


🔹येत्या १५ जुलै रोजी ठाणे येथे होणार वितरण : अजित दादा पवार यांची प्रमुख उपस्थिती
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.6जुलै):-सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व उद्योगसह विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन वेगळी ओळख निर्माण केलेल्या मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानला महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ठ स्पर्धा आयोजक राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
कबड्डी महर्षी स्व.शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिवस कबड्डीदिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने येत्या १५ जुलै रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृह येथे दुपारी ४ वाजता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानचे सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. निबंध व वक्तृत्व स्पर्धा, गौरी-गणपती सजावट स्पर्धा, नौकरी मेळावा, पत्रकार संमेलन, अभिवादन महामानवांना सामान्य ज्ञान स्पर्धा, गझल संमेलन, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, उद्योग मेळावा या उल्लेखनीय उपक्रमांचे प्रतिष्ठानने प्रभावीपणे आयोजन केले होते. त्याचा फायदा विविध समाज घटकास झाला आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये प्रतिष्ठानने ४९ व्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे अतिशय सूत्रबद्ध नियोजन केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील हजारो स्पर्धेकांना आपले कौशल्य सिद्ध करता आले. आयोजक म्हणून भूमिका पार पाडताना प्रतिष्ठानने राहाणे, भोजन, प्रवास, स्वागत, नावनोंदणी, प्रत्यक्ष खेळ, आसन व्यवस्था, मैदान, पाणी, अल्पोपहार अशा सर्व बाबींचे काटेकोरपणे नियोजन केले होते. त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवड समितीने प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक करून हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे.
दरम्यान, प्रतिष्ठानचा स्थापना सामाजिक बांधिलकीतून झाली आहे. त्यामुळे विविध समाज घटकांना सोबत घेऊन प्रतिष्ठान काम करीत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिष्ठानने भरीव असे योगदान दिले आहे. त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने केलेल्या कौतुकाने जबाबदारी वाढली आहे. भविष्यात सुध्दा प्रतिष्ठान नव्या जोमाने काम करेल, असा विश्वास गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे आनंदून गेलेल्या प्रतिष्ठान पदधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत मुंढे, उपाध्यक्ष शिवाजी पवार, सचिव ॲड.मिलिंद क्षिरसागर, कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य राजेभाऊ बापू सातपुते, हनुमंत लटपटे, कवी विठ्ठल सातपुते, संभुदेव मुंढे यांच्यासह आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे वरिष्ठ पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













