


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
▪️तहसीलदार यांच्याकडून तपासणीची मागणी
म्हसवड /सातारा(दि.23जानेवारी):-माण तालुक्यातील अनेक गावातील सर्वच महा ई-सेवा केंद्रात सरकारी दाखले.काढण्यासाठी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा नागरिकांकडून अधिक पैसे घेऊन लुटण्याचे प्रकार चालू आहेत. याबाबत प्रशासनाचें दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने दाखले काढण्यासाठी जास्त पैसे उकळणाऱ्या केंद्रांना काळ्या यादीत टाकण्याची गरज असल्याचे नागरिकांतुन बोलले जात आहे. तालुक्यात अधिकृत तसेच अनधिकृत अनेक महा ई सेवा केंद्रे सुरु आहेत. अनेक केंद्रांमध्ये रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, नवीन रेशन कार्ड, दुबार आणि रेशन कार्ड दाखल्यासह अन्य दाखले काढून दिले जातात.
प्रत्येक दाखला काढण्यासाठी वीस रुपये शुल्क आकारणी, दहा रुपयांचे कोर्ट फी स्टँप आणि तीन रुपये सेवा कर मिळून ३३ रुपये रक्कम ठरवून दिली आहे. पण अनेक महा ई सेवा केंद्रे ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारून नागरिकांची लूट करत असल्याचे दिसून येत आहे. सरकारने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम नागरिकांकडून घेतली जात असून ही बाब अतिशय गंभीर असून, तहसील कार्यालयाकडून अचानक तपासणी मोहीम राबवून दोषी आढळणाऱ्या केंद्रचालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.














