून अभ्यास करा.आत्मविश्वासाने उत्तर पत्रिका सोडवा. उत्तम गुण हमखास मिळणारच.
कॉपीचा निषेध : –
” कॉपी कराल तर फसाल ” अशा आशयाच्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्या मागील काही दिवसात विद्यार्थी व पालकांनी वाचल्या असतीलच म्हणून विद्यार्थ्यांचा असा पक्का विचार असावा की,कॉपी करून पास होण्यापेक्षा मी नापास होणे पसंत करीन; कारण कॉपी करणारा पुढे उच्च शिक्षणाच्या स्पर्धेत टिकू शकत नाही.
मेरिटचे गुपित : –
वरील सर्व सूचनेत मेरिटचे गुपित दडलेले आहे,तसेच पूर्ण पेपर उत्तम सोडविणे व पूर्ण पेपरमधील पूर्ण प्रश्नांची उत्तरे उत्तम सोडविण्यात आहे.
या माझ्या लेखामध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे विद्यार्थ्यांनी आचरण केल्यास प्रत्येक विषयात गुणवृद्धी होईल,यात शंका नाही.अशा प्रकारचे आचरण विद्यार्थी वाचक करतील,ही आशा.


प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर,अमरावती.
भ्र.ध्व. :८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here