Home महाराष्ट्र चांगल्यांना टोचण्या जास्त असतात

चांगल्यांना टोचण्या जास्त असतात

169

मुर्खाच्या आवेशात

वेश काय बदलता

तुमचे ते वर्तन नव्हे

शहाणे समजत होतो

उगाच म्हणत होतो….

तुम्ही तर त्यातलेच

एवढे आतले वाटले नव्हते

दुष्काळी सदा-

सुकाळी कधीच नव्हते….

   या पंक्ती उगाच सुचल्या म्हणून नाहीत तर समाजातला एक मोठा आकडा असाच आहे ज्यांना चुका काढण्यात आणि त्या आवर्जून सर्वांपुढे दाखवण्याची भारी हौस असते. चूक असेल तर सांगावी; आणि तीही खाजगीत, सार्वजनिक माहौल करण्यात कसली आली मजा! इथे तिथे कायम ‘उठ हशा’ करण्यात जिंदगी संपत आहे याची जाणीव संपता संपता तरी व्हायलाच हवी. चांगली माणसे आणि चांगली कर्मे सध्या दुर्मिळ होत असण्याचे मुळात कारण हेच आहे. कारण कौतुक म्हणून काही नाही तर नाहीच त्याशिवाय काटेरी कुंपणात काटे खुपसणारेच जास्त होवू पाहत आहेत. आपले दुःख ते आपले आणि आपले सख्ये ते पक्के! बाकीच्यांचे काय? सगळी मोजणी उघड्यावरच आणखी किती दिवस आणि का म्हणून करायची? बरं,काही उसनवारी पण नाही फेडत बसायला. चांगुलपणाचा टेंबा मिरवायचा आहे म्हणून चांगल्याचाच जीव घेणे हे किती योग्य आहे? अयोग्याला योग्य म्हणण्यात काही अर्थ तर नाहीच शिवाय स्वतःच मिशी ताणून व फुटलेले पोट आणखी फुगवून आपलीच मर्दुमकी गाजवात बसायची. चांगल्यात एक दुर्गुण असतो; की तो खूप चांगला असतो. त्याचा फायदा ही सो कॉल्ड जमात घेताना दिसत आहे. तुम्ही दारू पिवून रस्त्यावर लोळा, तुम्हाला कोणी काहीच म्हणणार नाही. तुम्ही पाकीट मारा की डाका टाका- तुमच्याकडे लक्ष पण देणार नाही. कारण ही लक्ष्याधिष्टीत म्हणवली गेलेली माणसे याकडे लक्ष देणारी नसतात; कारण ती चांगली नसतात. अशा लोकांच्या वाट्याला जाण्यापेक्षा त्यांची वाट सुकर करणारे भरपूर आहेत आणि ते करत असताना दुर्गुणपणा आपण झाकतोय याची लाज अजिबात कोणालाही वाटत नाही. पण चांगल्यात लाथा मारून पाणी काढल्यागत आव आणणारे कित्येक आहेत.

    नियमांवर बोट ठेवून पण कामे सध्या भरपूर होत आहेत. तरीसुद्धा हे भरपूर नियम काहीनांच लागू आहेत. आपली बिशाद जर खरेच कठोर असेल तर कठोर हवीच पण नियम म्हणजे सर्वांना सारखे व सर्वांना लागू तसे तुम्हीही लावून घ्या. नाहीतर लावून-लावून चांगल्यांनाच खायचं आणि दुसऱ्यांना मात्र ओसरीपर्यंत पसरू द्यायचं, हे काही बरोबर नाही. 

   जग सुधारविणारे आधीही होते आणि आताही आहेत. रोखणारे पण आधीही होते आणि….. पण, हे काही थांबले नाही. मग जिथे चवीला तुम्ही तिखटही होऊ शकत नाही तिथं बेचव तरी कशाला करताय. कोणाला टोमणा म्हणून लिहिणे नाही तर कोणाला काहीतरी बरे दिसत नाही म्हणून लिहिणे. आपल्याने बदल होत असेल तर करावा. तो तुमच्या दृष्टीने चांगलाच असेल पण आपले अनुयायी किती? हे पाहून करावा. नाहीतर चारजण मागे म्हणून हजारोच्या नेतृत्वाला टशन देत बसू नाही.

  स्तुत्य काम करणारे करत राहणार; कारण त्यांच्यात पण एक किडा आहे चांगले काम करण्याचा. तो मरत तर नाहीच पण जगत असताना सरत तर कसाच नाही. तिथे आपली हालचाल ही व्यर्थ घालण्यापेक्षा शरीराच्या हालचालीत (व्यायायामात) घातली तर उत्तमच. शरीर सुदृढ व्हावे म्हणून तर अजिबात नाही तर रक्ताभिसरण सुधारून बुद्धी तल्लख व्हावी म्हणून! कारण नाही म्हणले तरी मनाच्या जवळ मेंदूच असतो. इथल्या गाठी आडकाठी आणत असताना आपण स्वस्थ बसूच नये. बाकी समजणारे समजतील आणि न समजणारे पसरतील….

वसा हा वसाच असतो

तो असा तसा नसतो

डोंगर आडवे करणारे

पसरट्यांना पसरत नाहीत….

पाणी खूप आतवर आहे आपल्या

तिथे वर-

वरवरच्यानांना दिसत नाही…

✒️अमोल चंद्रशेखर भारती(नांदेड)मो:-8806721206

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here