Home लेख हुजुर गेले मजूर आले

हुजुर गेले मजूर आले

306

भारताचे जावई असलेले भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी राजीनामा दिल्याने ब्रिटनमध्ये नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्तांतर झाले आणि पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजुर पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. वर मी मुद्दाम ‘अपेक्षेप्रमाणे’ असा शब्द वापरला कारण ब्रिटनमध्ये हुजुर पक्षाची सत्ता जाणार आणि मजूर पक्षाची सत्ता येणार असा अंदाज जगभरात व्यक्त केला जात होता. निवडणूकपूर्व करण्यात आलेल्या सर्वेक्षणातही असाच अंदाज वर्तवण्यात आला होता. हुजुर पक्षाचे प्रमुख आणि पंतप्रधान असणाऱ्या ऋषी सूनुक यांनाही कदाचित हेच वाटत असेल म्हणूनच त्यांनी सहा महिने आधीच राजीनामा देऊन मुदतपूर्व निवडणूक घेतली होती. ब्रिटनमधील हुजुर पक्षाच्या कामगिरीवर तेथील जनता खूप नाराज होती. मागील चौदा वर्षापासून ब्रिटनमध्ये हुजुर पक्ष सत्तेवर होता त्यामुळे त्यांच्या विरोधात तिथे मोठी अँटीइंकंबसी होती. या पक्षाची लोकप्रियता रसातळाला गेली होती. पंतप्रधान ऋषी सूनक यांच्या विषयी तर जनतेत प्रचंड नाराजी होती. ऋषी सूनक सर्वसामान्यांचे पंतप्रधान नसून श्रीमंतांचे पंतप्रधान आहेत अशीच धारणा तेथे निर्माण झाली होती त्याला कारणही तसेच होते या सरकारने सर्व सामान्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाहीत जे काही निर्णय घेतले ते बड्या व्यापाऱ्यांसाठी आणि उद्योगपतींसाठी. ऋषी सूनक यांना ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारता आली नाही त्यांच्या कार्यकाळात ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला कोणतीही ऊर्जितावस्था मिळाली नाही त्यामुळे त्यांच्या विषयी जनतेत प्रचंड नाराजी होती. जेंव्हा ऋषी सूनक यांची पंतप्रधानपदी निवड झाली तेंव्हा ब्रिटनमधील भारतीय नागरिकांनी मोठा जल्लोष केला. ऋषी सूनक भारतीय वंशाचे असल्याने ते भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतील अशी आशा तेथील भारतीय वंशाच्या नागरिकांना होती मात्र त्यांची आशा फोल ठरली. ऋषी सूनक यांनी भारतीय वंशाच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही उलट त्यांच्या काळात ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना त्रासच झाला म्हणूनच भारतीय वंशाच्या नागरिकांनी ऋषी सूनक यांना मतदान केले नाही. भारतीय वंशाच्या नागरिकांनी यावेळी मजूर पक्षाला भरभरून मतदान केले. या सर्व कारणांमुळेच ऋषी सूनक आणि त्यांच्या पक्षाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. मजूर पक्षाने चौदा वर्षांनी ब्रिटनमध्ये सत्ता हस्तगत केली आहे. कारण या पक्षाने निवडणुकीत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. या पक्षाचे नेते आणि भावी पंतप्रधान स्टार्मर यांनी हुजूर पक्षावर जनतेची असलेली नाराजी हेरून मोठ्या प्रचारसभा घेतल्या या दरम्यान त्यांनी सर्वसमण्यांसाठी गृहनिर्माण धोरण आणण्याचे आश्वासन दिले त्यांचे हे आश्वासन गेम चेंजर ठरले आणि इतिहासात केवळ दुसऱ्यांदा मजूर ४०० चा आकडा पार करता आला. भारतात अब की बार ४०० पार असा नारा देऊनही ४०० पार झाले नाहीत मात्र ब्रिटनमध्ये मजूर पक्षाने ती करामत केली. अर्थात त्यांनी हे केले ते केवळ घोषणा देऊन नाही तर जनतेचे प्रश्न हाती घेऊन. आता या पक्षाचे नेते स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होतील. ब्रिटनमध्ये आशेचा किरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्यामुळेच मजूर पक्षाची लोकप्रियता वाढली. ब्रिटनच्या जनतेने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासास ते पात्र ठरले तर ब्रिटनच्या इतिहासातील ते सर्वात यशस्वी पंतप्रधान ठरतील. त्यांच्या काळात भारत आणि ब्रिटनचे संबंध आणखी सौहार्दपूर्ण होतील अशी आशा करूया. जगात सर्वत्र उजव्या विचारसरणीच्या पक्षाला विजय मिळत असताना ब्रिटनमध्ये मजूर पक्षाने विजय मिळवून उजव्या विचार धारेला छेद देण्याची कामगिरी केली आहे.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here