


✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.३१मार्च):- ॲड. यादवराव धोटे स्मृती महाविद्यालय, राजुरा येथे फॅशन इलुस्ट्रेशन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वीरित्याआयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थिनींना फॅशन डिझाईन क्षेत्रातील विविध पैलूंविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध दृश्यकलाकार (Visual Artist) व चित्रकार (Illustrator) हर्ष आर. दिवटे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. ते श्री कला महाविद्यालय, नागपूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या अनुभवातून फॅशन इलुस्ट्रेशनमधील मूलभूत संकल्पना, स्केचिंग तंत्र, रंगसंगती, पोशाख रचना आणि सर्जनशील मांडणी यांचे सविस्तर विवेचन केले. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये कलात्मक दृष्टीकोन विकसित करणे, सर्जनशीलता वृद्धिंगत करणे आणि फॅशन डिझाईन क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे हा होता.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी विविध शंकांचे निरसन करून घेतले तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विविध प्रकारची फॅशन स्केचेस तयार करून आपली सर्जनशीलता साकारली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. मीनाक्षी कालेश्वरवार यांनी केले. त्यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन केले. तसेच संस्थेचे सचिव अर्पित धोटे यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत त्यांचे मनोबल वाढवले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोविंद झाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. गुणवंता कार्लेकर प्रा.योगिता साळवे, तसेच इतर कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींना फॅशन क्षेत्रातील नवे दालन खुले झाले असून त्यांच्या कौशल्य विकासाला निश्चितच चालना मिळाली आहे.














