Home चंद्रपूर साखरी-चंद्रपूर बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ:प्रवाशांची गैरसोय

साखरी-चंद्रपूर बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ:प्रवाशांची गैरसोय

146

 

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा-वेकोलीच्या कोळसा खाणीने वेढलेल्या साखरी व लगतच्या नदी पट्ट्यातील ग्रामस्थांची साखरी ते चंद्रपूर सरळ बससेवा सुरू करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून करीत आहे. मात्र बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या संदर्भात साखरी चे सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधले आहे.
साखरी गाव हे कोळसा खाणीने वेढले असल्याने गावात कामगार वास्तव्यास आहे.या गावा लगत वाघोबा मंदिर असल्याने नवस फेडण्याची भाविकांची मोठी गर्दी असते. सोबतच गावात आठवडी बाजार भरत असल्याने परिसरातील खरेदीदार मोठ्या संख्येने येत असतात. मात्र गावात येण्यासाठी सरळ बससेवा नसल्याने भाविकांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चंद्रपूर ला शिक्षण घेण्यासाठी मिळेल त्या वाहनाने जावे लागत आहे. त्यामुळे वाढत्या वाहतुकीमुळे त्यांच्या जीव धोक्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना जिल्हा मुख्यालयी कामा निमित्त जाण्यासाठी राजुऱ्यावरून जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडत आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता साखरी व हाडस्ती ग्राम पंचायत ने ठराव घेऊन सरळ बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. ही सरळ बससेवा सुरू झाल्यास साखरी, चार्ली, निर्ली, कढोली, चारगाव, माना व हडस्ती गावकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे यांनी गावकऱ्यांसोबत आमदार भोंगळे यांना निवेदन दिले आहे व सुभाष गोरे यांनी स्वतः महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बससेवा सुरू करण्याची विनवणी केली आहे. मात्र ग्रामस्थांच्या या मागणीकडे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. आगर व्यवस्थापकाने त्वरित साखरी ते चंद्रपूर बस सेवा सुरू करावी अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here