Home महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव – आ.डॉ.गुट्टे

सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव – आ.डॉ.गुट्टे

356

 

अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :-शाळेमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान तर मिळतेच पण विविध सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास होतो. यामधून उद्याचा शास्त्रज्ञ, अभिनेता, वक्ता, नेता, लोकप्रतिनिधी, संशोधक, अधिकारी, अभियंता आणि खेळाडू तयार होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्षभर शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध शालेय स्पर्धा व सहशालेय उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे. परिणामी, विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व सर्वगुण संपन्न बनते. शाळेत मिळालेले हे ज्ञान आयुष्यभर मार्गदर्शक ठरत असते, असे प्रतिपादन स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.
शहरातील कृष्णाई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन आणि भव्य नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी शाळेतील मुलांचे कलागुण व कौशल्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून सलग दोनवेळा विजयी झाल्याबद्दल आ.डॉ.गुट्टे आणि सहकारी आमदार राजेश विटेकर यांचाही शाळेच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणात अनेक अडचणी येतात. तरीही प्रयत्न कधीही सोडू नका. हे स्पर्धेचे युग आहे. येथे टिकण्यासाठी खूप संघर्ष असतो आणि त्यात जो पाय घट्ट रोवून उभा राहतो तो जिंकतोच. म्हणून आयुष्यात मोठे होण्यासाठी खूप परिश्रम करा. मेहनत करा. कष्टानेच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. त्यामुळे आपली स्वप्ने साकार करण्यासाठी मनाशी जिद्द बाळगा. आपल्या आई-वडिलांना आणि गुरुजनांना कधीही विसरू नका. अभ्यास करा आणि यशस्वी व्हा.
राजेश विटेकर म्हणाले की, शाळा ही समाजाची प्रतिकृती आणि समाज परिवर्तनाचे साधन सुद्धा असते. शाळेतून भावी पिढी घडविण्याचे काम काम केले जाते. तसेच सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे प्रयत्न केले जातात. त्या दृष्टीने ही शाळा सुध्दा प्रयत्नशील आहे, याचा आनंद वाटतो. गेल्या काही वर्षात शाळेची उत्तम कामगिरी राहिली आहे. त्यामुळे भविष्यात सुद्धा विद्यार्थी हिताला प्राधान्य देवून शाळा नावलौकिक मिळवेल, असा विश्वास आहे.

यावेळी आमदार राजेश विटेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेशराव दादा रोकडे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, मित्रमंडळाचे विधानसभा अध्यक्ष किशनराव भोसले, मा. जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, गुट्टे काका मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, प्रभारी माधवराव गायकवाड, बालासाहेब रोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन रोकडे, स्थानिक नगरसेवक उबेद खान, माजी सभापती गणेशराव घोरपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश हत्तीअंबीरे, अतुल धुळगुंडे, माऊली घोरपडे, विजय घोरपडे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here