Home गडचिरोली जंगली हत्तीचा धुमाकूळ; आठ गावांतील शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त

जंगली हत्तीचा धुमाकूळ; आठ गावांतील शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त

174

▪️हत्तींचा तात्काळ बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा – जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.6फेब्रुवारी):-मौजा चिंचोली, मोहटोला, बेलगाव, रानखेडा, मौशीखांब, मरेगाव चक, मरेगाव, चांभार्डा व खैरी रिठ या गावांच्या शिवारात जंगली हत्तीने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हत्तीच्या अचानक झालेल्या प्रवेशामुळे उभी पिके तुडवली गेली असून अनेक शेतांमधील पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.

या घटनेमुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच अवकाळी पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरतेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या जंगली हत्तीच्या हल्ल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी हत्ती शेतात शिरल्याने नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित गावांतील नागरिकांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या घटनेची दखल घेत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच जंगली हत्तींचा त्वरित बंदोबस्त करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांसोबत आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी तालुकाध्यक्ष गडचिरोली वसंत राऊत , पांडुरंग समर्थ (अध्यक्ष, वन समिती मौशीखांब), बंडुजी लटारे (अध्यक्ष, वन समिती बेलगाव), शंकर नैताम (माजी पंचायत समिती सदस्य), जगदीश कुणघाडकर, पुंडलिक कोठारे (उपाध्यक्ष, वन समिती बेलगाव), अमृत वासेकर, परसराम कोठारे, शंकरराव भांडेकर, नाजुकराव जुमनाके, मुकुंदा नैताम, बाबुराव चौधरी, बाबुराव हरडे, भक्तदास खेवले, राजेश नानाजी, प्रदीप टेकाम, उमाजी वलादी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here