Home महाराष्ट्र जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेत शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :...

जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेत शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : पालकमंत्री शंभूराजे देसाई

40

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)

म्हसवड(दि.18फेब्रुवारी):- माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभरात जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे . गतवर्षी या पदयात्रेचा प्रमुख कार्यक्रम पुणे येथे झाला होता तो यावर्षी स्वराज्याची चौथी राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये होत आहे यामध्ये जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी, विद्यार्थी, युवक- युवती, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार,खेळाडू, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, आचार आणि कर्तुत्व यांची माहिती तरुण पिढीला होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असून हा मेगा पदयात्रेचा प्रमुख कार्यक्रम घेण्याचा मान यावर्षी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांच्या शौर्याच्या गाथा या भूमीच्या कणाकणात आहेत अशा सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील सन्माननीय मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या मेघा पदयात्रेमध्ये जिल्ह्यातून जवळपास दहा हजार शिवप्रेमी सहभागी होणार आहेत आपणही सर्वांनी या मेगापद यात्रेमध्ये सहभागी होऊया आणि जाज्वल्य देशभक्ती, असीम शौर्य यांचा अभिमान जागवूया असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त “जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा” गांधी मैदान राजवाडा, सातारा ते शिवतीर्थ पोवईनाका सातारा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेगा पदयात्रेचा 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.45वा. गांधी मैदान राजवाडा, सातारा येथून प्रारंभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here