Home महाराष्ट्र राजकीय खेळापेक्षा मैदानी खेळ अधिक चांगले – आ.डॉ.गुट्टे

राजकीय खेळापेक्षा मैदानी खेळ अधिक चांगले – आ.डॉ.गुट्टे

305

 

(अनिल साळवे, गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड – राजकीय डावपेच आम्हाला चांगले माहीत आहेत. पण, मैदानावर खेळले जाणारे खेळ मात्र, आम्हाला तेवढे जमले नाहीत. परंतु, मैदानी खेळ हे अधिक महत्वाचे व चांगले असतात. कारण मैदानी खेळांमुळे शरीर व मन दोन्हीही तंदुरुस्त राहाते. मात्र, राजकीय खेळांमुळे मानसिक त्रास होतो. उत्कृष्ठ व होतकरू असलेले ग्रामीण भागातील खेळाडू ज्यांना पैशाअभावी आपल्या क्रीडा कौशल्यास वाव मिळत नाही, अशा खेळाडुंसाठी मी माझ्या परीने मदत करत असतो. कारण, गुणवंत आणि होतकरू खेळाडूंच्या पाठीशी उभे राहाणे माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.
शहरातील महारुद्र कुस्ती तालीम केंद्राचे उद्घाटन आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी केंद्र स्थापन केल्याबद्दल आ.डॉ.गुट्टे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच लाल मातीतला हा खेळ तालुक्यातील तरूणाईला आकर्षित करणारा ठरावा, असाही मनोदय व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार पटेल, माजी नगरसेवक तुकाराम तांदळे, पांडुरंग नेजे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पैलवान उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभली आहे. तांबड्या मातीत घाम गाळून अनेक मल्लांनी महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर केले आहे. कुस्तीक्षेत्रात अनेक मल्लांनी वेळोवेळी भरीव अशी कामगिरी केली आहे. आपल्या प्रांताचे प्रतिनिधि करत त्यांनी कुस्तीचे आखाडे गाजवले आहेत. याच मल्लांची प्रेरणा घेत अनेक उद्योमुख मल्ल कुस्तीत करिअर करण्याचे उद्देशाने वळताना दिसत आहेत. आजही घराघरात एक पैलवान असावा अशी लोकभावना आहे. पिळदार शरीरयष्टी सोबत चपळता बाळगणाऱ्या पैलवानांच्या पिढ्या आजही आपल्याला पहायला मिळतात. कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक पैलवानांना प्रोत्साहन म्हणून आपणही पुढे सरसावले पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात कुस्तीत येवू पाहणाऱ्या नव्या मल्लांसाठी ठिकठिकाणी अशी कुस्ती केंद्रे होणे काळाची गरज आहे.
महाराष्ट्रात कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा काळ हा मल्लविद्येचा वैभवकाळ समजला जातो. या काळात मल्लविद्येला उत्तम राजाश्रय मिळाला. छोटेमोठे संस्थानिकही आपल्या पदरी मोठ्या अभिमानाने मल्ल बाळगीत. मोगल बादशहांच्या काळातही कुस्तीला राजाश्रय मिळत असे. हिंदू राजे, सरदार तसेच मुस्लिम नबाब आपल्या पदरी नामांकित मल्ल बाळगत. गावोगाव जत्रा, उत्सव, उरूस यांमध्ये कुस्त्यांचे फड होत. याच काळात प्रसिद्ध आखाडे निर्माण झाले. शाहू महाराजांनी कुस्ती या खेळावर पुत्रवत प्रेम केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर विविध संस्थाने खालसा झाली. कुस्तीला आणि मल्लांना मिळणारा राजाश्रय थांबला. मात्र, या कठीण काळात कुस्तीला लोकाश्रयाचा आधार मिळाला. यात्रा, जत्रा, उरूसात भरणाऱ्या स्पर्धेतून कुस्ती जिवंत राहिली. कुस्ती हा असा खेळ आहे, ज्या खेळात धर्म, जात, वर्ग, वंशाला कोणतेही स्थान नाही. तांबड्या मातीलाच सर्वस्व मानुन प्रत्येक मल्ल एकाच आखाड्यात सर्वांच्या बरोबर घाम गाळत असतो. सर्वांच्या सोबतीने राहून एकाच ताटात जेवन करत असतो. कुस्तीचा आखाडा हे ठिकाण समता, बंधुत्वाचे महत्वाचे उदाहरण म्हणून घेता येईल, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.
कुस्ती म्हणजे बल आणि बुध्दीचा संगम असलेला रांगड खेळ!
‘कुस्ती’ हा रांगडा खेळ. बल आणि बुद्धीचा संगम घडवत खेळला जाणारा खेळ. शक्ती बरोबरच बुद्धीचातुर्याचा कसबी वापर करणारा खेळाडू हा मल्लयोद्धा, पैलवान म्हणून गणला जातो. अगदी अनादी काळापासून कुस्ती जगभर खेळली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता मॅटवरची कुस्ती खेळविली जाते. मात्र, भारतीय कुस्ती ही प्रामुख्याने लाल मातीवरच विकसित झाल्याचे दिसते. ‘कुस्ती’ हा मराठी शब्द ‘कुश्ती’ या फार्सी शब्दावरून तयार झाला आहे. त्याचा अर्थ मल्लयुद्ध, अंगयुद्ध किंवा बाहुयुद्ध असा आहे, असेही आ. डॉ. गुट्टे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here