


आजच्या काळात माणूस नात्यांनी वेढलेला आहे; पण तरीही एकटा आहे. घर आहे, कुटुंब आहे, मित्र आहेत, सोशल मीडियावर शेकडो “कनेक्शन्स” आहेत; पण तरीही मनात खोल कुठेतरी एक अस्वस्थ शंका दाटलेली आहे. खरंच माझ्यावर विश्वास ठेवणारा कुणी आहे का? कारण आज नात्यांची संख्या वाढली आहे; मात्र विश्वासाची उंची मात्र कमी होत चालली आहे. आपण अनेकदा गृहीत धरतो की नातं असेल, तर विश्वास आपोआप येईल. आई-वडील आहेत म्हणजे विश्वास, पती-पत्नी आहेत म्हणजे विश्वास, मित्र आहेत म्हणजे विश्वास. पण वास्तव वेगळंच सांगतं. नातं असणं आणि विश्वास असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खरं तर सत्य हे आहे, नात्यांमुळे विश्वास नसतो; विश्वासामुळे नाती असतात. नातं जन्माला येतं, पण विश्वास घडवावा लागतो. नातं अनेकदा जन्माने, कागदाने किंवा परिस्थितीने मिळतं. आई-वडील, भाऊ-बहीण, नवरा-बायको, नातेवाईक ही नाती आपल्याला विचारल्याशिवाय मिळतात. पण विश्वास मात्र मिळत नाही; तो कमवावा लागतो. तो शब्दांपेक्षा कृतीतून तयार होतो. तो एका दिवसात नाही, तर असंख्य छोट्या प्रसंगांतून आकार घेतो. आज आपण नात्यांवर हक्क सांगतो; पण विश्वासासाठी लागणारी जबाबदारी मात्र स्वीकारत नाही. “मी तुझा आहे” असं म्हणणं सोपं आहे; पण “मी तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही” हे जगणं कठीण आहे. विश्वास तुटला की नात्याचा सांगाडा उरतो. विश्वास तुटणं म्हणजे फक्त फसवणूक नव्हे.
कधी ऐकून न घेणं, कधी वेळ न देणं, कधी गरज असताना अनुपस्थित राहणं, कधी गोष्ट लपवणं, कधी सत्य टाळणं. या सगळ्या गोष्टी मिळून विश्वासाला हळूहळू पोखरत जातात. एकदा विश्वासाला भेग पडली की नातं जिवंत राहतं; पण आत्मा हरवतो. बाहेरून हसणं, औपचारिक बोलणं सुरू राहतं; पण आतला संवाद संपतो. मग नातं नावापुरतं उरतं, जणू एखादं जुनं घर, ज्यात भिंती उभ्या आहेत; पण उब नाही. आजच्या काळात माणूस नात्यांपेक्षा व्यवहारात जास्त प्रामाणिक दिसतो. व्यवहारात करार असतो, अटी असतात, कायदेशीर चौकट असते; त्यामुळे फसवणूक कमी होते. पण नात्यांत अशी कुठलीही चौकट नसते, तिथे फक्त विश्वास असतो आणि तोच आज सर्वात दुर्मिळ झाला आहे. म्हणूनच आज लोक व्यवहारात सावध, पण नात्यांत संशयी झाले आहेत. “तो काय म्हणेल?”, “ती खरं बोलतेय का?”, “यामागे काही स्वार्थ तर नाही ना?” अशा शंका नात्यांच्या मधोमध उभ्या राहिल्या आहेत. प्रेम असू शकतं; पण विश्वास नसेल तर ते प्रेम असुरक्षित होतं. मैत्री असू शकते; पण विश्वास नसेल तर ती सोयीची ठरते. नातं असू शकतं; पण विश्वास नसेल तर ते ओझं बनतं. विश्वास म्हणजे अंधपणा नाही.
विश्वास म्हणजे दुसऱ्याच्या हातात स्वतःचं मन सुरक्षित आहे, ही खात्री. विश्वास म्हणजे समोरचा आपली कमजोरी आपल्याविरुद्ध वापरणार नाही, ही निश्चिंतता. विश्वास म्हणजे आपलं मौनही समजून घेतलं जाईल, ही भावना. विश्वास मागता येत नाही, तो पात्रतेने मिळतो. आज अनेक नात्यांत एक विचित्र अपेक्षा दिसते, तू माझ्यावर विश्वास ठेवायलाच हवा पण विश्वास ही मागणी नाही; ती पात्रतेची पावती आहे. जो सातत्याने खोटं बोलतो, तो विश्वास मागतो. जो वेळ देत नाही, तो विश्वासाची अपेक्षा करतो. जो जबाबदारी टाळतो, तो विश्वासावर हक्क सांगतो. खरं तर विश्वास हा अधिकार नाही; तो सन्मान आहे आणि सन्मान नेहमी पात्रतेतून मिळतो. आज हा प्रश्न फक्त वैयक्तिक नात्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. समाज, संस्था, राजकारण, प्रशासन सर्वत्र विश्वासाचा दुष्काळ आहे. लोकांना माणसांपेक्षा कागदावर जास्त विश्वास वाटतो. शब्दांपेक्षा पुराव्याला जास्त किंमत आहे. कारण आपण वारंवार अनुभवले आहे की नाती बदलतात, पण फसवणूक कायम राहते. त्यामुळे माणूस हळूहळू स्वतःभोवती संशयाची भिंत उभी करतो. ती भिंत त्याला वाचवतेही; पण एकटंही करते.
विश्वास टिकवणं ही मोठी साधना आहे, म्हणजे दररोज स्वतःशी प्रामाणिक राहणं. चुकीची गोष्ट मान्य करणं. क्षमायाचना करणं आणि समोरच्याला गृहीत न धरणं. नात्यांत प्रेम कमी झालं तरी चालेल; पण विश्वास कमी होता कामा नये. कारण प्रेम पुन्हा निर्माण होऊ शकतं; पण तुटलेला विश्वास जोडणं फार अवघड असतं. आपण अनेकदा विचारतो की, लोक विश्वासघात का करतात? पण कधी स्वतःला विचारतो का, मी कुणाचा विश्वास जपला आहे का? मी दिलेला शब्द पाळला आहे का? मी कुणाच्या मनाशी प्रामाणिक राहिलो आहे का? जर आपण स्वतः विश्वासार्ह बनलो, तर नाती आपोआप अर्थपूर्ण होतील. कारण शेवटी सत्य एकच आहे, नाती असतात म्हणून विश्वास येत नाही; विश्वास असतो म्हणून नाती टिकतात.
✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९














