


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रहमपुरी(दि.17नोव्हेंबर):-गोसीखुर्द उजवा कालवा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्या सायगाटा कार्यालयात दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या ऑनलाइन कॉन्फरन्स बैठकीत पाणी सोडण्याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली.
दि.30 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेला निर्णय रद्द करून सन 2025-26 हंगामाकरिता कालव्याचे पाणी सोडण्यात यावे, या मागणीसंदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ.विनोद झोडगे यांनी निवेदन दिले होते. त्या निवेदनावर कार्यवाही करत कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द उजवा कालवा विभाग ब्रम्हपुरी यांनी उत्तर दिले आहे की, झालेल्या बैठकीत मा. मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प जलसंपदा विभाग नागपूर यांच्या ब्रम्हपुरी येथील चर्चेनुसार 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत गोसेखुर्द उजव्या कालव्यातील पाणी उन्हाळी हंगामात देण्या संबंधी निर्देश दिले जाणार आहेत असे भ्रमण ध्वनी द्वारे झालेल्या चर्चेत मुख्य अभियंता गवळी यांनी स्पष्ट केले आहे.
त्या अनुषंगाने सुरू असलेले आंदोलन थांबवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर पत्रावर कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द उजवा कालवा विभाग, ब्रम्हपुरी यांनी स्वाक्षरी केली असून शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
यावेळी चर्चा करतांना विनोद झोडगे,योगेश्वर ठाकरे, डॉ.संजय पारडवार,प्रतीक डांगे , लोमेश मेश्राम, भय्याजी पाल, यासह ब्रम्हपुरी विभागातील 300 शेतकरी उपस्थित होते.20 नोव्हेंबर पर्यंत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास सायघटा येथील गोसेखुर्द उजवा कालवा प्रकल्प कार्यालयाला ताला ठोखो आंदोलन करून मेन हायवे रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे.














