


▪️शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर होतोय परिणाम-पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष; रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी
✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.1एप्रिल):-राजुरा शहरातील अनेक भागात विशेषतः शालेय परिसराच्या बाजूने भर रस्त्यांवर मद्यपिनी उत्पात चालविला असून दारू प्या आणि बॉटल तिथेच सोडून व फोडून जा असे जणुकाही अभियानच सुरू असल्याचे चित्र दिसत असून याकडे पोलिस विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राजुरा शहरातील बाहेरच्या परिसरात भर रस्त्यात दारूच्या बाटल्या पडलेल्या आणि फोडलेल्या असे चित्र जणू काही रोजचा भाग बनलेला आहे. परंतु याच रस्त्याने शालेय विद्यार्थी शाळेत ये- जा करतात. त्यामुळे कळतं न कळत त्यांचे लक्ष याकडे वेढले जाते. कधी अर्धवट कापलेले केक, कधी अर्धवट खाल्लेले अन्नाचे पॉकेट, कधी सिगारेट, तंबाखू आणि अन्य व्यसनाचे किळसवाणे प्रकार भर रस्त्यावर पडून असतात.
रात्रीस खेळ चाले या अभद्र प्रकारावर तात्काळ पोलिस कार्यवाही होणे अपेक्षित आहे. अन्यथा या बालमनावर चुकीची प्रतिमा, भावना उमटेल आणि त्यातून काहीतरी भयावह घटना घडल्यास आश्चर्य वाटायला नको. आतातर दिवस रात्र मद्यपींचे हे किळसवाणे प्रकार सुरू असून याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
लहान मुल हे अनुकरणशील असतात. मोठे व्यक्ती जसे वागतात किंवा जसे कृत्य करतात तसेच ते करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मद्यपींनी अर्धवट सोडून ठेवलेल्या वस्तू त्यांनी हाताळल्यास एखादी अनुचित प्रकार घडू शकतो. शिवाय फुटलेल्या काचांमुळे रस्त्याने ये -जा करणाऱ्यांना ईजा सुद्धा होऊ शकते. त्यामुळे पोलिस साहेब आम्हाला यातून मुक्तता द्याल काय असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.














