


छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल, दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना) व रमाई महिला मंडळ सवांदगांव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर वैजापूर तालुक्यातील सवांदगांव येथे मूकनायकच्या १०५ व्या वर्धापनदिनानिमित्त मी लोकशाहीचा पाठीराखा असून कोणत्याही आकारात आणि पद्धतीत असलेल्या एकाधिकारशाहिचा विध्वंसक आहे. या विषयावर ९१ वी वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा २ फेब्रुवारी २०२५ ला संपन्न झाली.
फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला न्यूनतम लागत मूल्य मिळायला हवे. ते मिळविण्यासाठी लढायचे असेल तर ज्ञान असावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे, जो प्राशन करील तो गुरगरल्याशिवाय राहणार नाही असे म्हणाले होते. असे होऊ नये म्हणून सरकार नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सामान्य जनतेला शैक्षणिक प्रवाहापासून दूर लोटत आहे. आज आपण छत नसलेल्या फाटलेल्या आभाळाखाली बसलेले आहोत ही आपली अवस्था कुणी केली असेल बरे? ग्रामपंचायतीमार्फत सरकारी जमिनीवर सागवान झाडे लावून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविले पाहिजे. जेणेकरून ग्रामवासियांच्या विकासाला हातभार लावता येईल. लाडक्या बहिणींना दिले जाणारे १५०० रुपये येतात कुठून? याचा विचार करून फुकटात मिळणा-या सवलती नाकारून स्वयंरोजगाराचे कौशल्य विकसित केले पाहिजेत. अर्थसंकल्पात आपल्यासाठी कोणत्या तरतुदी केल्या जातात? हे समजून घेण्यासाठी लोकशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. महिला सशक्तीकरणावर भर दिला पाहिजे. महिलांच्या सहकार्य व सहभागातूनच सशक्त व सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकेल.
आपल्या सर्व समस्या निर्मूलनासाठी तरतुदी जाव्यात म्हणून १९ जानेवारी १९३१ ला गोलमेज परिषदेत मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, मी लोकशाहीचा पाठीराखा असून कोणत्याही आकारात व पद्धतीत असलेल्या एकाधिकारशाहिचा विध्वंसक आहे. याचा विचार करून समाज जीवनाच्या विविध क्षेत्रातील एकाधिकारशाही मोडीत काढून कौटुंबिक व सामाजिक व्यवहारात लोकशाहीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. याची जाणीव व्हावी म्हणून आपण आज सदरील विषयावर चर्चा करीत आहोत. करिता आपण सर्वांनी प्रत्येक रविवारी एकत्रित येऊन सातत्याने विविध विषयांवर चर्चा करीत राहिले पाहिजे. जेणेकरून परस्परांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहकार्याची देवाणघेवाण होऊ शकेल. आपल्या सर्वांगीण समस्या निर्मूलनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी दिलेल्या संदेशाचे मर्म आणि त्याची वर्तमान प्रासंगिकता आपण समाजाला संदर्भासहीत समजावून सांगितली पाहिजे. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेत नेमके काय घडले? याची सामान्य जनतेला जाणीव करून दिली पाहिजे.
याप्रसंगी ऋषीकेश पठारे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारताचे संविधानाविषयी सजग राहून अंमलबजावणी केली पाहिजे. रंगनाथ निवृत्ती म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले पाहिजे. मिलिंद बागूल म्हणाले की, समाजातील सर्व समाज घटकांचा विकास म्हणजे समाजाचा विकास होय. आपण सातत्याने काम करीत नसल्याने नेमके काय करावे हे कळत नसते? शेतक-यांनी आपली दयनीय अवस्था दूर करण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय उद्योग सुरू केले पाहिजेत. आपली प्रगती करण्यासाठी कौशल्यावर आधारित छोट्या छोट्या गटामार्फत उद्योग व्यवसाय सुरू करावेत. बाबासाहेब आंबेडकर एकाधिकारशाहीचे विध्वंसक होते म्हणून आपण परस्परांच्या सहकार्याने पुढे जाण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. करिता घराघरात बाबासाहेब आंबेडकर निर्माण करण्यासाठी प्रक्रिया राबविली पाहिजे.
प्रमुख वक्ते गोरख शिवाजी कदम म्हणाले की, राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले यांच्या कार्यामुळे महिला प्रधानमंत्री, राष्ट्रपती होऊ शकल्या आहेत. भिल्ल एकलव्याने मातीच्या पुतळ्याला गुरू मानून विद्या प्राप्त केली होती. आजही आपण संवैधानिक अधिकारांपासून कोसो दूर आहोत म्हणून प्रत्येक रविवारी साप्ताहिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत.
सुरुवातीला आदर्शांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या तर रमाई महिला मंडळाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रणाली बागूल या बालिकेने सुरज और चाँद को क्या पता हमारे देश में भारत का संविधान और लोकतंत्र का राज है? याची जाणीव करून दिली. या कार्यशाळेला हौसाबाई एकनाथ बागूल ह्या आवर्जून उपस्थित होत्या. कार्यशाळेचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक एड. विलास रामटेके यांनी केले. या कार्यशाळेला बंडू रिठठे, गोरखनाथ कदम, रुपेश कदम, मच्छिंद्र बागूल, रामचंद्र पगारे, विजू बागूल, सुरेखा बागूल, वर्षा बागूल, प्रणाली बागूल, साखराबाई बागूल, नीलम बागूल, श्रद्धा बागूल, कविता बागूल, कलाबाई बागूल, आंजनाबाई बागूल, जनाई बागूल, सुदूबाई बागूल, हौसाबाई बागूल, लकसाई बागूल, सुमनताई बागूल, अभियश सातदिवे, सोहम घोरपडे, मिनिल पठारे, ऋषिकेश पठारे, दिनेश बागूल, बाळू बागूल, निवृत्ती सोनवणे, उद्योजक मिलिंद बागूल, एड. विलास रामटेके इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. अशाप्रकारे आभार प्रदर्शनाने ग्रामीण भागात सुद्धा कार्यशाळा हर्षोल्हासात संपन्न झाली.













