


“जे सत्य आहे हाच माझा धर्म आहे” या विचाराने जीवनाची दिशा ठरते. भारतीय असणे हा गर्वाचा विषय आहे, पण जैन धर्मात जन्म घेणे हा गौरवाचा भाग आहे. कारण हा धर्म सत्य, अहिंसा आणि संयम यावर आधारित आहे. धर्माप्रती श्रद्धा, भक्ती आणि गर्व असणे आवश्यक आहे. नागोर येथून इंदूर मार्गे प.पू. महाराज साहेब विहार करत कानपूरकडे पायी जात असताना, अनेक अजैन लोकही त्यांच्या अनवाणी चालण्याच्या तपस्वी जीवनशैलीकडे आकर्षित होऊन वंदन करतात, काहीजण श्रद्धेने पैसेही अर्पण करतात. हीच प्रभावना धर्माचा प्रभाव समाजावर पडतो तेव्हा श्रद्धा जागृत होते. गेल्या दोन दिवसांपासून प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी कथा आणि प्रवचनांद्वारे प्रभावनेचे महत्त्व सांगितले. आजच्या प्रवचनात त्यांनी त्रिकालक्य विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले, ज्यात भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातील धर्मदृष्टी स्पष्ट केली. अशा प्रवचनांमधून आत्मशुद्धी, ज्ञानवृद्धी आणि धर्मप्रेम वाढते, जे जीवनाला अधिक अर्थपूर्ण बनवते. समकित के ६७ बोल यातील ८ व्या क्रमांकात असलेल्या ‘प्रभावना’चे महत्त्व सांगण्यात येत असून या अंतर्गत त्रिकालक्य बाबत मधुकर संप्रदाय तसेच भगवान महावीर यांच्या काळातील मुनींची गोष्ट सांगितली. त्यावेळी भयंकर दुष्काळ पडला होता साधु एका घरी गोचरीसाठी जात होते परंतु त्या घरातील गृहिणीने भाकरीत विष टाकले होते. ती साधुंना कसे देणार? त्यांना ज्योतिष विद्या येत होती. त्यांनी दोन दिवस थांब तुझ्या घरी धान्याच्या राशी येतील. अशा पद्धतीने त्या कुटुंबाचा जीव वाचला. साधु संत आपल्याला विद्या येते ही बाब प्रकट करू नये परंतु काही वेळा अप्रत्यक्ष प्रकट करणे आवश्यक ठरते असे ही सांगण्यात आले.
साधी राहणी, गरीब मित्र, वृद्ध माता-पिता आणि फाटलेले कडपे, जोडे या चार गोष्टींची कधीच लाज बाळगू नये. कधीही आपल्या मनात गर्व किंवा अहंकार निर्माण होऊ नये याबाबतचे संत कबीर यांच्या दोह्याचा दाखला आपल्या प्रवचनात दिला. तो असा की, ‘कबीरा गर्व ना कीजिये, ऊंचा देख आवास । काल पड़ो भू लेटना, ऊपर जमसी घास ॥’ तुमच्या शक्ती, संपत्ती आणि देहाचा अभिमान बाळगू नका. जेव्हा आत्मा या शरीरातून निघून जातो तेव्हा सर्वात शक्तिशाली माणसाचे शरीर देखील जमिनीत गाडले जाते आणि त्यावर गवत उगवते. चार दिवसांचे जीवन मिळाले आहे कशाला उगाच घमेंड किंवा अहंकार करायचा. ‘अहंकारी व्यक्ती फुल सकता है फैल नही सकता…’ अहंकार म्हणजे विष होय अहंकार सोडून सरळता अंगिकारली तर मोक्ष मार्गाकडे आपली वाटचाल होऊ शकते असे दोहे, पारंपरिक गाण्यांच्या माध्यमातून प.पू. नीलेशप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनातून श्रावक-श्राविकांना पटवून दिले.(25/9/2025-जळगाव)
(शब्दांकन-किशोर कुलकर्णी, मो. 94227 76759)














