Home महाराष्ट्र जिथे लाभ असतो तिथे लोभ असतोच…’

जिथे लाभ असतो तिथे लोभ असतोच…’

211

कपिल मुनींनी ५०० चोरांच्या समूहाला सकारात्मक उपदेश देऊन त्यांचे ज्ञानचक्षु उघडले. ‘जिथे लाभ तिथे लोभ असतो…’ ही महत्त्वाची शिकवण ‘उत्तराध्ययन सूत्रा’च्या अध्यायात सांगण्यात आलेली आहे. आजच्या धर्मप्रवचन सभेत ‘उरभ्रीय अध्ययन’, ‘कापिलीय अध्ययन’ आणि ‘नमि प्रव्रज्या अध्ययन’ अशा सात ते नऊ अध्यायांचे वाचन व विश्लेषण प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. व प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी केले. या समवेतच श्रावक-श्राविकांनी उत्तराध्ययन सूत्रातील सर्वच अध्यायांचे किमान नावे तरी लक्षात ठेवावे, असे आवाहन देखील करण्यात आले. सातव्या अध्यायात अनासक्ती जीवनाचे महत्त्व सांगितले. यात मेंढीच्या पिलाचे प्रतीक सांगण्यात आले. एका श्रीमंत व्यक्तीने गाय वासरू आणि मेंढीचे पिल्लू पाळले होते. दूध देणाऱ्या गायीला सुकलेला चारा तर मेंढ्याच्या पिल्लाला हिरवा चारा खाऊ घातला जाई. ते पिल्लू चांगल्या आहारामुळे धष्टपुष्ट झाले. तो मोठा व वजनदार झाल्यावर त्या मेंढ्याच्या गळ्यावर सुरी चालविली गेली. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत आसक्ती ठेऊ नये, असा मोलाचा दाखला यावेळी दिला गेला.

छोट्याशा मुखासाठी मोठ्या सुखापासून वंचित राहणारे या जगतात अनेक असतात. आंब्याच्या क्षुल्लक सुखासाठी राजाने जगण्यासारखे मोठे सुख त्यागून मृत्यूला कवटाळतो. हा दाखला यावेळी देण्यात आला. मनुष्य जन्म अनमोल असतो, मोक्षपथावर चालून मिळालेला जन्म सार्थक करावा. हा मोठा संदेश उत्तराध्यायन सुत्रात मिळतो. आठव्या अध्यायात कपिल मुनींचे वर्णन आलेले आहे. लोभ आणि लाभ यांच्या परिणामाबद्दल सांगितले. जेवढा जास्त लाभ, तिथे जास्त लोभ. कंचन (सोने) आणि कामिनी (स्त्री) यात अडकायचे नाही, असा उपदेश कपिल मुनींनी ५०० चोरांना दिला. नवव्या अध्यायात नमी राजर्षी यांचे १० प्रश्न आणि त्यांची उत्तरे इत्यादी सांगण्यात आले. नमी राजाला इंद्र ब्राह्मण रूपाने येऊन दहा प्रश्न विचारतो. त्या प्रत्येक प्रश्नाला आपल्या अनुभव, ज्ञान व बुद्धीच्या कौशल्याने चपखल उत्तर देतो. नमी राजाने अत्यंत स्पष्ट आणि तत्त्वज्ञानयुक्त उत्तरांनी इंद्राला प्रभावित केले. या संवादातून जैन धर्मातील आत्मज्ञान, वैराग्य आणि मोक्षमार्ग यांचे सार या अध्यायात मिळतो.

याच प्रवचन सभेत उत्तराध्ययन सूत्राच्या नवव्या अध्यायापर्यंत तोंडपाठ गाथा नमिता रुणवाल, लता बनवट, समता रुणवाल तसेच संगिता खिंवसरा यांनी सादर केल्या.(ऑक्टोबर १०: २०२५जळगाव, महाराष्ट्र)

✒️शब्दांकन:-किशोर कुलकर्णी(मो:-9422776759)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here