Home चंद्रपूर काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी कटिबद्ध : जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाषभाऊ धोटे

काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी कटिबद्ध : जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाषभाऊ धोटे

11

▪️चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड ; नवीन जिल्हा कार्यकारिणी लवकरच होणार जाहीर. 

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.21मे):-अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनात्मक रचनेत करण्यात आलेल्या फेरबदलांमध्ये चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेनंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले.

       महाराष्ट्रातील काँग्रेस संघटना अधिक सक्षम, प्रभावी व जनतेशी जोडलेली राहावी या उद्देशाने संघटनात्मक जिल्ह्यांची पुनर्रचना करण्यात आली असून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांनाही तत्काळ प्रभावाने मान्यता देण्यात आली आहे. या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्ह्यातील पक्ष संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध घटकांशी संवाद साधून सविस्तर आढावा घेण्यात आला होता.

       संघटन सृजन अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांनी जिल्हानिहाय बैठका, संवाद व प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केले होते. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांचा अंतिम निर्णय घेण्यात आला. पक्ष संघटनेत सातत्याने सक्रिय राहून कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व म्हणून सुभाषभाऊ धोटे यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

        दरम्यान, संघटन सृजन अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसची जुनी कार्यकारिणी तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी दिली. यावेळी प्रतिक्रिया देताना सुभाषभाऊ धोटे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचा मनापासून आभारी आहे.

संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत, गतिमान आणि तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी काळात युवक, महिला, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यात येईल. नवीन कार्यकारिणीत अनुभवी कार्यकर्त्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाईल.

      सुभाषभाऊ धोटे यांच्या फेरनिवडीमुळे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसला नवचैतन्य मिळणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच संघटन विस्तारासाठी पक्ष अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here