


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.23फेब्रुवारी):-ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजी टीचर्स, गोंडवाना विद्यापीठ (AMTGU) यांच्या अंतर्गत ‘मायक्रोबिया–२०२६’ ही एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा अस्वले मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय वाढई, अध्यक्ष – असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजी टीचर्स, गोंडवाना विद्यापीठ उपस्थित होते. त्यांनी कार्यशाळेचे वैशिष्ट्य व महत्त्व अधोरेखित करून सहभागी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. काटकर, अध्यक्ष अभ्यास मंडळ (मायक्रोबायोलॉजी), गोंडवाना विद्यापीठ यांनी कार्यशाळेची प्रस्तावना मांडत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.
कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. युवराज बोधे, ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे समन्वयक श्री. रोहित चांदेकर यांनी आयोजनाची धुरा समर्थपणे सांभाळली.
या कार्यशाळेत एकूण ११ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर; गुरुनानक कॉलेज ऑफ सायन्स, बल्लारपूर; जनता कॉलेज, चंद्रपूर; महात्मा गांधी कॉलेज, गडचांदूर; चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा; चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, गोंडपिपरी; मोहसीनभाई झवेरी कॉलेज, वडसा; महात्मा गांधी कॉलेज, आरमोरी; नेवजाबाई महाविद्यालय, गडचांदूर; तसेच नेवजाबाई कॉलेज ऑफ सायन्स, गोंडपिपरी यांचा समावेश होता.
या कार्यशाळेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. मायक्रो क्विझ, हेडक्रंचर, रांगोळी, मायक्रो शेफ, क्रॉसवर्ड, सिंग द सायन्स आणि अॅड मॅड शो अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी सूक्ष्मजीवशास्त्रातील संकल्पना व त्याचे महत्त्व आपल्या सर्जनशीलतेतून प्रभावीपणे सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रोहित चांदेकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभारप्रदर्शन डॉ. युवराज बोधे यांनी केले. मायक्रोबायोलॉजी असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे तसेच ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थी स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध व समर्पित पद्धतीने कार्य करत कार्यक्रमाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विषयाप्रति अधिक उत्सुकता व प्रेरणा निर्माण झाली.














