


✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)
खटाव(दि.18डिसेंबर):-महाराष्ट्र ,कर्नाटक, गुजरात ,गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील सिद्धहस्त योगी परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी ७८ व्या सोहळ्यानिमित्त रथ पूजन सोहळा आज, गुरुवारी सकाळी ९.३० वाजता श्री सेवागिरी महाराज देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराजआणि ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खा.उदयनराजे भोसले, खा. नितीन पाटील, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे, आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पहाटे श्री सेवागिरी मंदिरातील पारंपरिक धार्मिक विधी, पूजा हे कार्यक्रम मठाधिपती, पुजारी व विश्वस्त यांच्या हस्ते पार पडली त्यानंतर श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेचे पूजन करून त्यांची रथात स्थापना करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते रथपूजन झाल्यानंतर रथयात्रेस सकाळी १० वा. सुरुवात झाली. रत्थोत्सवादिवशी देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांना बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. श्री सेवागिरी मंदिर, सांस्कृतीक भवन व स्वागत कमानीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टकडून रथोत्सवाची तयारी महिनाभर बसूनच चालली होती. यात्रा परिसरावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिवहन विभागाने जादा बसेसची सोय केली आहे. या वर्षी यात्रा स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आरोग्यदायी होण्यासाठी विशेष उपाययोजना आणि सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पार्किंगची सोय पुसेगावच्या जवळ केली आहे. आरोग्य विभागासह शासनाच्या विविध विभागांनी चांगली तयारी केली आहे. देवस्थान ट्रस्टने भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिला आहे. यात्रा स्थाळाच्या सर्व बाजूंना अॅम्बुलन्स तैनात करण्यात आल्या आहेत, त्यात सुसज्ज कार्डियाक अॅम्बुलन्सही आहेत.
पुसेगाव पोलीस स्टेशन मार्फत चौक बंदोबस्तकरून अनुचित घटना घडू नयेत म्हणून जागोजागी चूक बंदोबस्त करण्यात आला होता.














