


▪️सर्वोदय कॉलनी येथे गुरू रविदास जयंती संपन्न
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.4फेब्रुवारी):- गुरू रविदास एक महान वैज्ञानिक संत’ होते.त्यांचे विचार आधुनिक,तार्किक आणि मानवतावादी होते.जरी त्यांनी प्रयोगशाळेत संशोधन केले नसले,तरी त्यांचे विचार तत्कालीन सामाजिक रूढी-परंपरांना छेद देणारे आणि विज्ञानाप्रमाणेच ‘सत्यावर’ आधारित होते.त्यांना वैज्ञानिक संत का म्हणतात तर कार्यकारणभाव विज्ञानाचा पाया हा ‘कारण आणि परिणाम’ यावर असतो. संत रविदासांनी अंधश्रद्धेला विरोध करताना नेहमी तर्काचा आधार घेतला. “जर दगडात देव असेल, तर तो पाण्यात का बुडतो?” असा प्रश्न विचारून त्यांनी लोकांना चमत्कारांऐवजी वास्तवाकडे पाहण्यास प्रवृत्त केले. त्या काळी समाजात वर्णभेद टोकाला होता.रविदासांनी असा *वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला की, सर्व मानवांच्या शरीरातील रक्त, मांस आणि हाडे एकसारखीच आहेत.”एकै माटी के सभ भांडे, सब को सिरजनहार।” याचा अर्थ असा की, आपण सर्व एकाच तत्त्वापासून बनलो आहोत. हा विचार आजच्या ‘जेनेटिक्स’ किंवा ‘बायोलॉजी’च्या समतेच्या सिद्धांताशी जुळणारा आहे,म्हणूनच त्यांना वैज्ञानिक संत म्हणतात.” असे विचार साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
ते सर्वोदय कॉलनी, अमरावती येथे संत रोहिदास महाराज सांस्कृतिक भवनातील माजी कुलगुरू स्व.दिलीप मालखेडे वाचनालयामध्ये दि.1 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झालेल्या श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकरराव नाचणे,प्रमुख वक्ते समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले,प्रमुख अतिथी डॉ.राजीव जामठे ,प्रा.संजय खडसे,श्री वासुदेव वानखडे, डॉ.दिनेश रोजतकार,डॉ.तुषार रामराव गावंडे,राजन खंडारे, चंद्रशेखर खंडारे,भीमराव विरूळकर, रामदास इंगळे, कृष्णा मोहोकर, श्री मधुकर बुंदिले,श्री किशोर खडसे होते .
अध्यक्ष ,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांनी श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वरचित “श्री संत गुरू रविदासजी ” या स्वरचित हिदी काव्यगीताचे गायन केले.
कार्यक्रमाचे संचलन श्री मधुकर बुंदिले तर अभार श्री कृष्णा मोहोकर यांनी मानले.कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.














