


🔹 शासन समायोजन करण्याचा निर्णय घेणार का ?
✒️गडचिरोली विशेष प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)मो:-96234 59632
गडचिरोली(दि.25फेब्रुवारी):- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी गट ब आणि भरारी पथकातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी आयुक्तालय, आरोग्य भवन मुंबई येथे ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालयाचे सचिव, आयुक्त, आरोग्य विभाग संचालक, उपसचिव, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाचे राज्याध्यक्ष,मानसेवी वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष, प्रतिनिधी, भरारी पथक आणि कार्याध्यक्ष भरारी पथक, बी एस एम एस वैद्यकीय फोरमचे प्रतिनिधी यांचा सह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भरारी पथकातील वैद्यकीय अधिकारी समायोजना पासून वंचित आहेत.
20 जून 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समायोजनाचा निर्णय होऊन तीन महिन्यात कारवाई करण्याचे आदेशित करून बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते . परंतु मागील दोन वर्षापासून हा प्रश्न प्रशासकीय स्तरावर दुर्लक्षित कारभारामुळे प्रलंबित आहे. या बाबींकडे आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पराकोटीने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मागील सरकारच्या काळात मंत्री महोदयांनी सदरहू प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला होता. परंतु तत्कालीन सचिवांकडून कॅबिनेट नोट न आल्यामुळे तो अपूर्ण राहिला तरी महायुती सरकारकडून आपल्या च सरकार कडून झालेला निर्णय अंमलबजावणी करण्यात दिरंगाई केली जात आहे. भरारी पथकातील वैद्यकीय यांच्या सेवा समावेशनाचा निर्णय मंत्रिमंडळात बैठकीत सादर करून, मागील पंधरा वर्षापासून आदिवासी,अतिदुर्ग, नक्षलग्रस्त भागात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांना न्याय द्यावा.
कोरोना महामारीच्या काळात या डॉक्टरांनी आपल्या जिवाची पर्वा न करता डोंगराळ भागात अविरतपणे सेवा केली. आजही सदर वैद्यकीय अधिकारी आदिवासी दुर्गम भागात अविरतपणे आरोग्य सेवा देत आहेत. मात्र समायोजन करण्यासाठी शासन अपयशी का ठरले आहे. हा गहन प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बैठकित समायोजन करण्याची दखल घेतली जावी. आणि अल्पशा मानधनावर काम करित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्याय द्यावा.














