


✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
आपण डिजिटल युगात जसे वेगाने पुढे जात आहोत तसे त्याचे काही दुष्परिणामदेखील सोसावे लागत आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा त्रास म्हणजे वाढते सायबर गुन्हे. सायबर फसवणूक आणि त्यातून होणारे बँक खाते फ्रीझ होणे, एका क्षणात यूपीआय बंद होणे, एटीएम कार्ड निकामी होणे, पगार अडकणे, व्यवसाय ठप्प होणे असा त्रास होतो. महत्त्वाचा प्रश्न असा की, खाते फ्रीझ झाले म्हणजे खातेदार गुन्हेगार ठरतो का? केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (आयफोरसी) यांनी नुकत्याच जारी केलेल्या नवीन प्रमाणित कार्यप्रणालीचे (एसओपी) उत्तर स्पष्ट आहे नाही. बँक खाते फ्रीझ होणे म्हणजे काय?
बँक खाते फ्रीझ होणे याचा अर्थ असा की, तपास यंत्रणा किंवा बँकेने तुमच्या खात्यातून पैसे काढण्यावर किंवा व्यवहार करण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. एखाद्या खात्यात सायबर फसवणुकीचे किंवा संशयास्पद व्यवहाराचे पैसे आल्याचा संशय असतो, तेव्हा पोलिस किंवा संबंधित विभाग तपासासाठी बँकांना ते खाते ‘होल्ड’ किंवा ‘फ्रीझ’ करण्याचे आदेश देतात.केंद्र सरकारच्या नव्या एसओपीत कोणत्या बाबींचा आहे समावेश?
बँका, पेमेंट अॅग्रिगेटर्स आणि अंमलबजावणी यंत्रणांनी केवळ संशयास्पद रकमेपुरतेच खाते मर्यादित ठेवावे. पूर्ण खाते फ्रीझ करणे हा शेवटचा पर्याय असावा, जेणेकरून खातेदाराला दैनंदिन व्यवहार, पगार किंवा औषधोपचारासाठी पैसे वापरता येतील.
खाते किंवा त्यातील काही रक्कम फ्रीझ केली गेली, तर बँकेने तत्काळ खातेदाराला एसएमएस किंवा ई-मेलद्वारे त्याची माहिती देणे आवश्यक आहे. यात तक्रार क्रमांक आणि फ्रीझ करण्याचे कारण स्पष्ट असावे.
खाते केवळ संशयावरून फ्रीझ केले असेल, तर संपूर्ण नेट बँकिंग किंवा यूपीआय बंद करण्यापूर्वी बँकेने खात्री करणे आवश्यक आहे.
तपास यंत्रणेने खाते फ्रीझ केल्यानंतर २० दिवसांच्या आत कोणतीही कायदेशीर कारवाई केली नसेल किंवा न्यायालयाचा कोणताही आदेश आला नाही, तर ते खाते अनफ्रीझ करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार नागरिकाला मिळतो.
खाते फ्रीझ झाल्यावर काय करावे?
होम ब्रँचमध्ये जाऊन लेखी स्वरूपात खाते फ्रीझ होण्याचे कारण विचारा. पोलिस ठाण्याचा पत्ता आणि कोणत्या राज्याच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे, याची माहिती घ्या.
तुमचा अधिकृत तक्रार अर्ज दाखल करा. बँकेला ही तक्रार ७ दिवसांच्या आत संबंधित तपास अधिकाऱ्याकडे पाठवणे बंधनकारक आहे.
केवळ पडताळणीसाठी खाते फ्रीझ झाले असल्यास व्हिडीओ कॉल किंवा अधिकृत कागदपत्रांद्वारे ओळख पटवून देऊन तुम्ही खाते अनफ्रीझ करण्याची विनंती करू शकता.
पोलिस तपासात विलंब होत असेल किंवा तुमची बाजू ऐकून घेतली जात नसेल, तर तुम्ही वकिलामार्फत किंवा स्वतः न्यायालयात धाव घेऊ शकता.
खाते फ्रीझ का होते?
बहुतांश प्रकरणांत खाते फ्रीझ होण्यामागे सायबर फसवणुकीची तक्रार असते. जेव्हा एखादी पीडित व्यक्ती cybercrime.gov.in किंवा १९३० या हेल्पलाइनवर तक्रार करतो, तेव्हा ती संशयास्पद रक्कम ज्या-ज्या खात्यांमधून हस्तांतरण झाली आहे, ती सर्व खाती तपासासाठी तात्पुरती ‘होल्ड’ किंवा ‘फ्रीझ’ केली जातात. अनेकदा तपास यंत्रणांना केवळ संशय असतो. याचा अर्थ असा नाही की खातेदार दोषी आहे. तुम्ही निर्दोष असाल तर तुमचे फ्रीझ बँक खाते कोर्टाच्या आदेशानुसार मोकळे केले जाते.














