Home महाराष्ट्र जितेंद्र आव्हाड यांची ही नसती उठाठेव कशासाठी…..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत...

जितेंद्र आव्हाड यांची ही नसती उठाठेव कशासाठी…..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

159

 

 

जगदीश का. काशिकर,(विशेष प्रतिनिधी)
मो. ९७६८४२५७५७

 

महाराष्ट्राच्या राजकारणात वाचाळवीरांची काहीही कमी नाही. “ढुंडो एक तो मिलते हजार” अशी परिस्थिती आहे. मात्र त्यातही आपल्या दैनंदिन वक्तव्याने नवे नवे वाद उपस्थित करणारे काही वाचाळवीर सध्या अगदी जोशात आणि फार्मात आहेत. त्यातलेच एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड सध्या आघाडीवर आहेत. त्यांच्या एका वक्तव्याने कालपासून महाराष्ट्र पेटला आहे म्हटले तरी चालेल. आज ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शने, आंदोलने असे सर्वच सुरू आहेत.

जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मुंबईतल्या मुंब्रा या मतदारसंघातून ते विधानसभा सदस्य म्हणून निवडून येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या कधी आक्रमक बोलण्याने तर कधी आक्रमक कृतीने ते नवे नवे वाद ओढवून घेत असतात. त्यात कोणाही वर कोणतीही टीका करणे इथपासून तर एखाद्या व्यक्तीने आपल्या विरोधात समाज माध्यमावर काही लिहिले तर त्याला आपल्या बंगल्यावर आणून बेदम मारहाण करणे इथपर्यंत सर्वकाही ते करत असतात. त्याबद्दल त्यांना कोणताही खंत खेद नसतो हे विशेष.

काल ३ जानेवारी रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात बोलताना त्यांनी असेच एक खळबळजनक वक्तव्य  केले आहे. त्यात त्यांच्या म्हणण्यानुसार प्रभू रामचंद्र हे ओबीसी समाजाचे होते आणि प्रभू रामचंद्र हे मांसाहार करायचे असा दावा करण्यात आला आहे. आपल्या या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी असा दावा केला आहे की १४ वर्ष वनवासात ज्याने काढले तो मांसाहार करूनच जगला असणार. त्यांच्या या दोन्ही विधानांनी फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील रामभक्त प्रचंड दुखावले आहेत. त्याचे पडसाद कालपासूनच उमटतांना दिसू लागले आहेत. आज तर महाराष्ट्रभर ठीक ठिकाणी त्यांच्या विरोधात आक्रमक अशी निदर्शने सुरू आहेत. ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळले जात आहेत. आणि त्यांच्या प्रतिकात्मक प्रयत्नयात्राही काढल्या जात आहेत. त्यांच्या छायाचित्राला जोडे मारण्याचे कार्यक्रम घेतले जात आहेत. एकंदरीतच त्यांच्याविरुद्ध वातावरण चांगलेच तापलेले दिसते आहे.

अगदी पौराणिक काळापासून प्रभू रामचंद्र हे या भारतभूमीवरील असंख्य हिंदूंचे दैवत मानले गेले आहेत. त्यात जसे उच्चवर्णीय ब्राह्मण आहेत तसेच अगदी खालच्या जातीतील शूद्र ही आहेत. भिल्ल, गोंड, कोरकू असे आदिवासीही रामाची भक्ती करणारे आहेत. मात्र हजारो वर्षात रामाची जात कोणती हा प्रश्न कधीही कोणालाही पडला नव्हता. प्राचीन हिंदू संस्कृतीनुसार जे चार वर्ण मानले गेले होते,  ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे होते. त्यातील लढाऊ राज्यकर्ते म्हणून प्रभू रामचंद्रांचे रघुकुल हे क्षत्रिय समाजाचे होते असे मानले गेले आहे. मात्र ते क्षत्रिय आहेत म्हणून फक्त क्षत्रियांचेच दैवत असे कधी झाले नाही. सर्वच जाती-धर्माच्या भक्तांनी त्यांना आपले मानले आहे आणि भक्ती भावाने शरण गेल्यास तो सर्वांनाच प्रसन्न होतो अशी सर्वसाधारण श्रद्धा आहे.

अशा प्रभू रामचंद्राची जातकुळी काढण्याचे खरे तर काहीच कारण नव्हते. मात्र अकारण वाद ओढवून घेतला नाही तर ते जितेंद्र आव्हाड कसले? त्यामुळेच त्यांनी हा वाद उडवून घेतला.

आव्हाडांचे दुसरे विधान असे की प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते. आपल्याकडे ३३ कोटी देव देवता आहेत असे म्हटले जाते. ते सर्वच शाकाहारी आहेत की मांसाहारी याबाबत कधीच कोणी वाद केलेले नाहीत. मात्र बहुसंख्य देवदेवता या शाकाहारी आहेत असा समज आहे. असे असले तरी काही समाजांच्या दैवतांना गेल्या  अनेक शतकांपासून मांसाहाराचा नैवेद्यही दाखविला जातो. मात्र त्याबाबत कधीही कोणीही वाद निर्माण केलेले नाहीत. अशा परिस्थितीत राजकीय मेळाव्यात प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते असा दावा करीत १४ वर्षे वनवासात काढली असताना ते मांसाहार केल्याशिवाय कसे राहू शकतील असाही सवाल आव्हाडांनी उपस्थित केला. भरीस भर आज मी अभ्यास करूनच बोलत असतो असा दावाही करायला ते विसरलेले नाहीत.

वस्तुतः आव्हाडांनी हे जे काही उद्योग केले ते फक्त राजकारण करण्यासाठीच हे स्पष्ट दिसते आहे. त्यासाठी कोणत्याही साक्षी पुराव्याची गरज नाही. आपल्या देशात अयोध्येत जे प्राचीन काळापासून उभे राहिलेले प्रभू रामचंद्राचे ऐतिहासिक मंदिर होते ते मंदिर सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी मोगल बादशहा अकबराने उध्वस्त केले होते. त्यानंतर ते तसेच उद्ध्वस्त अवस्थेत होते. नंतर तिथे त्याच जागेवर बाबरी मशीद उभारली गेली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी या राम मंदिराला उर्जितावस्था येईल असे वाटले होते.

मात्र तत्कालीन नेहरू आणि नंतर इंदिरा गांधी सरकारने मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यासाठी त्या मशिदीला हातही लावला नाही. १९८४ पासून विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांनी हा प्रश्न हातात घेतला. त्यांनी हळूहळू जनमत जागृत करत १९९२ मध्ये कारसेवा करून ती मशीद पाडली. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या जागी मंदिरच होते आणि ते मंदिर पुन्हा उभारले जावे असे निर्देश दिल्यानंतर केंद्र सरकारने एक ट्रस्ट उभा करून त्यांना मंदिर बनवण्यासाठी सोय करून दिली. ते मंदिर आता उभे राहिले असून येत्या २२ जानेवारीला त्या मंदिरात प्रभू रामचंद्राची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाणार आहे. आणि मंदिराचे रितसर लोकार्पण होणार आहे.

यामुळे देशातील बहुसंख्य हिंदू समाज त्यातही रामभक्त समाज हा निश्चितच सुखावला आहे. राम मंदिर लोकरपणाचा जल्लोष साजरा करण्याची देशभर तयारी सुरू आहे. त्याची पूर्वतयारी म्हणूनही सध्या देशभरात राम मंदिराची अक्षत वाटण्याचा कार्यक्रम उत्साहात सुरू आहे. देशातील एकूणच वातावरण हे राममय झाले आहे हे कोणीही नाकारणार नाही.

मात्र याचवेळी मंदिर विरोधकांना या उत्साहात मिठाचा खडा कसा टाकता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर जे राज्यकर्ते होते त्यांना मुस्लिमांचे लांगुलचालन करून त्यांची गठ्ठा मते मिळवण्यात जास्त रस होता. त्यांनी हिंदूंची कधीच पर्वा केली नाही. या सर्व बाबींमध्ये काँग्रेस, पक्ष डावे पक्ष आणि समाजवादी गट हे आघाडीवर होते. आजही हीच मंडळी मंदिराच्या विरोधात आहेत.

जितेंद्र आव्हाड हे त्यातीलच एक आहेत. ते स्वतःला शरद पवारांचे मनसपुत्र म्हणून घेतात. शरद पवारांनी कायम हिंदू देवदेवतांचा आणि त्यातही ब्राह्मण समाजाचा राग आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जितेंद्र आव्हाडांची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या मुंब्रा मतदार संघात मुस्लिम मतदार मोठ्या संख्येत आहेत. त्यामुळे ती मते मिळविण्यासाठी हिंदूंना विरोध करणे हा त्यांचा एकमेव कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमातलाच एक भाग म्हणजे त्यांचे कालचे विधान आहे असे म्हणता येईल.

देशात रामू भक्तांचे जल्लोषाचे वातावरण असताना त्यात मिठाचा खडा टाकायचा या एकाच हेतूने त्यांनी ही उठाठेव केली आहे हे नक्की. अन्यथा प्रभू रामचंद्र शाकाहारी अन्न खात होते की मांसाहार करीत होते याची उठाठेव करण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. मात्र नवा वाद निर्माण करून ठेवायचा आणि त्यातून प्रसंगी तणावाचे वातावरण निर्माण करायचे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी हे केले असणार हे स्पष्ट दिसते आहे.

भरीस भर आपण अभ्यास करून बोलतो असा त्यांनी आज दावाही केला आहे त्या दाव्याच्या पुष्ठयार्थ आता ते काय पुरावे देणार हे बघणे देखील उत्सुक त्याचे ठरणार आहे. रामायण काळात व्हिडिओ किंवा फिल्म उपलब्ध नव्हती. त्यामुळे तसे पुरावे मिळणे कठीण आहे.आता वाल्मिकी रामायणापासून तर तुलसी रामायणापर्यंत सर्व ग्रंथ अभ्यासून त्यात प्रभू रामचंद्रांनी मांसाहार केल्याचा कुठे उल्लेख सापडतो का? हे ते शोधतील असा तर्क करायला हरकत नाही. भरीस भर किमान पक्षी प्रभू रामचंद्र मांसाहार करीत असल्याची रेखाचित्रे तरी मिळवावी यासाठी ते प्रयत्नही करतील यातही शंका नाही. कसेही करून आपलेच म्हणणे खरे आहे हे दाखवण्यासाठी “मेरे मुर्गी की एकही टांग* या धोरणाने ते प्रयत्न करतील हे नक्की.

दरम्यान समाजमाध्यमावरही त्यांच्यावर आग पाखड होते आहे. कुणी एकानी प्रश्न उपस्थित केला आहे की प्रभू रामचंद्रांसाठी भक्ष्य म्हणून प्राणिमात्रांचे मांस शोधायला आणि शिकार करायला जितेंद्र आव्हाड जात होते का? आणि नंतर ते मांस शिजवून देण्याचाही उपद्व्याप आव्हाड करीत होते काय? असा प्रश्नही उपस्थित केला आहे
अजूनही विविध प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर होतो आहे. त्याला आता ते उत्तर कसे देतात हे बघणे निश्चितच मनोरंजक ठरणार आहे.

राजकारणात परस्परांवर टीकाटिपणी करणे यात काही वावगे नाही. मात्र ती टीकाटिपणी मर्यादेत असावी हे अपेक्षित आहे. असे असले तरी जितेंद्र आव्हाडांसारखे अतिविद्वान वाचाळ जेव्हा मर्यादा सोडून टीका टिपणी करू बघतात तेव्हा असे गोंधळ निर्माण होतात. त्यातून साध्य काहीच होत नाही, मात्र जनमत अकारण कलुषित होत असते.

असे जनमत कलुषित करणे आणि वाद निर्माण करणे हे कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येक सुजाण राजकारण्याने करणे आज गरजेचे झाले आहे. असा विचार करून राजकारणी मंडळींनी योग्य ती पावले उचलली आणि अशा वाचाळवीरांना लगाम घातला तर भारतीय राजकारणाचा आज घसरत असलेला दर्जा सुधारण्यास मदत होईल. अन्यथा राजकारणात आणि पर्यायाने देशात अराजकाची स्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. जितेंद्र आव्हाड यांच्या या उठाठेवीतून हाच निष्कर्ष काढता येईल..

वाचकहो  पटतेय का तुम्हाला हे..? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो…..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here