


▪️गुढीपाडवा,रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर केलेली दरवाढ ठरत आहे सामान्य माणसाची डोकेदुखी
✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.17मार्च):-गुढीपाडवा आणि रमजान ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड शहरात घरगुती जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.विशेष म्हणजे आखाती देशांमध्ये युद्ध परिस्थिती असतानाही संपूर्ण भारत देशामध्ये गॅस दरवाढ वगळता पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असतानाही व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.सणासुदीच्या काळात बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढत असते.याचाच फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी किराणा,भाजीपाला, अन्नधान्य,खाद्यपदार्थ तसेच इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंवर दरवाढ केली आहे.परिणामी,सणाचा आनंद साजरा करण्याऐवजी नागरिकांना वाढत्या खर्चाची चिंता सतावत आहे.
गेल्या काही दिवसामध्ये आखाती देशांमध्ये युद्धजण्य परिस्थिती असतानाही भारत देशामध्ये गॅस दर वगळता पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही दर वाढ झालेली नसताना वस्तूंच्या दरात वाढ होणे नागरिकांना खटकत आहे.दरवाढीमागे कोणतेही ठोस कारण नसताना व्यापारी आम्हाला वाहतूक खर्च लागत असल्याने दरवाढ झाली आहे अशी मनमानी करत आहेत,अशी प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी व्यक्त केली आहे.सामान्य कुटुंबांचे बजेट आधीच ताणले गेले असून, सणाच्या खर्चात ही वाढ भर टाकत आहे.
त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून गोरगरीब सामान्य जनतेची होणारी आर्थिक लूट थांबवून दर नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत,अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.दरम्यान,व्यापाऱ्यांकडून मात्र सणासुदीच्या काळात वाहतूक खर्च आणि मागणी वाढल्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे.मात्र, या कारणावर नागरिक समाधानी नसून योग्य चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.एकूणच,सणांच्या आनंदावर महागाईचे सावट पसरले असून, गंगाखेडकरांसाठी ही दरवाढ खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरत आहे.














