


” आदर्श शिक्षक ।
प्रकाश विद्येचा ।
लय तिमिराचा ।
करितसे ॥”
आपल्या आदर्श अध्यापनातून विद्यार्थ्यांना विद्येचा प्रकाश देऊन त्यांच्या जीवनातील तिमिर नष्ट करणारे,बोले तैसा चाले ही वृत्ती असणारे,सर्वांना योग्य मार्गदर्शन करणारे,होतकरू,गरजू व गरिबांना सर्वतोपरी मदत करणारे,फळाची अपेक्षा न करता सदैव तत्पर राहणारे असे धडाडीचे नेतृत्व, सामान्य घरातून कुठलाही गॉडफादर नसताना स्वकर्तुत्वाने समाजात जनमानसात ठसा उमटविणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व,विदर्भाच्या चारही जिल्ह्यांमध्ये मनमिळावू वृत्तीने सर्वांच्या हृदयात स्थान मिळवणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व स्व.प्रा.प्रमोद काळे यांच्या दि.२९ ऑक्टोबर २०२३ ला असलेल्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
स्व.प्रा.प्रमोद काळे यांचा जन्म दि.11 ऑगस्ट 1949 आणि मृत्यू दि.29 ऑक्टोबर 2013 ला झाला.
सरांचे शिक्षण एम.कॉम., बी.एड. झाले.त्यांचे शालेय शिक्षण न्यू हायस्कूल मेन मध्ये झाले.महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय,अमरावती येथे झाले.पहिले सेवाकार्य जिल्हा परिषद ,अमरावती येथे शिक्षण विभागात 1975 ते 82 या काळात केले.जुनियर कॉलेजचे सेवाकार्य सन : 1982 ते 1987 पर्यंत केले तर वरिष्ठ महाविद्यालयाचे सेवाकार्य श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय,अमरावती येथे 1988 ते 2009 पर्यंत झाले.
जून 1983 ला सौ.संजीवनी यांच्याशी जीवनगाठ बांधून संसारी जीवनाला सुरुवात झाली.
त्यांच्या संसाररुपी वेलीला संप्रदा आणि स्वप्रत ही दोन गोंडस फुले उमलली. ती आपल्या कार्य क्षेत्रात आज कार्यरत आहेत .
स्व.प्रा.प्रमोद काळे व्यायामपटू म्हणून हनुमान आखाडा अमरावती येथे प्रसिद्ध होते.कबड्डीपटू म्हणून विविध ठिकाणी टीमचे नेतृत्व सरांनी केले.कॉलेज जीवनात नाटकामध्ये विविध पात्रांच्या भूमिका दमदारपणे त्यांनी साकारल्या व नाट्यमंडळात “शिकारी “नाटकाच्या निर्मितीमध्ये सरांचा फार मोठा सहभाग होता.
” स्वकर्तुत्वावर ।
दांडगा विश्वास ।
जीवन विकास ।
सर्वांचाच ॥”
स्वकर्तृत्वावर दांडगा विश्वास असल्यामुळेच स्व.प्रा. प्रमोद काळे यांनी कॉलेज जीवनात विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलने केली.अमरावती शहरांमध्ये शेतकऱ्यांसाठी उपोषणे केली व घंटीनाद बैलगाडी घेऊन प्रथमच अभूतपूर्व मोर्चा काढला व इतर मोर्चांमध्ये सुद्धा सरांचा सहभाग होताच.
महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री व कृषीमंत्री माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालील
दिंडीमध्ये समायोजनाचे कार्य त्यांनी केले.एन.एस.यु.आय.चे महाराष्ट्राचे सरचिटणीसपदी असताना फार मोठे कार्य त्यांनी केले,शिवाजी संस्थेतील सिल्वर जुबिलीमध्ये मुख्यमंत्री माननीय शंकरराव चव्हाण,मोहन धारिया यांना पाचरण केले.डॉ.पंजाबराव अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे पंधरा वर्ष अध्यक्ष व अमरावती डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँकेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष हे पद त्यांनी भूषविले.राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे 2000 मध्ये विधानसभा निवडणूक बडनेरा मतदार संघातून लढले.खादी ग्रामोद्योगचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले,परिवहन मंडळावर व जेल कमिटीवर नियुक्ती झाली होती,अनेक सामाजिक संस्थांचे देणगीदार होते,गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक व इतर मदत ते नेहमीच करीत, खेड्यापाड्यातील तरुणांना शहरांमध्ये आणून त्यांच्या नोकरीसाठी स्वखर्चाने प्रयत्न त्यांनी केले.समाजातील सर्वच घटकांमध्ये प्रेमाचे संबंध होते,आपुलकी,जिव्हाळा,दिलखलास स्पष्ट व निगर्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व.प्रा.प्रमोद काळे.
स्व. प्रा.प्रमोदराव काळे यांचा दहावा स्मृतिदिन रविवार दि.२९ ऑक्टोबर २०२३ ला नांदगाव पेठ येथील नवजीवन गोरक्षण संस्थेमध्ये मा. डॉ.गोविंदभाऊ कासट आणि अभंगकार
प्रा.अरुण बुंदेले यांच्या उपस्थितीत स.९.०० वाजता संपन्न होणार आहे.अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दहाव्या स्मृती दिनानिमित्त विनम्र आदरांजली अर्पण करतो.
” प्रमोदजी काळे ।
आज स्मृतिदिनी ॥
वंदन करांनी ।
कोटी कोटी ॥”
– प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर ,अमरावती.
भ्र.ध्व. :८०८७७४८६०९














