


✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.7जून):-कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची पुरोगामी, समतावादी, मानवतावादी भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची गादी म्हणून करवीरच्या गादीला विशेष सन्मानाचे स्थान आहे. त्यामुळे जात, धर्म, वंश, संस्कृती यांचा आधार घेऊन कोणत्याही संस्था, संघटना जर समाजामध्ये द्वेष पेरून माणसांची विभागणी करत असतील तर समाजाची विभागणी करणारा हा सांस्कृतिक दहशतवाद कोल्हापूरकर अजिबात सहन करणार नाहीत. सध्याचा काळ हा संक्रमणाचा काळ असताना देशाला एकसंघ ठेवण्यासाठी शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या विचारांना खुला अथवा छुपा विरोध करून काही संस्था, संघटना आपला जातीयवादी, धर्मांध मानवी समाजात द्वेष पसरवणारा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न कोल्हापूरसह महाराष्ट्रात गेली काही वर्षे करत आहेत.
त्यातून सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा त्यांचा मनसुबा स्पष्ट आहे. आम्ही संविधानाचे पाईक म्हणून न्याय आणि कायदेशीर मार्गाने या सर्वांना सनदशीर पद्धतीने विरोध करतच राहू. कारण आम्ही कोल्हापूरच्या पुरोगामी विचारांचे खरे वारसदार आहोत. त्यामुळे जात, धर्म, वंश याचा आधार घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बीजेपी आणि त्यांच्या तत्सम संघटना व्यक्ती मानवी समाजामध्ये द्वेष पेरून माणसं विभागत असतील तर त्यांचा मानवी समाजात विभागणी करणारा सांस्कृतिक दहशतवाद कोल्हापूरकर सहन करणार नाहीत असा सर्वानुमते यावेळी निर्णय घेण्यात आला.
काही व्यक्ती संघटना यांचा जर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या लेखनावर आक्षेप असेल, तर त्याच निकषावर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल वि. दा. सावरकर आणि भालजी पेंढारकर यांच्यावर देखील गुन्हा नोंदवला पाहिजे. त्याच निकषांवर लता मंगेशकर यांचा ‘भारतरत्न’ सन्मान परत घेतला पाहिजे. बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील शिवचरित्रात अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार तातडीने काढून घेतला पाहिजे अशीही यावेळी भूमिका घेण्यात आली.
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील बिंदू चौकात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे भव्य सामूहिक वाचन करण्यात आले. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तिकेतील मूळ भावना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक सलोखा, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे हा या सामूहिक वाचन उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
उत्तमदादा कांबळे, पार्थ पोळके, विजय देवणे, डी. जी. भास्कर, दुर्वासबापू कदम, अनिल म्हमाने, रघुनाथ कांबळे, प्रशांत आंबी, बाळासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे, सोमनाथ घोडेराव, सुभाष रामुगडे, डॉ. अनिल माने, जयसिंग जाधव, जी. बी. अंबपकर, डॉ. कपिल राजहंस, अॅड. करुणा विमल, मदन पवार, संजयकुमार अर्दाळकर, अंतिमा कोल्हापूरकर, विशाल देवकुळे, रघुनाथ मांढरे, लालासाहेब नाईक, निलेश बनसोडे, विश्वास तरटे, सुनील जाधव, सीमा पाटील, बाळासाहेब वाशीकर, सुखदेव बुध्याळकर रमेश कांबळे, भिमराव कांबळे, बी. आर. कांबळे, दिपक कांबळे, संजय लोखंडे, विकी कांबळे, राजेंद्र ठिकपूरलीकर, जयसिंग पाडळीकर यांच्यासह अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समिती, मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि समस्त पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी, मार्क्सवादी आणि स्त्रीवादी विचारांच्या विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष तसेच सामाजिक चळवळींमधील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.















