Home महाराष्ट्र शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेने शिवसैनिकांत उत्साह संचारला!-ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर...

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेने शिवसैनिकांत उत्साह संचारला!-ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे मनोगत !!

227

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

अंबरनाथ(दि.29नोव्हेंबर):- नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव सेनेत उत्साहाचा अभाव होता. एकप्रकारची मरगळ आली होती. त्याची कारणमिमांसा मी या पूर्वीच्या लेखात केली होती.

काल शिवसेनेच्या fire brand नेत्या सुषमा अंधारेंच्या दोन सभा अंबरनाथ पूर्व व पश्चिमेस झाल्या. या दोन्ही सभा शहराच्या मध्यवर्ती भागात न होता गल्ली सदृश्य रस्त्यांवर झाल्याने त्यांच्या लौकिकास साजेशी गर्दी झाली नाही. दोन्ही ठिकाणी फक्त शिव सैनिक व उमदेवार हेच होते. सर्वसामान्य जनतेने या सभांकडे पाठ फिरवली. या सभेत व्यासपीठावर नेत्यांची भाऊगर्दी होती. त्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून १५ लाख घेतलेला होता, तसेच लादलेला नेतृत्वहीन व निष्प्रभ असा उप जिल्हा प्रमुखही होता. अनेकांनी विनाकारण व्यासपीठ अडवल्याने कित्येक उमेदवारांना उभे राहून सभा ऐकावी लागली.

शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अंजली राऊत असून शिव सेनेचे २५ व मनसेचे ११ असे ३६ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. अश्या प्रकारे ५९ पैकी ३६ जागी निवडणूक लढवून २३ जागा विरोधकांना आंदण दिल्याप्रमाणे सोडून दिल्या आहेत. या वरूनच स्थानिक नेत्यांची पराभूत मानसिकता दिसून येते. अश्या परिस्थितीत पक्ष व कार्यकर्त्यांत मरगळ निर्माण होणे स्वाभाविक होते.

कालच्या सभांनी शिव सैनिकांच्या मनावर निर्माण झालेली मरगळ काही प्रमाणात झटकली गेली आहे. आम्ही जिंकणारच असा निर्धार व्यक्त करण्याऐवजी या ही परिस्थितीत आम्ही लढणारच! असा आशावाद व्यक्त केला. सुषमा अंधारे या fire brand नेत्या आहेत, त्यांचे वक्तृत्व घणाघाती, मुद्देसूद, अभ्यासपूर्ण असल्याने ते नेहमी प्रभावी ठरते. मी त्यांच्या वक्तृत्व शैलीने प्रभावित असल्याने डोंबिवली ते अंबरनाथ परिसरातील त्यांची सभा चुकवत नाही. त्या ज्या ज्या भागात जातात तिथला सखोल अभ्यास व माहिती घेऊनच त्या व्यासपीठावर विश्वासाने ठामपणे उभ्या राहतात. त्यांचे मुद्धे पटवून देण्याचे कौशल्य व विषयाची सखोल माहिती, ओघावती भाषा, त्याला साजेसे हावभाव श्रोत्यांना प्रभावित करतात. एकदा तर मी त्यांच्या व्यासपीठावर भाषण केले होते, त्याला त्यांनी दाद दिली होती. काल त्यांची सदिच्छा भेट घ्यावी म्हणून मी सभेनंतर थांबलो परंतु त्यांची माझी भेट होऊ नये म्हणून त्यांची परतण्याची दिशा बदलण्याचे काम स्थानिक आत्मकेंद्रित नेत्याने केले. माझे सर्व लेख सुषमा अंधारे या आवर्जून वाचत असतात. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा हेतू होता. एरवी मी कोणत्याच सभा वा कार्यक्रमानंतर रेंगाळत नाही. लगेच निघून जातो. उलट माझे वाचक व चाहते मला गराडा घालतात.

हे थोडे विषयांतर झाले. आत्ता मुळमुद्दा असा की, सुषमा अंधारे यांचे भाषण प्रभावी झाले, स्थानिक सुडाच्या राजकारणाचा त्यांनी यथेच्छ समाचार घेतला. आमदार किणीकर व वाळेकर यांच्या सुडभावनेने शहराचा विकास होणार नाही,असे सांगताना, भाजपचाही त्यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री फडणवीस हे विश्वासपात्र नाहीत, भाजपला पैश्याचा माज आला असला तरी आमचे लोक विकले जाणारे नाहीत, ते निस्थेने टिकून आहेत. भाजपचे हिंदुत्व बेगडी आहे, आमच्या उमेदवारांचे चेहरे बघा त्यात एकही बिल्डर नाही, एकही घोटाळेबाज नाही, एकही ठेकेदार नाही. आम्ही पैसे वाटू शकत नाही परंतू आमचे नगरसेवक निवडून आल्यावर ते 24x 7 आपल्या सेवेसाठी धावून येतील, कोणत्याही संकटात तुमच्या पाठीशी उभे राहतील, अशी ग्वाही त्यांनी अंबरनाथकरांना दिली. 

या भाषणामुळे उबाठाच्या शिवसैनिकांत जोश निर्माण झाला, मरगळ झटकली गेली. धनशक्ती, गुंडशक्ती विरोधात लढण्यासाठी हे भाषण कितपत उपयोगी ठरते, हे ३ डिसेंबर च्या निकाला वरूनच कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here