


देशभरात नीट (NEET), जेईई, एमपीएससी, यूपीएससी, बारावी, दहावी अशा विविध स्पर्धात्मक आणि शैक्षणिक परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. निकाल जाहीर होण्याचा हा काळ अनेक कुटुंबांसाठी आनंदाचा असतो, तर काहींसाठी तो असह्य वेदनेचा. प्रत्येक वर्षी निकालानंतर काही विद्यार्थी नैराश्यात जातात, काही स्वतःला अपयशी समजू लागतात आणि दुर्दैवाने काहीजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. वृत्तपत्रांच्या छोट्याशा बातम्यांमध्ये अशा मृत्यूंची नोंद होते, पण त्या प्रत्येक बातमीमागे एक उद्ध्वस्त कुटुंब, तुटलेली स्वप्ने आणि समाजाच्या अपयशाची एक मोठी कहाणी दडलेली असते. प्रश्न असा आहे की, एका परीक्षेच्या निकालामुळे एखाद्या विद्यार्थ्याला स्वतःचे जीवन संपवावेसे का वाटते? त्याच्या मनात एवढा प्रचंड ताण निर्माण होतोच कसा? आणि यासाठी जबाबदार कोण?
आज शिक्षण हे ज्ञान मिळवण्याचे साधन कमी आणि स्पर्धेचे रणांगण अधिक बनले आहे. डॉक्टर, अभियंता, प्रशासकीय अधिकारी किंवा प्रतिष्ठित व्यावसायिक बनण्याचे स्वप्न पाहणे चुकीचे नाही. मात्र त्या स्वप्नांना प्रतिष्ठा आणि सामाजिक सन्मानाची अशी चौकट मिळाली आहे की त्यात अपयश आले की विद्यार्थ्याला स्वतःचे अस्तित्वच निरर्थक वाटू लागते. गुण आणि रँक यांनाच यशाचे अंतिम मोजमाप समजले जाऊ लागले आहे. नीटसारख्या परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी बसतात, पण जागा मर्यादित असतात. याचा अर्थ लाखो विद्यार्थी कमी बुद्धिमान आहेत असा होत नाही. मात्र निकालाच्या दिवशी समाजाची मानसिकता अशी असते की यशस्वी विद्यार्थी “हुशार” आणि अपयशी विद्यार्थी “नालायक” ठरतो. ही विभागणी अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर घाव घालणारी आहे.
आज अनेक पालक आपल्या अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा मुलांच्या खांद्यावर लादताना दिसतात. मुलाला डॉक्टर व्हायचे आहे की नाही, यापेक्षा आई-वडिलांना तो डॉक्टर व्हावा असे वाटते. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश दिला जातो. सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास, टेस्ट सिरीज, रँकिंग आणि तुलना यांचे चक्र सुरू असते. अशा परिस्थितीत विद्यार्थी हळूहळू स्वतःच्या इच्छांपासून दूर जातो आणि केवळ अपेक्षांचे ओझे वाहू लागतो. निकाल अपेक्षेप्रमाणे आला नाही की त्याला वाटते, “मी आई-वडिलांना निराश केले”, “माझ्यामुळे त्यांचे पैसे वाया गेले”, “आता समाजात तोंड दाखवायला जागा नाही.” ही भावना इतकी तीव्र होते की जीवनापेक्षा अपयश मोठे वाटू लागते. प्रत्यक्षात अपयश तात्पुरते असते, पण त्या क्षणी विद्यार्थ्याला ते कायमचे वाटत असते.
आपली शिक्षणव्यवस्था देखील या समस्येस काही प्रमाणात जबाबदार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गुण, टक्केवारी आणि रँक यांवर भर दिला जातो, मात्र मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि अपयशाचा सामना कसा करावा याचे शिक्षण फारसे दिले जात नाही. विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इतिहास शिकवला जातो पण तणाव हाताळणे, स्वतःला स्वीकारणे आणि संकटातून उभे राहणे याचे धडे कोणी शिकवत नाही. कोटा, पुणे, नागपूर, मुंबई, दिल्ली यांसारख्या कोचिंग केंद्रांमध्ये हजारो विद्यार्थी घरापासून दूर राहून शिक्षण घेतात. स्पर्धेचे प्रचंड दडपण, एकाकीपणा आणि सततच्या तुलनेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन ढासळते. काहीजण नैराश्याच्या गर्तेत जातात. दुर्दैवाने मानसिक आरोग्याबाबत अजूनही समाजात अनेक गैरसमज आहेत. मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे म्हणजे “वेडेपणा” असे मानले जाते. परिणामी अनेक विद्यार्थी मदत मागण्याचे धाडसच करत नाहीत.
सोशल मीडियानेही या तणावात भर घातली आहे. निकालाच्या दिवशी सर्वत्र टॉपरांच्या मुलाखती, यशोगाथा, अभिनंदनाचे संदेश यांचा पूर आलेला असतो. हे यश साजरे करणे आवश्यक आहेच पण त्याच वेळी अपयशी विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. प्रत्येक जण स्वतःची तुलना इतरांशी करू लागतो. “तो यशस्वी झाला, मी का नाही?” हा प्रश्न त्याला आतून पोखरत राहतो. खरे तर इतिहास सांगतो की आयुष्यातील मोठे यश मिळवणाऱ्या अनेक व्यक्तींना सुरुवातीला अपयश आले होते. अनेक शास्त्रज्ञ, उद्योगपती, साहित्यिक, कलाकार आणि नेते परीक्षांमध्ये अव्वल नव्हते. पण त्यांनी अपयशाला शेवट न मानता नवी सुरुवात मानली. दुर्दैवाने आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पुरेशा प्रभावीपणे पोहोचत नाही.
आत्महत्या ही कोणत्याही समस्येचे उत्तर नाही. ती एका क्षणाच्या नैराश्यात घेतलेला कायमस्वरूपी निर्णय असतो. एखाद्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पालकांची अवस्था काय होत असेल, याची कल्पनाही करवत नाही. निकालात अपयश आले म्हणून दुःखी असलेले आई-वडील, मुलाच्या मृत्यूनंतर आयुष्यभर स्वतःला दोष देत राहतात. एक निकाल पुन्हा देता येतो, पण गेलेला जीव कधीच परत आणता येत नाही. समाज म्हणून आपणही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण मुलांना नेहमी विचारतो, “किती मार्क पडले?” पण क्वचितच विचारतो, “तू आनंदी आहेस का?” आपण गुणांचे कौतुक करतो पण प्रयत्नांचे किती कौतुक करतो? आपण यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार करतो पण अपयशी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवतो का?
पालकांनी सर्वप्रथम मुलांशी संवाद वाढवण्याची गरज आहे. निकाल काहीही असो, “आम्ही तुझ्यासोबत आहोत” हा विश्वास मुलाला मिळाला पाहिजे. मुलाचे मूल्य त्याच्या गुणांवर नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वावर आणि माणूसपणावर अवलंबून आहे, हे त्याला सातत्याने जाणवले पाहिजे. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था यांनी मानसिक आरोग्य सल्लागारांची व्यवस्था करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला समुपदेशनाची सुविधा सहज उपलब्ध झाली पाहिजे. तणाव, नैराश्य आणि आत्महत्येची लक्षणे ओळखण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले पाहिजे. सरकारनेही शिक्षणातील स्पर्धेचे दुष्परिणाम गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. परीक्षांचे स्वरूप, प्रवेशप्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी व्यापक धोरणे आखली पाहिजेत. शिक्षणाचा उद्देश केवळ रोजगार नव्हे, तर सक्षम आणि आनंदी नागरिक घडवणे हा असला पाहिजे.
आज गरज आहे ती यशाची व्याख्या बदलण्याची. डॉक्टर, अभियंता किंवा अधिकारी होणे हेच यश नाही. प्रत्येक मुलामध्ये वेगळी क्षमता असते. कोणीतरी कलाकार होऊ शकतो, कोणीतरी लेखक, उद्योजक, शेतकरी, संशोधक किंवा समाजसेवक. प्रत्येक क्षेत्राला समाजात समान सन्मान मिळाला पाहिजे. निकालाच्या दिवसांत आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, गुणपत्रिका ही विद्यार्थ्याच्या आयुष्याचा संपूर्ण अहवाल नसते. ती केवळ एका परीक्षेतील कामगिरीची नोंद असते. माणसाची किंमत त्याच्या गुणांनी नव्हे, तर त्याच्या जिद्दीने, संवेदनशीलतेने आणि पुन्हा उभे राहण्याच्या क्षमतेने ठरते. प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक पालकाला आणि संपूर्ण समाजाला आज हा संदेश देण्याची गरज आहे की, अपयश म्हणजे शेवट नाही तर तो नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा आहे. एका निकालामुळे जीवन संपवण्याइतके जीवन स्वस्त नाही. कारण गुणपत्रिकेतील आकडे बदलू शकतात, करिअरचे मार्ग बदलू शकतात पण एकदा निसटलेला जीव मात्र पुन्हा कधीच परत येत नाही. निकाल महत्त्वाचा असतो, पण जीवन त्याहूनही अधिक महत्त्वाचे असते आणि म्हणूनच, प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सांगायला हवे “तू गुणांपेक्षा मोठा आहेस, रँकपेक्षा मौल्यवान आहेस आणि कोणत्याही परीक्षेपेक्षा तुझे जीवन अधिक महत्त्वाचे आहे.”
✒️प्रविण बागडे(नागपूर)मो:-9923620919















