


इराण अमेरिका युद्धाला आता पंधरा दिवस होत आले तरी हे युद्ध थांबायचे नाव घेत नाही. ज्या वेळी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला करून इराणचे सर्वोच्च नेते आयातूला खामेनी यांची हत्या केली तेंव्हा इराण आणि इस्रायल या देशांनी दावा केला की आम्ही इराणच्या सर्वोच्च नेत्याला संपवून टाकल्याने इराण लवकरच आम्हाला शरण येईल आणि अवघ्या काही तासात किंवा फार फार तर दोन ते तीन दिवसांत हे युद्ध संपेल. जगालाही तसेच वाटले होते कारण अमेरिका आणि इराण यांची तुलनाच होऊ शकत नाही. अमेरिकेची शस्त्र सज्जता पाहिल्यास इराण त्यांच्यापुढे नगण्यच आहे त्यात अमेरिकेला इस्रायलची साथ त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपवून अमेरिका स्वतःचे मनसुबे पूर्ण करेल असेच सर्वांना वाटले होते पण झाले उलटेच.
आयातूला खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले. इराणने अमेरिका इस्रायलला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन या दोन्ही देशांना जेरीस आणले. इतक्यावरच इराण थांबला नाही तर इराणने ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्करी तळ आहेत तिथे हल्ला करुन ते नष्ट केले आणि अमेरिकेला हिसका दाखवला. इराण अमेरिकेचा इतका कडवा प्रतीकार करेल असे कोणालाही वाटले नव्हते खुद्द ट्रम्प यांनाही तसे वाटले नव्हते पण आता त्यांना त्याची जाणीव झाली असावी म्हणूनच ते आता युद्ध थांबवण्याची भाषा करत आहे. हे युद्ध अपेक्षेपेक्षा जास्त लांबले त्यामुळे ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनही टीका होऊ लागली आहे. त्यात इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने या समुद्राधुनीमार्गे जगात होणारा इंधन पुरवठा थांबल्याने अनेक देशांनी रशियाकडून इंधन विकत घेतले
रशियाने चढ्या दरात इंधनविक्री सुरू केली त्यामुळे रशियाच गब्बर होऊ लागली. याचाच अर्थ इराण अमेरिका युद्धाचा खरा लाभार्थी रशिया ठरला. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणतात ते यालाच. भारतासह अनेक देशांनी रशियाकडून इंधन खरेदी करू नये यासाठी टेरीफ लावून ब्लॅकमेल करणाऱ्या ट्रम्प यांनाच त्या देशांना रशियाकडून इंधन खरेदी करा असे सांगावे लागले एकप्रकारे ट्रम्प यांचा हा अपमानच आहे. हे युद्ध जितके लांबेल तितकी त्याची जगाला किंमत मोजावी लागेल.
या युद्धाचे परिणाम जगातील अनेक देशांवर होऊ लागले आहे. अनेक देशात गॅस आणि इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस आणि इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्यांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे युद्ध अमेरिकेने लादले असल्याने जगभर ट्रम्प यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. खुद्द अमेरिकेतही ट्रम्प यांचा मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त व्यक्त होत आहे. ट्रम्प यांच्या निषेधासाठी अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरत आहे. एकीकडे ट्रम्प यांचा निषेध केला जात असतानाच दुसरीकडे इराणच्या प्रति जगाची सहानुभूती वाढत चालली आहे. एकूणच हे युद्ध ट्रम्प यांना जड जात असून आता हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याची त्यांची मानसिकता बनली आहे. अर्थात इराण याला सहजासहजी संमती देईल असे वाटत नाही त्यामुळे ट्रम्प यांनी हे युद्ध लवकर संपेल असे म्हटले असले तरी तसे होईलच असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-9922546295














