


🔸तीन महिने कारावास आणि ६६ हजार ७९ रुपयांचा दंड
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.3मार्च):-शुगर साखर कारखान्याची धनादेश अनादर करुन फसवणुक केल्यामुळे वाहतुक ठेकेदार आरोपी यशवंत कदम यास तीन महिने साधा कारावास आणि ६६,०७९ रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गंगाखेड शुगर साखर कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी मजुरासह वाहन पुरविणे यासाठी साखर कारखाना आणि आरोपी यशवंत देवराम कदम यांच्यात सन २००९ साली लेखी करार झाला होता. त्यानुसार आरोपीने आपल्या मालकीचा ट्रक एम.एच.क्र.२६ एच.५४७२ मजुरासह पुरविला होता. परंतु सन २००९ मधील गळीत हंगामात पूर्ण क्षमतेने काम केले नाही. त्यामुळे कारखान्याकडून घेतलेल्या रक्केपैकी ५० हजार रुपये आरोपीने देणे लागत होते.
त्यामुळे आरोपीने कारखान्यास धनादेश दिला. पंरतु खात्यावर रक्कम नसल्याने तो धनादेश वटला नाही. त्यातून धनादेश अनादर झाला. त्यामुळे प्रशासनाने वेळोवेळी मागणी करुनही आरोपीकडून येणे रक्कम मिळत नव्हती. परिणामी, तत्कालिन शेतकी अधिकारी नंदकिशोर शर्मा यांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात धाव घेतली.
त्यामुळे न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व साक्षी पुरावे तपासून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपी यशवंत देवराम कदम या ठेकेदारास तीन महिने कारावास आणि ६६ हजार ७९ रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नि.द.रूद्रभटे यांनी सुनावली. या खटल्यात गंगाखेड शुगर तर्फे ॲड.एस.बी.कांगणे आणि ॲड. मिलिंद क्षिरसागर यांनी काम पाहिले. त्यांना कामकाजात ॲड.जितेंद्र सोनसाळे यांनी विशेष सहकार्य केले.













