Home महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या संघर्षानंतर अखेर माणच्या पूर्व भागाला पाणी मिळालं

शेतकऱ्यांच्या संघर्षानंतर अखेर माणच्या पूर्व भागाला पाणी मिळालं

297

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड/सातारा : तारळी सिंचन योजनेच्या अन्यायकारक पाणीवाटपाविरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानंतर केवळ 24 तासांतच आज सकाळी माण तालुक्याच्या पूर्व भागात शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या वर्षभरात तारळी योजनेचा थेंबभर पाणीही न पाहिलेल्या वळई, जांभूळणी, बनगरवाडी, शिरताव, देवापूर, पळसावडे या गावांना अखेर जीवनदायी पाणी मिळाले आहे. “नाक दाबल्यावर तोंड उघडते,” या म्हणीप्रमाणेच – शेतकऱ्यांच्या तीव्र भूमिकेमुळेच प्रशासनाला हलवावा लागला, असा रोखठोक सूर स्थानिकांमध्ये आहे.

महेश करचे यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, पाणी न मिळाल्यास 30 एप्रिल रोजी जनावरांसह अर्धनग्न आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने जलसिंचन विभागावर दबाव आणत तातडीने पाणी सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

या घडामोडीमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून, शेतकऱ्यांच्या संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही, ही खंतही व्यक्त होत आहे.

“कृतीशून्य आश्वासनांपेक्षा प्रत्यक्षात पाण्याचा एक थेंब अधिक मौल्यवान असतो,” असा टोलाही शेतकऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेला लगावला आहे.

या सकारात्मक घडामोडीने पाणीटंचाईत होरपळणाऱ्या माण तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असला, तरी भविष्यातही पाणी नियोजन न्याय्य पद्धतीने व्हावे, हीच शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here