Home Breaking News ब्रम्हपुरी तालुक्यातील रेती घाटाकडे महसूलचे दुर्लक्ष-रात्रभर रेती चोरीचा धुमाकूळ 

ब्रम्हपुरी तालुक्यातील रेती घाटाकडे महसूलचे दुर्लक्ष-रात्रभर रेती चोरीचा धुमाकूळ 

144

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.7जून):- नदी घाटातील अनेक रेतीघाटांचे लिलाव झाले असताना काही घाट घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र तालुक्यातील रेतीघाट बंद असल्याने अवैध रेती तस्करांना नामी संधी मिळाली आहे. रात्रभर रेती चोरीचा धुमाकूळ असताना मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष बघायला मिळत आहे.

पात्र घरकुल लाभार्थ्यांना बंद डेपोमुळे रेती मिळत नाही. काही दिवसांपासून लाभार्थ्यांचे ट्रॅक्टर परत जात आहेत. महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात चोरीच्या रेतीची वाहतूक सुरू असून महसूल व खनिकर्म विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. पोलिस विभागाकडून काही प्रमाणात कारवाई होत असली तरी अनेक तस्कर सुटत असल्याने त्यांचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे. ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यातून वैध-अवैध रेती वाहतुकीची कसून चौकशी होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

भर रस्त्यावरून बेधडक वाहतूकीचे चित्र दिसत आहे. दरम्यान, घाट बंद असल्याचा फायदा घेत अवैध रेती तस्करांनी अर्हेर- नवरगाव, अवळगाव, पिंपळगाव, हळदा, कोलारी, रानमोचन, खरखाडा, मुडझा येथील वैगंगा नदी परिसरात आपले जाळे अधिक सक्रिय केल्याची चर्चा आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध भागात रात्री रेतीने भरलेले ट्रॅक्टर, ट्रक सुसाट वेगाने धावताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काही वाहनचालक गावातील भर चौकातूनही बेधडक वाहतूक करीत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

घरकुलासाठी राखीव घाटातील रेती साठ्यातही गैरप्रकार अवैध रेती तस्करी या संपूर्ण प्रकरणात नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, याची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन करण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या मते, ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची विशेष गस्त वाढविण्यात आल्यास मोठे रेती तस्कर गळाला लागण्याची शक्यता आहे. तसेच खनिकर्म, महसूल व पोलिस विभागाने संयुक्त मोहीम राबविल्यास अवैध रेती तस्करीला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here