


चिमूर – उन्हाळी हंगामात, चंद्रपूर जिल्ह्याच्या उष्ण तापमानामुळे पाणी टंचाई निर्माण होते. ज्यामुळे पक्षी आणि प्राण्यांना निर्जलीकरण, थकवा आणि उष्माघात होतो. असे टोकाचे वातावरण त्यांच्यासाठी जीवघेणे आहे. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामगीता महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पर्यावरण शास्त्र विभाग आणि प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त वतीने दिनांक 25 एप्रिल ते 1 मे, 2025, या कालावधीत पक्ष्यांना वाचविण्यासाठी ‘केअर फाॅर नेचर’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या, प्लेट्स आणि कॅन वापरून ‘बर्ड वॉटर फीडर’ तयार केले. या बर्ड वॉटर फीडर मध्ये पाणी भरून विद्यार्थ्यांच्या घराभोवती आणि कॉलेजच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी टांगण्यात आले आहे. हे वॉटर फीडर केवळ पक्ष्यांनाच नाही तर मधमाश्या, फुलपाखरे आणि खार यांनाही आकर्षित करत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बिजनकुमार शील, डॉ. निलेश ठवकर, प्रा. विवेक माणिक, डॉ. सुमेध वावरे आणि श्री निखिल भालेराव यांनी विशेष प्रयत्न केले.













