


इस्लाम धर्मातील सर्वात महत्त्वाचे आणि श्रद्धेचे जे सण आहेत त्यामध्ये ईद-ए-मिलादुन्नबी म्हणजेच पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांचा जन्मदिन हा विशेष मानला जातो. हिजरी दिनदर्शिकेनुसार रबी-उल-अव्वल महिन्याच्या 12व्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील मुस्लीम समाज हा दिवस उत्साह, भक्तीभाव आणि मोठ्या आदराने पाळतो. मात्र या सणाचा खरा अर्थ फक्त शोभा, सजावट किंवा उत्सव यात नाही, तर मोहम्मद पैगंबरांनी दिलेल्या शिकवणींमध्ये दडलेला आहे. हजरत मोहम्मद पैगंबरांनी जगाला शांतता, बंधुत्व, समानता आणि न्याय यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कृतीत करुणा आणि सादगी होती. त्यांनी गरिब, अनाथ, विधवा आणि वंचितांच्या हक्कासाठी नेहमीच आवाज उठवला. “इंसानियत सर्वात मोठा धर्म आहे” हा त्यांचा संदेश आजच्या काळात अधिकच प्रासंगिक वाटतो.
या दिवशी मशिदी, रस्ते आणि घरे सजवली जातात. ठिकठिकाणी जुलूस निघतात ज्यामध्ये नात (पैगंबरांची स्तुती करणारे गीते) गायली जातात. लोक समाजात शांततेचा संदेश देतात, कुरआनातील विचारांचे पठण करतात. गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे, अन्नदान करणे हीसुद्धा या दिवसाची खरी परंपरा आहे. त्यामुळे हा उत्सव धार्मिकतेसोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देतो. ईद-ए-मिलाद आपल्याला सांगते की धर्म केवळ इबादतपुरता मर्यादित नसून तो मानवतेची सेवा करण्याचा मार्ग आहे. जर प्रत्येक माणूस पैगंबरांनी दाखवलेल्या सत्य, करुणा आणि समतेच्या मार्गावर चालला, तर समाजात भेदभाव, द्वेष किंवा हिंसेला जागाच उरणार नाही.
आज जगभरात तणाव, दहशतवाद, हिंसा आणि असमानता यांचे सावट आहे. या परिस्थितीत ईद-ए-मिलादचा संदेश ‘संवादातून मतभेद मिटवा, दुर्बलांचा आधार बना आणि शांततेची वाट चाला’ हा प्रत्येकासाठी दीपस्तंभ ठरू शकतो. ईद-ए-मिलाद हा केवळ उत्सव नाही, तर पैगंबरांच्या अमर शिकवणींना आपल्या जीवनात उतरवण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण सर्वांनी संकल्प करायला हवा की समाजात करुणा, बंधुत्व आणि समानतेचे बीज रोवू. धर्माचा खरा अर्थ मानवतेची भलाई आहे, आणि हाच संदेश ईद-ए-मिलादच्या साजरीकरणातून पुन्हा अधोरेखित होतो. सर्वांना आज ईद-ए-मिलाद च्या पवित्र दिवशी आपल्या मनात श्रध्दा, कृतीत करुणा आणि जीवनात बंधुत्व नांदो.
प्रविण बागडे, नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919














