


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.7जून):-पर्यावरण मित्र संस्था विरुर स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उल्का कार्यालय वडाळा(तु.) येथे ६ जून रोजी वैयक्तिक वनहक्क धारकांची वनहक्क कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत वनहक्क दाव्याला वनहक्क धारकांच्या रहीवास सिध्द करण्यासाठी अत्यावश्यक असलेले अधिवास प्रमाणपत्र व तीन पिढ्यांचा पुरावा सिध्द करण्यासाठी कायदेशीर वंशावळ कशी तयार करायची या दोन विषयांवर चर्चा करण्यात आली.
अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा जन्माचे ठिकाण नोंद असलेला शैक्षणिक पुरावा याची अत्यंत आवश्यकता असते. परंतु कोणत्याही वनहक्क धारकांजवळ असे पुरावे नसल्याने अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी फार अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जन्म प्रमाणपत्र कायदेशीर रितीने मिळविण्यासाठी काय काय करावे लागते? अर्ज कसा तयार करायचा? अर्ज कसा भरायचा? अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र लागतात? अर्ज कोठे द्यायचा? अर्ज दिल्याची पोचपावती कशी घ्यायची? जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठीच्या अर्जाचा पाठपुरावा कसा व कुठे करायचा? तीन पिढ्यांचा पुरावा सिध्द करण्यासाठी वनहक्क कायद्याचा आधार घेऊन वंशावळ कशी तयार करायची? वंशावळ तयार करताना कोणकोणती माहीती आवश्यक आहे? कोणकोणते कागदपत्र लागतात? तयार केलेल्या वंशावळीला कायदेशीर प्रक्रिया कशी आणि कुठे केली जाते? त्यासाठी काय करावे? याबाबत पर्यावरण मित्र संस्थेचे शंकर यांनी वनहक्क धारकांसोबत चर्चा करून जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी व वंशावळ तयार करण्यासाठी चे नमुने तयार करून दिले.
या कार्यशाळेत उपविभागीय स्तरीय वन हक्क समिती वरोरा यांचे कार्यालयात वनहक्क दावे प्रलंबित असणारे व जिल्हा स्तरीय वनहक्क समिती चंद्रपूर यांचे कार्यालयात अपिल प्रलंबित असणारे वनहक्कधारक सहभागी झाले होते.















