Home अमरावती पुढील पिढ्या मातृभाषेपासून दूर जाऊ नये यासाठी प्रयत्न आवश्यक-प्रा.डॉ.गणेश चव्हाण

पुढील पिढ्या मातृभाषेपासून दूर जाऊ नये यासाठी प्रयत्न आवश्यक-प्रा.डॉ.गणेश चव्हाण

129

▪️राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन संपन्न

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.12जानेवारी):-” शिक्षण, रोजगार आणि शहरी जीवनात इंग्रजी आणि हिंदीचे दिवसेंदिवस वर्चस्व वाढत चालल्यामुळे मराठीच्या वापरावर परिणाम होत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमुळे मराठीचा भाषिक आणि सांस्कृतिक पाया कमकुवत होत असून पुढील पिढ्या मातृभाषेपासून दूर जात आहेत. वाढत्या आधुनिकिकरणामुळे माणसाच्या जीवनशैली व विचारांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून त्याचा परिणाम मराठी भाषेच्या पारंपारिक स्वरूपावर होत आहे. एवढेच नव्हे तर आधुनिकीकरणामुळे महाराष्ट्रात विविध भागात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांवर प्रमाण मराठी, इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बोली भाषेचे मूळ स्वरूप बदलत आहे. रोजगारांच्या संधीसाठी आणि चांगल्या नोकरीसाठी इंग्रजी आवश्यक असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात, ज्यामुळे मराठीची उपेक्षा होत आहे. या शिक्षक साहित्य संमेलनातून मराठीचा जागर होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे .” असे विचार संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा डॉ. गणेश चव्हाण यांनी व्यक्त केले .

                ते श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचलित श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय,अमरावती तथा शिक्षक साहित्य संघ,महाराष्ट्र राज्य व मासिक शिक्षकमत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने

संपन्न झालेल्या ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात दि.१० जानेवारी २०२६ ला मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी श्री.शिवाजी शिक्षण महाविद्यालय,शिवाजी नगर,पंचवटी चौक,अमरावती

येथे अध्यक्षपदावरून व्यक्त करीत होते . 

        या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.गणेश चव्हाण,नागपूर,उद्घाटक

 मा.श्री हर्षवर्धन प्रतापसिंह देशमुख,अध्यक्ष,श्री शिवाजी शिक्षण,संस्था,अमरावती.

स्वागताध्यक्ष मा.ॲड.जे.व्ही. पाटील (पुसदेकर),उपाध्यक्ष,श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती असून विशेष अतिथी ॲड.गजाननराव पुंडकर, उपाध्यक्ष,श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती, प्रा. वसंतराव पुरके (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य),पदवीधर आमदार धीरज लिंगाडे डॉ.श्रीकांत तिडके,ज्येष्ठ साहित्यिक क्रीडामहर्षी मा.श्री.हेमंत डोणगावकर,डॉ. पूनम चव्हाण,प्राचार्य डॉ.विनय राऊत, मा.जयदीप सोनखासकर,मा.शरदचंद्र बिडकर प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे,प्रा.डॉ.किशोर क्षत्रीय

होते .

     अध्यक्ष, उद्घाटक, स्वागताध्यक्ष ,विशेष अतिथी, यांनी मातोश्री विमलाबाई देशमुख व डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. संमेलनाचे उद्घाटन उद्घाटक मा. हर्षवर्धन देशमुख यांनी दीप प्रज्वलित करून केले.

    स्वागतगीत व जिजाऊ वंदनेचे सौ.छाया पाथरे यांनी गायन केले 

.त्यांना तबल्याची साथ श्री माधवराव रेखे यांनी दिली.अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी ” भाऊसाहेब ” या स्वरचित वंदनगीताचे गायन केले .

       सर्व पाहुण्यांचे स्वागत शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.जयदीप सोनखासकर ,जिल्हाध्यक्ष शरदचंद्र बिडकर,उपाध्यक्ष प्रा. अरुण बुंदेले,प्राचार्य अतुल ठाकरे,गजेंद्र पाथरे ,प्रा. सुशीला मळसने,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन केले.

      या साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सोनखासकर यांनी केले.

         ‘शिक्षकमत’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले तसेच ह.बा.खंडारे,प्राचार्य डॉ. अतुल ठाकरे,ना.शी.उर्फ भारतभूषण चाफेकर,प्रा.सुशीला मळसने या लेखक व कवींच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

      याप्रसंगी उद्घाटक मा. हर्षवर्धन देशमुख,मा.वसंतराव पुरके,श्रीकांत तिडके ,मा.जे. व्ही.पाटील (पुसदेकर ),क्रीडा महर्षी हेमंत डोणगावकर यांनी मनोगत व्यक्त केले व या संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

             कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ.मंदा नांदुरकर व प्रा.सुरेंद्र पाथरे यांनी केले तर आभार शरदचंद्र बिडकर मानले.

     या साहित्य संमेलनाला श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, शिक्षक साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी नागपूर,लातूर,संभाजीनगर,वर्धा, नांदेड ,बुलढाणा येथील पदाधिकारी तसेच अमरावती व अमरावती जिल्ह्यातील साहित्यिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

          या साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी तसेच शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्य व अमरावती जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here