Home महाराष्ट्र “गण गण गणात बोते” म्हणत गंगाखेडच्या भाविकांनी घेतले गजानन महाराज पालखीचे दर्शन

“गण गण गणात बोते” म्हणत गंगाखेडच्या भाविकांनी घेतले गजानन महाराज पालखीचे दर्शन

231

 

प्रतिनिधी (अनिल साळवे)

श्री क्षेत्र शेगावीचा राजा श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे दिनांक 18 जून बुधवारी गंगाखेड शहरात आगमन झाले. तालुक्याच्या खळी गावापासूनच भक्तांनी “गण गण गणात बोते” म्हणत पालखीचे दर्शन घेत पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत केले.

शहरातील संत जनाबाई कमान रस्त्यावर भाविकांच्या वतीने पालखी मार्गावर फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. ही पालखी बुधवारी शहरातील नवा मोंढा भागातील कांकरिया निवास,येथून नगर परिषद कार्यालय परिसरात मुक्कामी थांबली या ठिकाणी शहरातील व परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या रांगा लावत भक्तीने गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले.शहरात जणू यात्रेचे स्वरुपच आले होते लहान बाळगोपाळानीही दर्शन घेत यात्रेमध्ये भरपूर आनंद घेतला.

श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा शेगांव वरून निघुन श्री क्षेत्र नागझरी,श्री क्षेत्र नरसी नामदेव,श्री क्षेत्र औंढा नागनाथ,श्री क्षेत्र त्रिधारा परभणी, ठाकूर बुवा दैठणा या मार्गे संत जनाबाई जन्मभूमी गंगाखेड येथे प्रतिवर्षी आगमन होते गंगाखेड येथे मुक्कामी थांबून श्री क्षेत्र परळी वैजनाथ, अंबाजोगाई,कळंब,श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज मंदिर धाराशिव, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री शेत्र मंगळवेढा मार्गे पंढरपूर येथे जाते.

पालखीतील वारकऱ्यांसाठी गंगाखेड येथील कांकरिया परिवार व धोका परिवारांच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी राजेश्वर फंक्शन हॉलचे सुरेश नळदकर, अभिनय नळदकर यांच्या वतीनेही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पालखीतील वारकऱ्यांसाठी दरवर्षी नगर परिषदेच्या वतीने मुक्कामी राहण्याची व्यवस्था करण्यात येते.

गत ५६ वर्षापासून श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम गंगाखेड येथे होत आहे. दिनांक १८ जून बुधवार रोजी गंगाखेड येथील नागरिकांच्या वतीने पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.गुरुवारी पहाटे पाच वाजेदरम्यान
पालखी आणि पायीदिंडी परळीकडे मार्गस्थ झाली. मुक्कामाच्या दिवशी गंगाखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here