Home अमरावती परिवर्तन साहित्य सत्यशोधकीय कवितांचा जागर:रसिक-श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परिवर्तन साहित्य सत्यशोधकीय कवितांचा जागर:रसिक-श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

71

▪️विचारप्रवर्तक कवितांनी रंगला अमरावतीतील साहित्य सोहळा

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.२९मार्च):-अमरावती येथील मुधोळकर पेठ परिसरातील विदर्भ माळी क्षत्रिय बोर्डिंग, वऱ्हेकर सभागृहात नुकतेच परिवर्तन साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले.सामाजिक परिवर्तन परिषद अमरावती आणि श्री माळी वैभव नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय संमेलनाने साहित्यप्रेमींना विचारांची नवी दिशा दिली.मनोहरराव चलपे (संचालक, माळी वैभव नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सत्यशोधकीय कवी संमेलनात विविध कवींनी आपल्या प्रभावी कवितांमधून सामाजिक वास्तव आणि परिवर्तनाचा संदेश दिला.शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे यांनी ‘क्रांतिमा’ ही कविता सादर करत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.

विद्रोही कवी अविनाश गोंडाणे यांनी सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत सामान्य माणसावर होणाऱ्या परिणामांचे प्रभावी चित्रण केले.प्रा. देवानंद पाटील यांनी एकात्मतेचा संदेश देणारी कविता सादर करत समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले.कवयित्री शारदा गणोरकर यांनी ‘पल्लवी मते फुले विद्यालय’ ही कविता सादर करत शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. याशिवाय नाना रमतकार, दीपिका पांडे, प्रा. हंसराज रंगारी, रिजवान शेख, शालिनी बेलसरे, राजेश्वरी नंदागवळी यांच्यासह अनेक कवींनी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी विचार, भारतीय संविधान, लोकशाही, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या समस्या अशा विविध विषयांवर आपल्या कवितांमधून प्रभावी मांडणी केली.

अध्यक्षीय भाषणात मनोहरराव चलपे यांनी सहभागी कवींच्या वैचारिक प्रगल्भतेचे कौतुक करत सामाजिक परिवर्तनासाठी साहित्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा गणोरकर यांनी सुरेखरीत्या केले. दोन दिवसीय या संमेलनात परिसंवाद, नाट्य प्रयोग,प्रबोधनपर प्रवचने, तसेच भावगीतांच्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली.या संमेलनाला मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी, रसिक व नागरिक उपस्थित होते, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here