Home नागपूर प्रवासात माणसं जास्त कळत जातात!

प्रवासात माणसं जास्त कळत जातात!

69

माणसाला ओळखायचं असेल, तर त्याच्याशी फार काळ बोलण्याची गरज नसते; त्याच्यासोबत थोडासा प्रवास केला तरी पुरेसं ठरतं. कारण प्रवास हा केवळ अंतर कापण्याचा प्रकार नसतो, तो माणसाच्या स्वभावाचा, संवेदनांचा आणि वास्तवाशी असलेल्या नात्याचा आरसा असतो. घरात, कार्यालयात किंवा समाजात माणूस अनेक भूमिका वठवत असतो; पण प्रवासात त्या भूमिका हळूहळू गळून पडतात आणि उरतो तो केवळ माणूस अस्सल, निखळ, मुखवट्यांशिवाय. घराच्या चार भिंतींमध्ये माणूस सुरक्षित असतो. ओळखीची माणसं, ओळखीची परिस्थिती, ठरलेली चौकट या सगळ्यात तो स्वतःला लपवू शकतो. पण प्रवासात चौकट मोडते. वेळेचं बंधन असतं, अनिश्चितता असते, कधी गर्दी, कधी थकवा, कधी उशीर, तर कधी अचानक येणारा अडथळा. या सगळ्या क्षणांत माणसाचं खरं रूप समोर येतं. कुणाचा संयम सुटतो, कुणी शांत राहतो; कुणी दुसऱ्याला मदत करतो, तर कुणी स्वतःपुरताच विचार करतो.

       रेल्वेचा डबा, एसटीची बस, विमानतळावरची वाट पाहणारी गर्दी, रस्त्याच्या कडेला उभं असलेलं ढाबा ही सगळी ठिकाणं माणसांच्या स्वभावाची प्रयोगशाळा असतात. एका लांब पल्ल्याच्या प्रवासात सहप्रवासी फक्त प्रवासी राहत नाहीत; ते समाजाचे प्रतिनिधी बनतात. श्रीमंत-गरीब, शिकलेले-अशिक्षित, शहर-गाव, स्त्री-पुरुष, वृद्ध-तरुण सगळे एकाच प्रवासात भेटतात. आणि इथेच कळतं की माणुसकी ही पद, पैसा किंवा प्रतिष्ठेवर अवलंबून नसते. प्रवासात माणूस वेळेच्या तणावाखाली असतो. ट्रेन सुटेल का? बस मिळेल का? फ्लाइट वेळेवर आहे का? या प्रश्नांच्या गर्दीत त्याचा स्वभाव उघडा पडतो. कुणी रागावतो, कुणी शिव्याशाप देतो, तर कुणी शांतपणे पर्याय शोधतो. एखादी स्त्री लहान मुलाला सांभाळत असताना मदतीचा हात पुढे करणारा अनोळखी पुरुष किंवा गर्दीत स्वतःची सीट वृद्धाला देणारा तरुण हे क्षण फार मोठे वाटत नाहीत, पण ते माणसाचं मोठेपण सांगून जातात. आजच्या काळात माणूस बोलतो खूप, पण ऐकतो फार कमी. प्रवासात मात्र शब्द कमी आणि निरीक्षण जास्त असतं. समोरचा काय बोलतो यापेक्षा तो कसा वागतो, यावरून त्याचं व्यक्तिमत्त्व समजतं. गर्दीत कुणी ढकलतं, कुणी वाट देतं; कुणी नियम तोडतो, तर कुणी नियम पाळण्यासाठी त्रास सहन करतो. प्रवास म्हणजे सभ्यतेचीही कसोटी असते.

       ग्रामीण भागातून शहराकडे जाणारा प्रवासी वेगळा असतो आणि शहरातून गावाकडे जाणारा वेगळा. पहिल्याच्या डोळ्यांत आशा असते, स्वप्नं असतात, तर दुसऱ्याच्या मनात आठवणी असतात, मातीचा ओलावा असतो. कुणी नोकरीच्या शोधात आहे, कुणी आजारपणामुळे प्रवास करतोय, कुणी लग्नासाठी, तर कुणी अंत्यसंस्कारासाठी. एकाच डब्यात बसलेली माणसं वेगवेगळ्या कहाण्या घेऊन चाललेली असतात. त्या कहाण्या न बोलताही त्यांच्या चेहऱ्यावर उमटत असतात. प्रवासात माणूस कधी कधी खूप प्रामाणिक होतो. कारण इथे ओळखीचा दबाव नसतो. सहप्रवासी पुन्हा भेटणार नाही, ही जाणीव त्याला मोकळं करते. म्हणूनच कधी कधी एखादा प्रवासी आपली दुःखं अनोळखी माणसासमोर मोकळेपणाने सांगतो. त्या काही तासांच्या सहवासात निर्माण झालेली आपुलकी खरी असते, कारण ती कोणत्याही स्वार्थावर आधारलेली नसते.

      प्रवासात माणसाचं नातं वेळेशीही बदलतं. घाई असताना तो चिडचिडा होतो, तर वेळ भरपूर असताना शांत. उशीर झाला की माणसाचा खरा संयम कळतो. उशीर हा केवळ वेळेचा नसतो; तो आयुष्यातील अपयशांचा, प्रतीक्षेचा, संघर्षांचा प्रतीक असतो. प्रवासात उशीर सहन करणारा माणूस आयुष्यातही बरंच काही सहन करत असतो. आजच्या डिजिटल युगातही प्रवास माणसाला एकटं पाडतो. मोबाईल हातात असूनही मनात एक रिकामेपण असतं. खिडकीबाहेर धावणारी झाडं, बदलणारी गावं, मागे पडणारी शहरं हे सगळं पाहताना माणूस स्वतःकडे वळतो. त्या क्षणी त्याला स्वतःबद्दलही काही कळतं. आपल्याला नेमकं काय हवंय? आपण कुठे चाललोय? आणि या प्रवासात कुणाला दुखावलंय का? हे प्रश्न मनात उमटतात. प्रवासात माणसं जास्त कळतात, कारण इथे दिखावा टिकत नाही. थकवा खरा असतो, भूक खरी असते, रागही खरा असतो आणि करुणाही खरी असते. प्रवासात माणूस जितका बाहेरचा प्रवास करतो, तितकाच आतलाही करतो. म्हणूनच प्रवास संपल्यानंतर आपण केवळ एका ठिकाणी पोहोचत नाही, तर थोडे अधिक समजूतदार, थोडे अधिक प्रगल्भ होऊन परततो.

     आज समाजात वाढत चाललेली असहिष्णुता, चिडचिड, आत्मकेंद्रीपणा पाहता प्रवासाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. प्रवास माणसाला थांबायला शिकवतो, वाट पाहायला शिकवतो, आणि दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहायला शिकवतो. तो माणसाला सांगतो की आपण सगळेच या जगात प्रवासी आहोत. कुणी थोडा पुढे, कुणी थोडा मागे; पण वाट सगळ्यांची एकच आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, माणसं ओळखायची असतील, तर त्यांच्याशी वाद घालू नका, चर्चा करू नका; त्यांच्यासोबत थोडासा प्रवास करा. कारण प्रवासात माणसं जास्त कळत जातात… आणि कधी कधी आपणही स्वतःला नव्यानं ओळखू लागतो.

✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here