Home अमरावती जागतिक वसुंधरा दिन

जागतिक वसुंधरा दिन

80

 

वसुंधरा आमची माता ।

आम्ही तिची लेकरे ॥

हिरवेगार ठेवू तिला ।

घेऊ शपथ आम्ही सारे ॥

नको करू तिचा छळ ।

तीच जीवनाला देई बळ ॥

अशा या धरणीमातेचा बावीस एप्रिल हा दिवस जगभरात ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो. पृथ्वीवरील पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.या दिवसाची सुरुवात १९७० मध्ये अमेरिकेतून झाली होती.गेलॉर्ड नेल्सन या अमेरिकन सिनेटरने पर्यावरण शिक्षणासाठी या दिनाची संकल्पना मांडली होती.

आज हा दिवस जगातील १९२ पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो.आपली पृथ्वी ही आपल्या सर्वांचे हक्काचे घर आहे, तिचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

वाढते प्रदूषण,जंगलतोड आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे पृथ्वीचे आरोग्य आपणच धोक्यात आणले आहे.वसुंधरा दिन आपल्याला निसर्गाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून देतो.या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम आणि जनजागृती रॅली काढल्या जातात.प्लास्टिकचा वापर कमी करणे हे सध्याच्या काळातील मोठे आव्हान आहे.

सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांसारख्या नैसर्गिक स्रोतांच्या वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे.पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे.वाढत्या तापमानामुळे वितळणारे हिमनग ही चिंतेची बाब आहे.

प्रदूषणामुळे अनेक पशु- पक्षांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प करु या.रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीवर भर देणे आवश्यक आहे.ओला कचरा आणि सुका कचरा याचे योग्य वर्गीकरण करणे गरजेचे आहे.

​ मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.पृथ्वी वाचली, तरच मानवाचे अस्तित्व टिकून राहील. शाश्वत विकासासाठी निसर्गाचे जतन करणे ही काळाची गरज आहे.आपण सर्व भारतीयांनी वैयक्तिक पातळीवर पर्यावरणाचे नुकसान टाळून पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे.कागदाचा वापर कमी करून झाडांची कत्तल थांबवता येते.सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून आपण वायू प्रदूषण कमी करू शकतो. वसुंधरा दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तो जीवनशैलीचा भाग व्हायला पाहिजे.पृथ्वी वाचवा,जीवन वाचवा, झाडे लावा -झाडे जगवा -हिरवीगार पृथ्वीवर वाहे आनंदाचा वारा,​निसर्गाशी करू या मैत्री -प्रगतीची मिळेल खात्री,

​प्रदूषण टाळा -पृथ्वी वाचवा,​घरोघरी झाडे लावू या -वसुंधरेला नटवू या,​थेंब थेंब पाण्याचे संवर्धन,हेच पृथ्वीचे खरे धन.​प्लास्टिकचा वापर टाळा – पर्यावरणाचा र्‍हास थांबवा,​​पृथ्वी वाचवा -देश वाचवा,​निसर्ग जगला तरच मानव जगेल हे संदेश घराघरात पोहोचवणे आवश्यक आहे.

निसर्ग आपल्याला भरभरून देतो,त्या बदल्यात आपण त्याचे रक्षण केले पाहिजे.आपण सर्वांनी मिळून या सुंदर पृथ्वीला अधिक हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त बनवू या .माझी वसुंधरा – माझी आई’ हा केवळ एक विषय नसून ती एक कृतज्ञतेची भावना आहे.आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती खरोखरच एका आईप्रमाणे आपले पालनपोषण करते.

​ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाच्या सर्व गरजा पूर्ण करते, त्याचे रक्षण करते आणि त्याला जीवन देते; अगदी त्याचप्रमाणे ही वसुंधरा आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा आणि श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देते. तिचे ऋण कधीही न फिटणारे आहे.

​आज वाढते प्रदूषण,जंगलतोड आणि वाढत्या तापमानामुळे आपली ही ‘वसुंधरा माता’ संकटात आहे. जर आपण आपल्या आईचे रक्षण केले नाही, तर आपले अस्तित्वही धोक्यात येईल.

” माझी वसुंधरा माझी आई ” हा विचार जेव्हा प्रत्येकाच्या मनात रुजेल, तेव्हाच ही पृथ्वी पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल.आपण आपल्या जन्मदात्या आईची जशी काळजी घेतो, तशीच काळजी या वसुंधरेची घेणे ही काळाची गरज आहे असे मला वाटते.

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here