Home महाराष्ट्र शिंदेचे फोडाफोडीचे राजकारण बुमरॅन्ग होत आहे!-ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे मनोगत !!

शिंदेचे फोडाफोडीचे राजकारण बुमरॅन्ग होत आहे!-ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे मनोगत !!

152

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

ज्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना ओळख, मान सन्मान व अलोट संपत्ती दिली, त्याच शिवसेना प्रमुखांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली, त्याच एकनाथ शिंदे यांच्यावर ही फोडाफोडी बुमरँग सारखी उलटताना दिसत आहे.

उल्हासनगर भाजपचे चार दिग्गज तसेच ज्येष्ठ नेते तसेच माजी नगरसेवक फोडण्याची दुर्बद्धी शिंदे यांना झाली. आणि हीच दुर्बद्धी शिंदेचा काळ ठरू पाहत आहे. त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे.

बिहार राज्याच्या निवडणुकीनंतर भाजपचा आत्मविश्वास अतिशय बळावला असून भाजपा प्रचंड आक्रमक झाला आहे. त्यात भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी “आत्ता कुबड्यांची गरज नसल्याचे” जाहीर करून फुटीर शिंदे सेनेस व अजित पवार राष्ट्रवादीस गर्भित इशारा दिला आहे. एकप्रकारे तुमची सद्दी संपली असेच सूचित केले आहे. पूर्वी शिन्देनी शिवसेना उबाठाचे पदाधिकारी व आमदार, नगरसेवक फोडून आपल्या गद्दार सेनेत सामील करून घेण्याचा सपाटा लावला होता. परंतू आत्ता उलटी गंगा वाहू लागली आहे. शिंदे यांची एक्सपायरी डेट जवळ आली आहे,याची चाहूल बुडणाऱ्या जहाजातील उंदरांप्रमाणे शिंदे सोबत गेलेल्या गद्दार राजकारण्यांना झाली आहे. आत्ता शिंदेचे लोक फुटत असून ते भाजपात जाण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. ऑपेरेशन लोटस विरुद्ध ऑपेरेशन धनुष्यबाण हा फोडाफोडीचा गोरख धंदा जोरात आला आहे. विशेषतः रविंद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून या ऑपरेशन शिंदेने जोर धरला आहे. कल्याण डोंबिवली, ठाणे उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर मध्ये शिंदेचे मोहरे गळाला लावण्यात चव्हाण यांना यश येत आहे.

सद्याच्या नगरपालिका निवडणुका ह्या आगामी महापलिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. कारण भाजपाला मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीसह सर्व महापालिकांवर एकछत्री सत्ता हवी आहे. त्यात त्यांना शिंदे व पवार यांची ही भागीदारी नको आहे. त्यासाठीच भाजपने युती/आघाडी धर्म चुलीत घालत नगरपालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत शिंदे सेनेस अस्मान दाखवून त्यांना लायकीत ठेवण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. लोकसभा व विधान सभा निवडणुका भाजपा सोबत लढल्याने शिंदेसेना व अजित पवार गटास अनपेक्षितपणे लक्षणीय यश मिळाले. स्वतंत्र लढल्यास शिंदे व पवार यांना भाजपचा “एनर्जी बुस्टर डोस” मिळणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे सेना व अजित पवार राष्ट्रवादी यांची अवस्था पिसारा गळून पडलेल्या मोरा सारखी होईल. शिंदे सेना व पवार राष्ट्रवादी ही भाजपच्या वृक्षावर पोसली गेलेली बांडगुळं आहेत, हे भाजपणे ओळखले आहे. आत्ता आपली वाढ रोखणारी ही बांडगुळं उखडून फेकून देण्याच्या मानसिकतेत भाजपा आहे.

ज्या न्यायाने भाजपने शिंदेंचा वापर करून शिवसेना फोडली, ज्या तंत्राचा वापर करून अजित पवारांच्या कुऱ्हाडीने राष्ट्रवादी फोडली, ज्या पद्धतीने हे दोन्ही भाजपा आश्रित पक्ष वेगळे केले,त्याच कपटनीतीचा वापर करून भाजपा प्रामुख्याने शिंदे यांची सेना फोडत सुटली आहे. या फोडाफोडीच्या ज्वालामुखीचा केंद्रबिंदू उल्हासनगर ठरला. एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर भाजपचे दिग्गज व ज्येष्ठ नेते जे पाच-पाच वेळा निवडून आलेत, अश्या जमनू पुरस्वानी,प्रकाश माखीजा, चार्ली पारवानी व महेश सुखरामानी यांना फोडून शिंदे सेनेत घेतले.त्याचा वचपा काढण्यासाठी शिंदे सेना खिळखीळी करण्याचा सिलसिला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुरू केला. त्यामुळे शिंदे सेनेस अखेरची घरघर लागली आहे. त्यांनी दिल्लीला जाऊन अमित शाह यांच्या पायावर लोटांगण घातले परंतू शतप्रतिशत भाजपाचा अजेन्डा राबवणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना रोखण्याएवढे शाह हे अडाणी नाहीत. शिंदेना हात हलवत दुर्मुखलेल्या तोंडाने परत यावे लागले. त्यामुळे रवींद्र चव्हाण दुप्पट तिप्पट जोमाने शिंदे सेनेस पोखरू लागले. रोजच्या रोज प्रवेशाचा धुमाकूळ वर्षां पासून ठाण्यापर्यंत घालणारे शिंदे आपलेच गद्दार पुन्हा शिंदेशी गद्दारी करताना पाहून चडफडत आहेत.

पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहणारे एकनाथ शिंदे मुंगेरीलाल के हसीना सपने पाहता पाहता मुंगेरीलाल झाले. भाजपने विविध मार्गाने त्यांच्या फ़ांद्या छाटण्यास आधीच सुरुवात केली होती, आत्ता बुंध्यावर घाव घातले जात आहेत. आत्ता झाड कोसळणार याची कल्पना येताच स्थलांतरित पक्षी भाजपच्या सुरक्षित व फळांनी लगडलेल्या वृक्षाचा आश्रय घेऊ लागले आहेत. एकनाथ शिंदे यांनी जे पेरले त्याची विषारी फळं आत्ता येऊ लागली आहेत.

पुढील निवडणुकी पूर्वी शिंदे निष्पर्ण झाड नव्हे तर एक ओंडका म्हणून शिल्लक राहील.

भाजपने शिंदेंना डोक्यावर घेऊन शिवसेना फोडण्याची हंडी फोडली, आता त्यांना पायदळी तुडवून भाजपा सत्तेची हंडी फोडून सत्तेचे लोणी फस्त करणार, यात मला तरी संदेह नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here