


✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.१४जून):-राजुरा-असिफाबाद मार्गावरील एका पेट्रोल पंप (इंडियन ऑइल डीलर) येथे सुरक्षेच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पेट्रोल पंप परिसरात सर्वत्र “Mobile Switch Off” आणि “No Smoking” अशा स्पष्ट सूचना फलकांवर नमूद असतानाही, पेट्रोल भरणारा कर्मचारी भ्रमणध्वनीवर संभाषण करत असल्याचे दिसून आले आहे. संबंधित कर्मचारी एका ग्राहकाच्या दुचाकीत पेट्रोल भरत असताना मोबाईलवर बोलत असल्याचे स्पष्ट दिसते. पेट्रोल पंप परिसर हा अतिसंवेदनशील व ज्वलनशील पदार्थांशी संबंधित असल्याने येथे सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे अपेक्षित असते.
मात्र कर्मचारीच नियमांचे पालन करत नसल्याने ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेट्रोलियम सुरक्षा नियमांनुसार पेट्रोल पंप परिसरात मोबाईलचा वापर टाळण्याच्या सूचना दिल्या जातात. अशा ठिकाणी निष्काळजीपणा किंवा नियमभंगामुळे दुर्घटना घडल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना द्याव्यात तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापन आणि तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वस्तुस्थितीची चौकशी करावी व आवश्यक ती कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.















