Home महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी अद्ययावत फूडप्रोसेसिंग प्रकल्पाची उभारणी कधी होणार !...

मुख्यमंत्री साहेब विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी अद्ययावत फूडप्रोसेसिंग प्रकल्पाची उभारणी कधी होणार ! ‘जैन फार्म फ्रेश-हिन्दुस्थान कोका कोला संत्रा उन्नती प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची मागणी ! ८ वर्षापूर्वी भूमिपूजन केलेल्या संत्रा प्रकल्पाची वचनपुर्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार का ?

155

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीचे नवे पर्व ठरणाऱ्या दापोरी परिसरातील ठाणाठुनी येथे १०० एकरापेक्षा अधिक जमिनीवर स्थापित होणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘जैन फार्म फ्रेश-हिन्दुस्थान कोका कोला संत्रा उन्नती प्रकल्पाचे’ भूमीपूजन दि. २९ डिसेंबर २०१६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले होते. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्म फ्रेश फूड्‌स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारला जाणार होता. या प्रकल्पात अद्ययावत उच्च तंत्रज्ञानावर आधारीत फूड प्रोसेसिंग प्लान्टची उभारणी केली जाणार होती मात्र ८ वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही ही शोकांतिका आहे.
विदर्भात एवढ्या वर्षाच्या काळात आज पर्यंत एकही संत्रा प्रक्रिया प्रकल्प राज्य सरकारला उभारता आला नाही. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फक्त तारीख पे तारीख देऊन सन १९५७, १९६३, १९९२, १९९५, २०१४, २०१७, २०१९, २०२१ च्या अर्थसंकल्पात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा करून विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्या गेली आहे. संत्रा प्रकल्पासाठी केल्या गेलेल्या या तारखा आणि घोषणा कधीच फळाला आल्या नाहीत. काही प्रकल्प सुरू होण्याच्या आधीच सुपडासाफ झाले असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला असून विदर्भातील १ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रूपेश वाळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील ‘जैन फार्म फ्रेश-हिन्दुस्थान कोका कोला संत्रा उन्नती प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाची भूमिका स्पष्ट करून मोर्शी तालुक्यामध्ये अत्याधुनिक संत्रा प्रकल्प निर्माण करण्याची मागणी केली आहे.
शासनाच्या उदासीन धोरणामुळे विदर्भ संत्राफळांच्या उत्पादनात माघारत आहे. उत्पादन चांगले असले तरी भाव मिळत नाही. शेती उद्योग प्रयोगशील असला पाहिजे. संत्री टेबल फ्रूट असून, चव चांगली आहे. यामुळेच ती जगात पोहचविणे गरजेचे आहे. सिंगापूर, बांग्लादेश, दुबईसारख्या देशांत संत्री कंटेनरने पोहचविण्याचा प्रयत्न सरकार तर्फे करणे गरजेचे आहे. बांग्लादेशात शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ पाठवून बाजारपेठेची माहिती घेऊन त्यानुषंगाने वरुडमध्ये राज्यातील पहिला डीहायड्रेशन प्रकल्प उभारून संत्री डीहायड्रेट करून विकली जातील. मोर्शीमध्ये संत्रा रस प्रक्रिया केंद्र सुरू करून त्याचे देशात विपणन करण्यासाठी ब्रँड निर्माण केला जाईल, असे ठोस आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना उद्घाटनप्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. ते आश्वासन हवेतच विरले असून, त्यानंतरच्या ८ वर्षांच्या काळात याबाबत कुणी ‘ब्र’ हीकाढलेला नाही. कोकाकोला आणि जैन इरिगेशनचा संयुक्त प्रकल्प मोर्शी तालुक्यातील दापोरी (ठाणाठुणी) येथे ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून साकारण्यात येणार होता परंतु ८ वर्षाच्या काळामध्ये जैन फार्म फ्रेश संत्रा उन्नती प्रकल्ल शासनाच्या उदासीन धोरणामुळे पूर्णत्वास जाऊन न शकल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादकांचा हिरमोड झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या सामंजस्य कराराचे काय होणार ?
मुंबईत १३ फेब्रुवारी २०१६ ला मेक इन इंडिया संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्य शासन व जैन एरिगेशनची उपकंपनी जैन फार्म फ्रेश व कोकाकोला ब्रिव्हरेज इंडिया लि. यांच्यात परस्पर सामंजस्य करार (एमएयू) करण्यात आला होता त्यानुसार मोर्शी तालुक्यातील संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचे प्रत्यक्ष भूमिपूजन करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ डिसेंबर २०१६ रोजी वचनपुर्ती केली होती त्याला ८ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

बहुगुणी संत्राला कधी येणार ‘अच्छे दिन ?
राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे विदर्भामध्ये ज्युस फॅक्टरी सोडाच. पण वायनरी प्रकल्प देखील सुरू होऊ शकला नाही. व्यापारी उच्च दर्जाची संत्री घेऊन जातात आणि दुय्यम दर्जाची संत्री फेकून दिली जातात. परंतु बहुगुणी संत्र्यावर संशोधन करून उत्पादने सुरू केल्यास संत्र्याला चांगले दिवस येऊ शकतात. परंतु याकडे कोण लक्ष देणार, हा प्रश्न आहे.

सोपॅक, नोगाचेही वाजले बारा !
वरूड तालुक्यामध्ये सन १९९२ मध्ये सहकारी तत्त्वावर सोपॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उभी राहिली. संत्रा रसाच्या बाटल्या ‘सोपॅक’ नावाने बाजारात आल्या. परंतु ही कंपनी सुद्धा बंद पडली. वरूड आणि काटोलकरिता असलेला संत्रा प्रकल्प मोर्शी तालुक्यातील मायवाडी औैद्योगिक वसाहतीत सन १९९५ मध्ये साकार केला. त्याचा मोठा गवगवा झाला. मात्र, प्रत्यक्षात तेथे फक्त संत्र्याला व्हॅक्सीनेशनच केले गेले आणि आता ते भंगार अवस्थेत पडला असल्याचे दिसत आहे.

मायवाडी येथील एमआयडीसी पांढरा हत्तीच !
मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथील एमआयडीसीच्या जागेमध्ये शासनाने एमआयडीसीचा फलक लावला व आज तेथे फक्त तो फलकच आहे. एक ही उद्योग येथे नसल्यामुळे रोजगार ही तरुणांना मिळाला नाही. अनेकांनी रोजगाराच्या नावावर राजकारण केले पण या एमआयडीसीत उद्योग आणून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे औचित्य मात्र कोणीच दाखविले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here