Home महाराष्ट्र मुळी बंधारा येथे जलपूजन सोहळा उत्साहात संपन्न

मुळी बंधारा येथे जलपूजन सोहळा उत्साहात संपन्न

350

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8फेब्रुवारी):-अवघ्या जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी राजाची ओळख आहे. शेतकरी आपलं संपूर्ण जीवन उधळून शेती करत असतो. बियांप्रमाणे आपलं नशीब सुद्धा मातीत फेकतो. एवढे करूनही जर नशिबाने काही दिलं नाही, तर निराश न होता पुन्हा एकदा नव्याने सुरवात करत असतो. सध्या पुरेसे मनुष्यबळ मिळत नसल्यामुळे दिवसेंदिवस ही शेती करणे अवघड होत आहे. केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील लाखो शेतकरी पारंपारिक पध्दतीने शेती करतात. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: शेती उत्पादनात तोटा सहन करावाल लागतो. त्यामुळे बदलेल्या काळाचा आणि तंत्रज्ञानाचा सर्व शेतकरी बांधवांनी सकारात्मक विचार करून आपली शेती पध्दती अगदी खते सुध्दा बदलली पाहिजे. म्हणजे रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

तालुक्यातील गोदावरी नदीवर मुळी बंधारा येथे आ.डॉ.गुट्टे यांच्या हस्ते विधिवत पूजेसह जलपूजन संपन्न झाले. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आपल्या मतदारसंघाच्या उज्जवल भविष्यासाठी पाणी जपून वापरा, पाण्याची बचत करा आणि काळजी घ्या, असेही आवाहन त्यांनी केले. आध्यात्मिक श्रध्दाभाव ठेवून आयोजित या सोहळ्यात अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करून मुळी बंधाऱ्याची गरज, महत्त्व आणि भविष्यातील फायदे आवर्जून सांगितले. याप्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांनी सुध्दा बंधाऱ्याबद्दल समाधान व्यक्त केले. येत्या काळात या बंधाऱ्यामुळे परिसरातील सिंचन क्षमतेसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असाही विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. 

पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, गोदावरी नदीवरील मुळी बंधाऱ्याचा हा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता. त्यामुळे गेल्या टर्मपासूनच हा विषय आपण लावून धरला होता. त्यासाठी सातत्याने कागदोपत्री पाठपुरावा सुरू होता. वेळोवेळी संबंधित विभाग आणि मंत्री महोद्यांना भेटलो सुध्दा आहे. त्यास आता यश आले असून आज हा जलपूजन सोहळा संपन्न होत आहे, याचे मला विशेष आनंद होत आहे. त्यातून परिसरातील जवळपास २० ते २२ गावांना चांगला फायदा होईल, याचेही मला समाधान वाटते. कारण, परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी मुळी बंधारा प्रश्न सुटणे आवश्यक होते, याची जाणीव ठेवून आजपर्यत प्रामणिक प्रयत्न केले आहेत. लोकहित, लोककल्याण आणि सर्वांगीण विकास हीच आपल्या आपल्या शेतीविषयक कामाची त्रिसूत्री आहे. त्यामुळे येत्या काळात सुध्दा आपल्या शेतकरी बांधवांसाठी आवश्यक ते सर्व प्रश्न, समस्या, अडचणी आणि प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कटिबध्द आहे. 

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातल्या शेतकऱ्यांनी अगदी रक्ताचा घाम गाळून पुन्हा एकदा शेती व्यवसाय धडाडीने केला. स्वातंत्र्यानंतर अगदी अन्नधान्याच्या कणा कणाला मोताद असलेल्या आमच्या शेतकरी बंधूंनी अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवले आहे. गेल्या काही वर्षीत आपल्या शेतकरी बांधवांनी भरपूर परिश्रम करून अगदी विक्रमी खाद्यान्न, फळ, फळावळ तसेच भाजीपाला पिकवून आपले सामर्थ्‍य वेळोवेळी दाखूवन दिले आहे. त्यामुळे आपले शेतकरी खूप मेहनती, प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत, याची देशाला प्रचिती आली आहे. परिणामी, आज देशातल्या शेतीचे अर्थकारण हे पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे शेतामध्ये राबणाऱ्या, घाम गाळणाऱ्या, काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला मान-सन्मान आणि आत्मविश्वास तसेच प्रोत्साहन देणे आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी सुध्दा आहे, असेही आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी केले. 

रासायनिक खतांचा शेतीत अतिप्रमाणात वापर केल्यामुळे शेतजमीन नापीक होते. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून सेंद्रीय शेती केल्यास निश्चितच जमिनीचा कस वाढून शेतजमिनीची उत्पादकता वाढणार आहे. सेंद्रीय शेतीतून पिकवलेले भाजीपाला व फळभाज्या ह्या आरोग्याच्या दृष्टीने सकस व दुष्परिणामरहीत असणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाची जनजागृती किंवा प्रबोधन करण्यासाठी शासन सातत्याने पुढाकार घेत असते. त्यातूनच वेगवेगळ्या योजना व उपक्रम पुढे येत आहेत. तरीही विविध मार्गाने शेतकऱ्यांना शासनाच्या विवधि योजनांची माहिती, शेती व्यवसायातील अनेकविध संधी, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेती अवजारे यांची माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशातील जवळपास ५४ टक्क्यांपेक्षा अधिक लोक शेतीच्या धंद्यामध्ये आहेत. त्यातील हजारो शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपला शेती व्यवसाय फायद्यात आणीत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सुध्दा नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. तसेच देशभरातील शेतकरी वर्गासाठी उत्तम प्रकारचे बियाणे आणि खते, संकरित वाण आणि औषधे, शेतीमालाला चांगली किंमत, शेतीसाठी जोडधंदा असेही प्रयोग होणे काळाची गरज असल्याचेही आ.डॉ.गुट्टे यांनी म्हटले.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती साहेबराव भोसले यांनी तर सूत्रसंचालन दासराव भोसले यांनी केले. आभार प्रा.डॉ.मुंजाजी चोरघडे यांनी मानले. यावेळी अध्यक्षस्थानी अध्यक्ष माणिकरावजी पवार मुळीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा मित्रमंडळाचे विधानसभा अध्यक्ष किशनराव भोसले, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, उपसभापती संभाजी पोले, मित्रमंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी सोळंके, संदीप वाळके, तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, मा.पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मुंडे, प्रा.डॉ.मुंजाजी चोरघडे, दासराव भोसले, बालाजी लटपटे, सतीश घोबाळे, माधवराव भोसले, उद्धवराव चोरघडे, संदीप राठोड भागवत जाधव, कुलदीप जाधव, संजय पारवे, तुकाराम वाळके, गोविंद सानप यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदाच्या हंगामात ऊस नाही गेला तर, तुमच्या शेतातल्या ऊसाचे पैसे मी देतो!

कार्यक्रमाचे औचित्य साधून आपली मनोगते मांडताना काही प्रातिनिधीक शेतकऱ्यांनी आमच्या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील ऊस आजही तसाच उभा आहे, कारखान्याने तो अजूनही नेला नाही, अशी विनंतीवजा तक्रार केली होती. त्याची दखल घेवून मार्गदर्शन करताना, यंदाच्या हंगामात तुमच्या शेतातला ऊस कारखान्याने जर नेला नाही, तर तुमच्या शेतात उभ्या असलेल्या ऊसाचे पैसे मी तुम्हाला देतो, असे आश्वासन आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी टाळ्यांची दाद देत आ.डॉ.गुट्टे यांच्या आश्वासनाचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here