Home पुणे मती गेली, निती गेली, मुलगी गेली!

मती गेली, निती गेली, मुलगी गेली!

205

मुलीच्या आईबापाची चूक आहे. जो माणूस लग्नातून इतकी संपत्ती कमवत असेल तो किती चारित्र्यवान असेल? तरीपण यांनी लेक त्या लालची माणसाला दिली. तर यांचा पण हेतू चांगला नव्हताच.

मुलगी सांगते, पती छळ करतो, हाणामारी करतो. तर तिला पुन्हा सैतान कडे का पाठवले? लेक प्यारी कि संपत्ती प्यारी?

       मुला मुलींचे लग्न नवीन संसार उभा करण्यासाठी करतो. पण हे लग्न नव्हते तर लॉटरी चे तिकीट होते. दोन्ही कडील पालकांचा समोरच्या संपत्ती वर डोळा होता.

मुलीला मारले म्हणून आता आईबाप रडतात. दया येते. पण यांनी सुद्धा मुलाकडील संपत्तीच्या हव्यासापायी मुलगी कुर्बान केली आहे.

     या पन्नास च्या वयापर्यंत कोणी सज्जन मुलगा कधी ओळखता आला नाही. कदाचित सज्जन आणि दुर्जन ओळखण्याची दृष्टी नसावी. फक्त संपत्ती मोजण्याची दृष्टी होती. तर मग हा परिणाम भोगावा लागेलच.

      पैशांसाठी जावई आपल्या मुलींचा छळ करतो. मारूनही टाकतो. असे अनेकदा घडलेले आहे. हे ज्ञान या आईबापांना का झाले नसेल? यापुर्वीच घडलेल्या घटनांकडे यांनी का दुर्लक्ष केले असेल? धन दौलतीची झापड डोळ्यावर बसलेली असते. अशी माणसे जिवाची आणि जगण्याची पर्वा करीत नाहीत. स्वताची आणि इतरांची सुद्धा.

      यांनी लग्नात कार भेट दिली. ती पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातून. याचा अर्थ हे लग्न नव्हते तर फक्त मिजाज होता.

       मला लग्नाचे आमंत्रण आले. मी गेलो. जर तेथे सिंदाड, लफडेबाज आमदार, खासदार, मंत्री चा अनावश्यक उदोउदो केला कि मी जेवण न करता परत येतो. जेथे राक्षसांचा सन्मान होतो तेथे देव थांबत नाहीत. तर मानवाने तरी का थांबावे?

       माझे निरीक्षण आहे, अनेक मंत्री नवरी मुलीकडे भिबीत्स नजरेने पाहातात. काही चाणाक्ष लोकांनी यांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल केले आहेत. हे ज्यांनी पाहिले ते सुद्धा आपल्या मुलीच्या लग्नात त्याच मंत्री ला बोलवतात.

      मला वाटते, या आईबापांना असेच राक्षस प्रिय वाटत असतील तर मी, तुम्ही, आपण काय करणार?सान्त्वन करण्यापलिकडे.

      एकाचे पाहून दुसरा शहाणा होत नसेल तर त्याचे दुःख बाळगणे वायफळ ठरते. बकरी लांडगाकडे पळत असेल तर आपण तरी किती पाठलाग करावा?

      आतापर्यंत अनेक साधू-संत, महंत, महात्मा सांगून गेले. कि दुर्जन संगती नको. सहवास नको. विश्वास नको. तरीही लोक दुर्जनांचा लाभ लोभ धरत असतील तर काय उपयोग?

      माझ्या जळगाव जिल्ह्यातील बाई बाटलीचे मंत्र्यांना लग्नात बोलवून सत्कार करतात. नवरी सोबत फोटो काढतात. पालकांची बुद्धी भ्रष्ट झाली तर पाल्यांचे भविष्य नष्ट होणारच.

     लग्न विवाह हा कौटुंबिक विधी आहे. ते शुभ व्हावे, टिकुन राहावे म्हणून ब्राह्मण भटजींच्या हस्ते देवादिकांना, पर्वजांना आमंत्रित करतो. त्या ब्राह्मण भटजीला थांबवून राजकीय राक्षसांचा सन्मान, सत्कार करीत असाल तर चांगली अपेक्षा ठेवू नका.

      घटनेचे विश्लेषण आणि आजाराचे निदान योग्य केले नाही तर त्यावर उपाय होत नाही. केला तरी चुकीचा होता. लग्ना आधी मुलगा मुलीच्या आईबापाची मानसिकता काय होती? लग्नात कशी होती? हे अभ्यासले पाहिजे. मानसिकता असते तसेच माणसे कृत्य करतात. तशाच घटना पुढे घडतात. मन, कर्म आणि फल ही शृंखला असते. अशा शृंखलांनी जिवन बनते. मन आणि कर्म हे उचित कि अनुचित यावर फल अवलंबून असते.

     मी दारूच्या दुकानावर गेलो. तूप मागितले. तर मिळणार नाही. दारू मिळेल. मी दुधाच्या दुकानात गेलो. दारू मागितली तर मिळणार नाही. दूध, दही ,तूप मिळू शकते. मी कोणत्या दिशेने जात आहे, कोणत्या वाटेने जात आहे, कोणासोबत जात आहे त्यावर माझे उद्दिष्ट लक्षात येते. आपले उदिष्ट अयोग्य असेल तर इतरांना दोष देऊन काय उपयोग?

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here