


▪️महाराष्ट्रातील बौद्ध स्थापत्य : एक ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय अभ्यास ग्रंथाचे प्रकाशन
✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.7डिसेंबर):- हजारो वर्षांपासून आमच्या संपन्न इतिहासाचा, बहुजनांच्या संस्कृती सभ्यतेचा वारसा असणाऱ्या बौद्ध स्थापत्य आणि स्थापत्यांचे आकलन नव्याने मांडणे आवश्यक आहे. बहुजनांच्या संस्कृती सभ्यतेत स्त्रियांना अत्यंत मानाचे आणि प्रभावी स्थान होते. नंतरच्या काळात मात्र बाहेरून आलेल्या ब्राम्हणी प्रवृत्तीच्या अतिक्रमणांनी बहुजन इतिहासाची सोयीप्रमाणे मांडणी करण्यात आली. परिणामता बहुजनांचा वारसा धोक्यात आला. बाहेरून आलेल्या ब्राह्मण लोकांनी जात आणि वर्णव्यवस्था निर्माण केली. मानवी शोषणाचे सर्वात मोठे प्रतिक म्हणजे मनुस्मृती होय. आजही मनुस्मृतीचे वाहक बौद्ध लेण्यांचे ब्राह्मणीकरण करत आहेत. विषमतावादी समाज निर्मितीमध्ये ब्राह्मणशाहीचे योगदान मोठे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ दिशादर्शक विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
ते बौद्ध लेणी… समृद्ध वारसा… या उपक्रमांतर्गत धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि सत्यशोधक इतिहास परिषद, आयोजित श्रावस्ती प्रकाशन, प्रकाशित इतिहास संशोधक डॉ. कपिल राजहंस, लिखित महाराष्ट्रातील बौद्ध स्थापत्य : एक ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय अभ्यास या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बौद्ध लेण्यांचे ब्राह्मणीकरण या विषयावर जाहीर व्याख्यानात बोलत होते.
कार्यक्रमांचे अध्यक्ष कवी, लेखक व प्रकाशक अनिल म्हमाने म्हणाले, भारतातील सध्याची सामाजिक परिस्थिती प्रचंड धर्मांध झाली असून बौद्ध लेण्यासह इतर समतावादी प्रतीकांचं ब्राह्मणीकरण आणि धर्मांधतीकरण करणे जोरदारपणे सुरू आहे. हे लोकशाहीला घातक आहे.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. डी. वाय. जमादार, डॉ. प्रवीण कोडोलीकर, विजय कुशाण, ॲड. डॉ. शोभा चाळके, डॉ. मिनल राजहंस, अॅड. करुणा विमल, निलेश बनसोडे, अंतिमा कोल्हापूरकर, डी. के. बोडके, विश्वास तरटे, मदन पवार, डॉ. दयानंद ठाणेकर, संतोष गोठल आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक ॲड. करुणा विमल यांनी केले. सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर, अंतिमा कोल्हापूरकर यांनी तर आभार डॉ. मिनल राजहंस मानले.














