


चंद्रपूर : राज्यात मत्स्य संपदा वाढवून लोकांच्या आहारात प्रथिनांची मात्रा वाढवणे व मत्स्य व्यवसायातून लोकांचे उत्पन्न वाढवून त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन जयकिसान अंतर्गत ‘शेततळे तेथे मत्स्यव्यवसाय’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मत्स्यव्यवसाय विभाग सद्यस्थितीत केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत भूजलाशयीन पिंजरा मत्स्य संवर्धन योजना, गोडेपाणी व निमखारेपाणी तळी बांधकाम, नुतनीकरण व निविष्ठा योजना, बायोफ्लॉक प्रकल्प आणि गोडेपाणी व सागरी मत्स्य बीज उत्पादन केंद्र स्थापना या योजना राबवित आहे
नीती आयोगाद्वारे 2021 मध्ये प्रसिद्ध बहुआयामी दारिद्रय निर्देशांक मध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाशी निगडित वंचितांना प्रत्येकी एक तृतीयांश भारांश दिला आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना वंचिततेतून बाहेर काढण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला सुविधा संपन्न, समृद्धी करणे यावर भर देण्यात आला आहे. जेणेकरून देशातील प्रत्येक नागरिक सुखी, समाधानी व समृद्ध आयुष्य जगू शकेल. याच उद्दिष्टांना धरून मत्स्यव्यवसाय विकास विभाग कार्यरत आहे. यासाठी विभागाने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत.
शासनाने मनरेगा व विविध विभागांच्या योजनांच्या अभिसरणातून सुविधा संपन्न कुटुंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजना अमलात आणली आहे. या पार्श्वभूमीवर मनरेगा आणि मत्स्यव्यवसाय विकास विभाग खालील पाच पातळ्यांवर अभिसरण करेल. 1. उद्दिष्ट प्राप्तीसाठी विचार आपला आणि पैसा मनरेगाचा, 2. मनरेगा मार्फत शेततळे आणि मनरेगांतर्गतच मत्स्यव्यवसाय, 3. मनरेगांतर्गत शेततळे तर मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या योजनेतून मत्स्यबीज/ प्रशिक्षण/मासेमारीची जाळी/ नौका इत्यादी, 4. मत्स्य विकास विभागाच्या आणि मनरेगाच्या राशिच्या एकत्रिकरणातून अभिसरण, आणि 5. मनरेगा व मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा अभिसरण.
महाराष्ट्र राज्यातील एकूण पर्जन्यमान आणि त्यानुसार मत्स्यव्यवसाय विकासाकरिता उपलब्ध असलेली विपुल प्रमाणातील क्षमता विचारात घेतल्यास मच्छी उत्पादनातून ल मत्स्यव्यवसायिकांचे जीवन स्तर उंचावणे शक्य आहे. या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी मनरेगा आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे उद्दिष्ट, विचार, संयोजन, योजना व मनुष्यबळाच्या अभिसरणातून योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे.
मत्स्य व्यवसाय विभागातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय 263 कामांपैकी जी कामे मत्स्यसंपदा विकासासाठी उपयोगी आहेत ती सर्व कामे करण्याचे आदेशित करण्यात येत आहे. यात मत्स्यपालनासाठी तलाव बांधणे, तलावांची दुरुस्ती व देखभाल, तलावांचे नूतनीकरण, मासे सुकविण्यासाठी ओट्यांचे बांधकाम करणे, मिनी पाझर तलाव बांधकाम व पाझर तलाव दुरुस्ती, तलावातील गाळ काढणे, तलावांचे प्लास्टिक लायनिंग करणे आणि तलावाच्या पाण्याची व मातीची परिक्षण/ चाचणी करणे यांचा समावेश आहे.
मनरेगा अंतर्गत अनेक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात येते अशा शेततळ्यांमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून त्यामध्ये मत्स्यव्यवसाय करता येणे शक्य आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल व शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उन्नत होण्यास हातभार लागेल.
शेततळ्यांचे (मत्स्यतळ्यांचे) बांधकाम- शेततळे बांधकाम करतेवेळी मत्स्यतळ्यांची आवश्यकता असल्यास यासाठी सूचनानुसार कार्यवाही अवलंबण्यात येईल. अभिसरणाच्या मुद्यानुसार जिल्ह्यातील 20 गावे निवडून चांगले पर्जन्यमान असलेल्या भागातील भूधारक कुटुंबाची निवड करण्यात येईल. अशा 20 गावांना नंदादीप गावे म्हणून संबोधण्यात यावे. अशा निवडित गावामधील ग्रामसभेत प्राप्त झालेल्या शेततळ्यांकरिता ( मत्स्यतळ्यांकरिता ) शेतकऱ्यांच्या अर्जास प्रशासकीय मान्यता द्यावयाच्या कामांचे सर्व कागदपत्रासह प्रस्ताव तयार करण्याचे कार्य ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक सहाय्यक यांची संयुक्त जबाबदारी राहील.
मत्स्यतळे बांधण्याकरिता मनरेगाच्या मानकांनुसार निश्चित करण्यात आलेल्या तळ्याचे आकारमान किमान 45x20x3 मी. ठेवावे. बांधाचा उतार 1:1.5 इतक्या प्रमाणात ठेवावा. प्रस्तावित शेततळ्यांच्या जागेतील मातीचे पाणी धारण करण्याची क्षमता चाचणी करण्यात यावी. माती व पाणी परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर जागी मातीच्या परिक्षणामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता कमी असल्यास अशा शेततळ्यांमध्ये मनरेगांअंतर्गत प्लास्टिक फ़िल्मचे अस्तरीकरण करण्यासाठी प्रस्तावित करण्यात यावे. जेणेकरून तळ्यांमध्ये पाणी साठवणूक होऊ शकेल. जागा निवड करण्यापूर्वी जमिनीची तसेच मत्स्यतळ्यांकरीता आवश्यक पाण्याची, खोताची मत्स्यव्यवसाय विभागामार्फत पाहणी करण्यात येईल. सदर शेततळ्यांमध्ये कटला, रोहू, मृगळ, तिलापिया, पंगॅशियस इ. संवर्धक्षम प्रजातीच्या माशांचे मत्स्यजिरे/मत्स्यबीज संगोपन करून मत्स्य बोटूकलीपर्यंत वाढवून विक्री करून व्यवसाय करता येईल. यामुळे राज्यास भासणारा मत्स्यबोटुकलीचा तुटवडा कमी होण्यास निश्चित हातभार लागेल. तसेच माशांचे संवर्धन करून मत्स्यउत्पादनातून सुविधा संपन्न कुटुंब मिशनच्या माध्यमातून शेतक-यांची प्रगती होईल.
राजेश येसनकर, जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर मो. 93250 69713
००००००













