Home खेलकुद  चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन! 

चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन! 

224

  ९ मार्च २०२५ ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे कारण या दिवशी मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंड संघावर चार गडी राखून विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा भारताचे नाव कोरून इतिहास घडवला. यावेळची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई या देशात खेळली गेली. या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सुरुवातीपासूनच भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. काहीही करून यावेळी संघाला चॅम्पियन करायचेच अशी खूणगाठ कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बांधली होती. विश्व कसोटी चॅम्पियन स्पर्धेत ( wtc ) भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहाचवण्यास आलेले आल्यास अपयश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पराभव विसरून त्यांनी नव्याने सुरुवात केली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कोणते खेळाडू हवेत याचा पक्का विचार रोहित शर्माच्या मनात होता. त्याने निवड समितीकडून त्याला हवे ते खेळाडू घेतले. दुबईतील खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने त्याने पाच फिरकी गोलंदाजांना संघात घेतले त्यातील रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या चार फिरकी गोलंदाजांना त्याने अंतिम अकरा मध्ये खेळवले आणि चारही फिरकी गोलंदाजांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत अप्रतिम कामगिरी केली.

या चौघांना जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी , हार्दिक पांड्या आणि हर्षित राणा यांनी सुरेख साथ दिली. भारताची गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. ज्या ज्या वेळी सामना भारताच्या हातातून निसटला असे वाटत होते त्या त्या वेळी गोलंदाजांनी संघाला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीतही भारताच्या सर्व गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती चारही फिरकी गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून न्यूझीलंडच्या फलंदाजांना जेरीस आणले. त्यांना मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या ने सुरेख साथ दिल्याने भारताने न्युझीलंड संघाला अवघ्या २५१ धावात रोखले. न्युझीलंड संघाने डावाची सुरुवात तर धमाकेदार केली पण रचीन रवींद्र आणि केन विल्यम्सन हे त्यांचे भरावशाचे फलंदाज बाद झाल्यावर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी फास आवळला आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांना वेसण घातली त्याचा परिणाम असा झाला की त्रिशतकी मजल मारणारा न्युझीलंडचा संघ २५१ धावाच करू शकला. न्युझीलंड संघाला २५१ धावांवर रोखून भारताने अर्धी लढाई जिंकली. केवळ गोलंदाजांनीच नव्हे तर फलंदाजांनीही छान कामगिरी केली.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने ७४ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने आणि शुभमन गीलने शतकी सलामी देऊन विजयाचा पाया रचला. रोहित शर्मा हाच अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. विराट कोहली स्वस्तात बाद झाला तरी श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी भारताला विजयी केले. अंतिम सामन्यातच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेत भारताच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली . या स्पर्धेत भारताचे क्षेत्ररक्षणही अप्रतिम होते. एकूणच गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर भारताने अप्रतिम कामगिरी करीत हे विजेेतेपद मिळवले. रोहित शर्माने संघाचे कर्णधारपद अतिशय कुशलतेने सांभाळले. या विजतेपदात जितका खेळाडूंचा वाटा आहे तितकाच सपोर्ट स्टाफचाही आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि त्यांच्या टीमने पडद्यामागे मोठी कामगिरी बजावली त्यामुळेच भारत पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेत विजेता बनला. भारतीय संघाचे हे विजेतेपद खास आहे कारण भारतीय संघाचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आहे. २००२ साली भारताने श्रीलंके सोबत संयुक्त विजेतेपद मिळवले होते. तेंव्हा भारताचा कर्णधार सौरभ गांगुली हा होता . त्यानंतर २०१३ साली महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना भारताने इंग्लंडला हरवून दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती त्यानंतर बारा वर्षानंतर भारतीय संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

तीनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारत हा पहिला देश आहे. त्यामुळेच भारतासाठी हे विजेतेपद ऐतिहासिक आहे. तीनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारताने आम्हीच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स आहोत हे जगाला दाखवून दिले. हे विजेतेपद मिळवून भारतीय संघाने क्रिकेट विश्वावर आपली हुकूमत पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. कारण आयसीसीच्या सलग तीन स्पर्धेत भारताने अंतिम फेरी गाठली त्यात भारताला दोनदा विजेतेपद मिळवण्यात यश मिळाले. फक्त एकदाच भारताला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला तो २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया कडून मात्र त्यानंतर मागील वर्षी टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्व विजेतेपद मिळवले होते आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून भारताने क्रिकेट विश्वातील आपली मक्तेदारी सिद्ध करून आपणच क्रिकेट मधील सर्वोत्तम संघ आहोत हे जगाला दाखवून दिले आहे. तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवणाऱ्या चॅम्पियन्स भारतीय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here