Home महाराष्ट्र मान्यवर साहेब कांशीराम यांचा जीवन संघर्ष

मान्यवर साहेब कांशीराम यांचा जीवन संघर्ष

321

बिशन कौर आणि हरी सिंह यांच्या पोटी एक रत्न जन्माला आले, त्यांचे नाव कांशीराम. त्यांचा जन्म दिनांक 15 मार्च 1934 रोजी खवासपूर, जिल्हा रोपड, पंजाब प्रांतात झाला. कांशीराम यांना तीन भाऊ व चार बहिणी होत्या, कांशीराम यांचे प्राथमिक शिक्षण मलकपूर येथे तसेच उच्च शिक्षण गव्हर्नमेंट कॉलेज रोपड येथे झाले. येथून ते बीएससी होऊन कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने पास होऊन गोल्ड मेडल प्राप्त केले.

घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांना नोकरी करावी लागली. त्यांना पहिली नोकरी जबलपूर येथे मिळाली. तेथे त्यांना परसराम ज्ञानी भेटले दोघेही एकाच रूममध्ये राहू लागले. परसराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने भारावून गेले होते आणि चळवळी मध्ये काम करीत होते.

   एक दिवस त्यांना बातमी कळाली की बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. परसराम ज्ञानी बेचैन झाले. काही खात नव्हते. खाणे- पिणे सोडले. नेहमी उदास राहायचे. काशीराम यांना वाटले की परसराम यांचे कोणीतरी जवळचे नातेवाईक वारले असेल. शेवटी कांशीरामने यांना विचारले, काय झाले, तेव्हा ज्ञानी यांनी सगळी हकीकत सांगितले कांशीराम यांना दुःख झाले, पण डॉक्टर आंबेडकर कोण होते हे त्यांना माहीत नव्हते. परसराम म्हणाले की मी आता नोकरी सोडणार पत्नीला सुद्धा सोडणार, तेव्हा कांशीराम यांनी परसरामला समजाविले की असे काही करू नको. शेवटी परसराम यांनी निर्णय घेतला की मी नोकरीचा राजीनामा देणार. पत्नीला घटस्फोट देणार नाही, परंतु मी अपत्य जन्माला घालणार नाही. कांशीराम यांनी आपला अर्धा पगार परसरामला देण्याचे ठरविले. कांशीराम हे आपला अर्धा पगार नियमितपणे मनी ऑर्डरने परसरामला पाठवू लागले. परंतु एक दिवस परसराम यांचे पत्र आले त्यात असे लिहीले होते की मला मनुवादी लोकांनी खूप मारले, माझी हालत खराब करून टाकली. नंतर मनी ऑर्डर सुद्धा वापस आली. तेव्हा कांशीरामने ओळखले की परशराम आता हयात नाहीत.

   कांशीराम यांनी नंतर पुणे येथे ऑर्डिनेंस फॅक्टरी येथे संशोधक या पदावर रुजू झाले. परंतु येथे सुद्धा त्यांना खूप वाईट अनुभव आला या कारखान्यात दिना भाना जो राजस्थान येथील होता व जातीने भंगी होता, त्याला साफसफाईचे काम दिले होते. परंतु त्याला ते काम आवडत नव्हते. दिना भाना कांशीराम यांना भेटले व काम बदलण्याची विनंती केली. कांशीराम यांनी त्याला प्रशिक्षण दिले व लॅब सहाय्यक या पदाची नोकरी दिली. व्यवस्थापनाने या कारखान्यात नियमित चालू असलेल्या दोन सुट्ट्या म्हणजे एक बुद्ध जयंती व दुसरी आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्या रद्द केल्या व या ऐवजी टिळक व दिवाळीची सुट्टी देण्यात आली. यावर कामगार संघटनेने आक्षेप घेतला व पहिल्या ज्या सुट्ट्या होत्या त्या तशाच ठेवा अशी व्यवस्थापनाला विनंती केली. परंतु काही फायदा झाला नाही. याचा परिणाम असा झाला की दीना भानाला निलंबित करण्यात आले. दिना भाना कांशीराम कडे गेले व त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. हे सर्व ऐकून कांशीराम अतिशय दुःखी झाले. शेवटी केस कोर्टात गेली व कांशीराम यांनी ती केस दिना भानाला जिंकून दिली व सर्व खर्च स्वतः केला.

  परंतु या घटनेने कांशीराम बेचैन झाले. त्यांनी बाबासाहेबाचे काही पुस्तक मागितले, त्यावेळी चळवळीत असलेले डि के खापर्डे यांनी ‘जातीचे निर्मूलन” हे बाबासाहेबांचे पुस्तक दिले. कांशीराम यांनी ते पुस्तक त्याच रात्रीत चार-पाच वेळा वाचून काढले. त्यांच्या मनात चल बिचल सुरू झाली. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की मी माझे संपूर्ण आयुष्य समाजाकरता खर्च करेल. कांशीराम यांनी आपल्या आईला पत्र लिहिले व सांगितले की मला सेहरा नाही तर कफन पाहिजे व असा निर्धार केला की,

 १. मी आजीवन लग्न करणार नाही.

२. कोणत्याही प्रकारची, कोठेही संपत्ती जमा करणार नाही.

3. मी कोणाच्याही जन्म- मृत्यूला जाणार नाही.

४. मी माझे पूर्ण आयुष्य समाजाला अर्पण करणार आहे.त्यांनी आरपीआय मध्ये काम करायला सुरुवात केली. अनेक बैठका घेतल्या. परंतु त्याकाळी जे कार्यकर्ते होते, त्यांनी काँग्रेस सोबत युती करण्याचे ठरविले व ती युती पुणे येथे संत गाडगेबाबा धर्मशाळेत घेण्याचे ठरले. कांशीराम सुद्धा त्या युतीत काय होणार आहे म्हणून बघायला गेले होते. परंतु जो अंतिम निर्णय झाला त्यामुळे कांशीराम फार फार दुःखी झाले कारण ५२१ खासदारांच्या जागेपैकी फक्त १ जागा बाबासाहेबांना मिळाली व ५२० जागा गांधींना देण्यात आल्या.या युतीने कांशीराम नाराज झाले व शेवटी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना काही स्थान नाही म्हणून ते उत्तर प्रदेशात गेले.

   उत्तर प्रदेशात ते तीन महापुरुषांना घेऊन गेले एक महात्मा फुले, दोन राजश्री शाहू महाराज व तिसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

उत्तर प्रदेशातील लोक त्यांना टायवाले बाबा, धोतीवाले बाबा व फेटेवाले बाबा म्हणून लागले. टायवाले बाबांना ते लोक थोडेफार ओळखत होते. परंतु इतर दोघांना ते लोक ओळखत नव्हते. कांशीराम यांनी या तिन्ही महापुरुषांचे विचार तेथील लोकांना समजावून सांगितले. कांशीराम यांनी अर्धी लढाई या महापुरुषांच्या विचारावर जिंकली. शोषित समाजाची लढाई लढण्यासाठी सामाजिक संघटनाची आवश्यकता असते. तेव्हा 1973 ला कांशीरामने बामसेफ नावाची संघटना स्थापन करण्याचे ठरविले व त्याला ६ डिसेंबर 1978 मध्ये मूर्त रूप दिले. बामसेफ हि संघटना नॉन- पॉलिटिकल,नॉन -रिलीजियस नॉन एजिटेशनल आहे. बामसेफ संघटन पाच वर्षात खूप वाढले.जवळपास दोन लाख दहा हजार कर्मचारी या संघटनेचे सदस्य झाले.हे सदस्य समाजाला जागृत करण्याचे काम करू लागले.

  सुरुवातीला कांशीराम यांनी पुणे येथे एक कार्यालय सुरू केले. खूप हाल -अपेष्टा सहन केल्या. स्कूटर होती ती विकून टाकली व सायकल घेतली. एक वेळ अशी आली की त्यांना रेल्वे स्टेशनला जायचे होते, सायकल घेतली व बघितले तर त्यात हवा नव्हती, खिशात पैसे पाहिलं तर काहीच नव्हते. त्यांचा रूम मेट मनोहर साठे यांना विचारले पण त्यांच्याजवळ देखील पैसे नव्हते. त्यांनी इकडे तिकडे, ड्राव्हर वगैरे बघितले पण कोणाजवळ पाच पैसे सुद्धा सापडले नाही. शेवटी कांशीराम पायीच रेल्वे स्टेशनला निघाले. कारण मुबंईला त्यांना एक महत्वाची मिटिंग होती. त्यांच्या अंगावर धड कपडे नव्हते. पायात धड चप्पल नव्हती. वेळेवर जेवण मिळत नव्हते. उपाशीपोटी झोपावे लागे. थंडीचे दिवस होते,ते एखादा थंडीचा कपडा शोधत होते परंतु तो खूप महाग होता. कांशीराम दुकानदाराला म्हणाले कि 50-60 रुपयापर्यंत बघा. तेव्हा तो दुकानदार म्हणाला कि स्मशान भूमीत जा तेथे मिळेल. कांशीराम तेथे खरोखरच गेले व तेथील एक कोट घेतला. किती वाईट परिस्थिती होती कांशीराम यांची. ते कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार होते कारण काशीराम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अधूरे कार्य पुरे करायचे होते. ते बाबासाहेबांच्या विचाराने भारावून गेले होते.

कांशीराम यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे असे तीन टप्पे आहेत. 

पहिला टप्पा बामसेफ दुसरा डीएस -४ आणि तिसरा टप्पा बहुजन समाज पार्टी. डीएस -४ (दलित शोषित समाज संघर्ष समिती) ची स्थापना मुद्दाम ६ डिसेंबर १९८० रोजी करण्यात आली.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या त्यागातून देशातील तमाम दलित समाजाला सन्मानाचे जीवन दिले आहे.त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात अपार कृतज्ञता निर्माण होणे आवश्यक आहे. डीएस -४ च्या माध्यमातून समाज अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध जागृती करण्यासाठी उभा राहील.डीएस -४ च्या तीन विंग बांधण्यात आल्या,१. प्रबोधन शाखा,२. विद्यार्थी शाखा आणि,३. महिला शाखा.डीएस -४ च्या बॅनर खाली निवडणूक लढवायला लावली. हरियाणा- 46 जागा तर हिमाचल प्रदेश -16 उमेदवार उभे केले. 24 सप्टेंबर 1982 रोजी पुणे येथून ‘पुणे करार धिक्कार दिवस” कार्यक्रमाची सुरुवात करून 24 ऑक्टोबर 1982 रोजी जालंदर येथे समारोप झाला. पे बॅक टू सोसायटी हा सुद्धा कार्यक्रम सुरू झाला.

  कांशीराम यांनी सायकल रॅली काढली, स्वतः ४२०० किलोमीटर अंतर पार केले. डीएस -४ ने उच्चवर्णीय आणि शतकानू शतके तुमचा अपमान करणाऱ्या लोक म्हणीच्या विरोधात त्यांनी तयार केलेले नारे बुलंद झाले. तेव्हा उच्चवर्णीय समाज खजील होताना दिसला. त्यांचे काही नारे: १. “वोट हमारा, राज तुम्हारा नही चलेगा, नही चलेगा”, 

2. “जयभीम का नारा है,सारा देश हमारा है”, 

3. “जिसकी जितनी संख्या भारी,उसकी उतनी भागीदारी”,

4. “बाबा तेरा मिशन अधुरा,कांशीराम करेगा पुरा”, 

5. “अब बहुजन की बारी है, ईक्किसवी सदी हमारी है”.

  कांशीराम पंजाब मधील रोपड जवळ बामसेपची बैठक आयोजित करण्यासाठी गेले होते.तेव्हा कोणीतरी त्यांच्या वडिलांना सांगितले की तुमचा मुलगा कांशीराम मोठी सभा घेण्यासाठी येत आहे.त्यांचे वडील कांशीरामला ऐकण्यासाठी गेले.ते दृश्य बघून हरी सिंह भारावून गेले.हा प्रसंग 24 ऑक्टोबर 1982 चा आहे.कांशीराम यांनी “पुणे करार धिक्कार दिवस” आयोजित केला होता.जमावाबरोबर सरदार हरी सिंह सुद्धा घराकडे निघाले. गावी परत जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले.परंतु आपल्या संकल्पाची जाणीव ठेवून कांशीराम वडिलांच्या अंत्यविधीला गेले नाहीत. मी जो निर्धार केला आहे की आजन्म घरी परतणार नाही, तो निर्धार मला तोडायचा नाही असे कांशीराम म्हणाले.

   राजकीय पक्ष: बहुजन समाज पार्टीची स्थापना सत्ताधारी समाज निर्माण होण्यासाठी झाली.14 एप्रिल 1984 रोजी हा पक्ष स्थापन करण्यात आला. देशात असणाऱ्या सर्व प्रमुख आणि प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व हे ब्राह्मण समाजाच्या हाती होते.इतर लोकांना सवर्णाच्या अधीन राहूनच काम करावे लागत असे.आपलेच लोक इतर पक्षात जाऊन आपल्याच समाजावर होणारा अन्याय सहन करीत होते.

   आपल्या देशात सर्व लोकशाहीवादी दिसतात.पण आतून ते संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी आहेत. म्हणूनच बसपा हा देशातील एकमेव असा राजकीय पक्ष आहे की ज्याचे नेतृत्व दलिताच्या हाती आहे.जो बहुजन हिताय बहुजन सुखाय साठी काम करेल. काशीराम यांनी बामसेफच्या माध्यमातून पैसे मेंदू आणि कौशल्य यातून बहुजन समाजाला एका झेंड्याखाली आणि एका वैचारिक राजकीय विचारावर एकत्र करायला सुरुवात केली. ज्यामध्ये हजारो जाती-धर्माचे लोक समाविष्ट आहेत. बहुजन समाज पक्ष हा राजकीय पक्ष आहे पण आधी चळवळ आहे. असे कांशीराम पुन्हा पुन्हा सांगत असत. म्हणूनच देशातील महापुरुष गौतम बुद्ध,संत रविदास, संत कबीर, गुरुनानक,संत तुकाराम, नारायण गुरु, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, पेरियार रामास्वामी नायकर, गुरु घाशिदास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर 14 एप्रिल 1984 रोजी बहुजन समाज पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना केली. 25 जून 1984 ला दिल्लीत पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

   पक्षाचे ध्येय धोरण देखील जनतेला समजावून सांगण्यात आले. आता राम राम न म्हणता जय भीम म्हणायची सवय लावायला हवी. अशी शिकवण याच अधिवेशनात पक्षाच्या लोकांना देण्यात आली. कारण भीमाने देशातील दीन- दलित लोकांसाठी आपल्या आयुष्याची आहुती दिली आणि भारताला जगातील सर्वात महान असे संविधान दिले. याच अधिवेशनात काका कालेलकर यांच्यानंतर स्थापन झालेल्या मंडल आयोगाच्या शिफारशी कलम 340 अन्वये लागू करण्याचे मागणी करण्यात आली. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपद सोडले, तरीही ओबीसी आरक्षण लागू झाले नाही हे सुद्धा सांगितले.आता देशातील 3443 मागास जातीचे प्रकरण होते जे बहुजन समाजाचा भाग होते. त्यासाठी 1 ऑगस्ट 1984 ते 14 ऑगस्ट 1984 या काळात दिल्लीतील बोटक्लब मैदानावर जेल भरो आंदोलन करण्यात आले.

 “बिएसपी आई है,नई रोशनी लाई है”, असे म्हणत शिक्षण,आरक्षण आणि हक्क आमच्यासाठी भीक नाही तर तो आमचा अधिकार आहे.

   महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे दिनांक 7 मार्च 1999 रोजी सत्यशोधक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्कार्याला उत्तर देताना कांशीराम म्हणाले संपूर्ण देशात राजकीय बदल घडवून आणणे,विभक्त झालेल्या जातींना एकत्र करण्यासाठी जातीचाच आधार घ्यावा लागणार आहे. जातीच्या आधारावरच त्यांच्यात विचारांची क्रांती पेरावी लागेल.यातूनच बहुजन समाज जागृत होत जाईल. सत्ता मिळवण्यासाठी उच्चवर्णीय लोक चमच्यांची मदत घेतात आणि पैसा माफिया आणि मीडियाचा गैरवापर करून चमच्यांना विकत घेतात.चमच्यांचे अस्तित्व पुसून टाकले तर आपणास सत्ता सहज मिळू शकते.”चमचा युग” हे पुस्तक त्यांनी लिहिले व चमच्याचे वेगवेगळे प्रकार सांगितले. कांशीराम यांच्या अथक परिश्रमामुळे आणि त्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळे निवडणूक आयोगाकडून बहुजन समाज पक्षाला 29 ऑक्टोबर 1987 रोजी राजकीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आणि निवडणूक चिन्ह हत्तीला मान्यता देण्यात आली.एप्रिल 1996 मध्ये बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला.1989 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बसपाचे तीन खासदार निवडून आले. 

  कांशीराम वेगवेगळ्या निवडणुका लढत राहिले.यातून बहुजन समाजाचे अस्तित्व दिसू लागले.‌ सन १९९१ साली उत्तर प्रदेशातील इटावा लोकसभा मतदारसंघातून कांशीराम उभे राहिले त्यांच्याविरोधी अनेक मातब्बर लोक उभे राहिले मात्र बामसेफच्या कर्मचारी आणि बसपाच्या कार्यकर्त्यांनी खुल्या मतदारसंघातून काशीराम यांना निवडून आणले. अशाप्रकारे सत्तेचे रोपटे अंकुरले. कोणत्याही साधनांची शक्ती नसताना, मान्यवर साहेब कांशीराम यांनी भारतीय समाजात जयभीम च्या नाऱ्यासह सत्ता स्थापन करता येऊ शकते, हे सिद्ध करून दाखविले. मायावतींना चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनविले. फुले -शाहू- आंबेडकर यांच्या विचारावर देशात परिवर्तन घडविता येते हे कृतीतून दाखवून दिले.

   आपल्या जीवनात आलेल्या परसराम ज्ञानी यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली व ते एक महान क्रांतिकारक झाले याची इतिहासाला नोंद घ्यावीच लागेल. असा हा महापुरुष नवा राजकिय विचार,केडर बेस संघटन कौशल्य, नवी राजकीय नीती भारतीय समाजाला देऊन दिनांक 9 ऑक्टोबर 2006 रोजी अखेरच्या प्रवासाला निघून गेला. या महान क्रांतिकारक महापुरुषांचे महानिर्वाण झाले. त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. असे होते बहुजन संघटक, बहुजन नायक मान्यवर साहेब कांशीराम. त्यांना माझा कोटी- कोटी प्रणाम.

✒️महादेव डांबरे(छत्रपती संभाजीनगर)मो:-९६६५०४७१५३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here